पुणे : कोकणातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला प्रोत्साहन देण्यासाठी गावोगावी जाऊन त्यांच्या मेहनतीचे कौतुक करा, शक्य ती शैक

पुणे : कोकणातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला प्रोत्साहन देण्यासाठी गावोगावी जाऊन त्यांच्या मेहनतीचे कौतुक करा, शक्य ती शैक्षणिक मदत द्या आणि त्यांचे मनोबल वाढवा, असे भावनिक आवाहन कोकणस्थ कुंभार समाज, पुणेचे संघटक संतोष चंद्रकांत साळवी (चिवेळकर) यांनी पुणे, पिंपरी-चिंचवड आणि मुंबईत वास्तव्यास असलेल्या चाकरमान्यांना केले आहे.
या उपक्रमाची सुरुवात त्यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील पालगड येथील सोंडेघर कुंभारवाडीतून केली. दहावी परीक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये सिद्धेश रुपेश कलमकर (८५.४० टक्के), स्नेहा प्रमोद कलमकर, आर्यन कैलास कलमकर, श्रेयस संदीप कासार आदी विद्यार्थ्यांचा समावेश होता. गावपातळीवर विद्यार्थ्यांच्या कर्तृत्वाची दखल घेण्याची परंपरा निर्माण व्हावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
साळवी यांनी म्हटले आहे की, शहरांमध्ये उपलब्ध असणाऱ्या अनेक सुविधा गावात सहज मिळत नाहीत. तरीही वाडी-वस्तीवरील मुले प्रतिकूल परिस्थितीत अभ्यास करून चांगले गुण मिळवण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या मेहनतीची दखल घेणे ही समाजाची जबाबदारी आहे. चाकरमान्यांनी सुट्टी, सण किंवा गावभेटीच्या वेळी आपल्या गावातील यशस्वी विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन त्यांचे अभिनंदन करावे, अशी सूचना त्यांनी केली. शक्य असल्यास पुस्तके, वह्या, पेन किंवा अन्य शैक्षणिक साहित्य भेट द्यावे, लहानशी मदतही विद्यार्थ्यांसाठी मोठे प्रोत्साहन ठरू शकते, असे ते म्हणाले.
चाकरमान्यांनी काय करावे?
- गावी गेल्यावर दहावी-बारावीतील यशस्वी विद्यार्थ्यांची भेट घ्या.
- त्यांच्या प्रयत्नांचे कौतुक करून शाबासकी द्या.
- पुस्तके, वह्या, पेन किंवा फी सहाय्य यांसारखी शक्य ती मदत करा.
- गावात सामूहिक सत्कार व मार्गदर्शन उपक्रम आयोजित करा.
- गुणांपेक्षा सातत्य, मेहनत आणि शिकण्याची जिद्द यांना प्राधान्य द्या.

COMMENTS