मुंबई : मध्यपूर्वेतील वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर इराणने अमेरिकेच्या मालकीच्या एका तेलवाहू जहाजावर थेेेट हल्ला केला, यात एका भारतीय अभियंत

मुंबई : मध्यपूर्वेतील वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर इराणने अमेरिकेच्या मालकीच्या एका तेलवाहू जहाजावर थेेेट हल्ला केला, यात एका भारतीय अभियंत्याचा मृत्यू झाला आहे. इराणने बसरा जवळील खोर अल जुबैर बंदर परिसरात अमेरिकन मालकीच्या सेफसी विष्णू या तेलवाहू जहाजावर हल्ला केल्याचा आरोप आहे. या घटनेत जहाजावरील अतिरिक्त मुख्य अभियंता नंदन प्रसाद सिंह यांचा मृत्यू झाला असून उर्वरित 27 कर्मचार्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले.
नंदन प्रसाद सिंह हे मूळचे बिहारचे रहिवासी होते. मागील काही वर्षांपासून ते मुंबईतील कांदिवली येथे कुटुंबासह वास्तव्यास होते. त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले असा परिवार आहे. विविध शिपिंग कंपन्यांमध्ये त्यांनी दीर्घकाळ सेवा बजावली होती. कंपनीकडून मृत्यूची माहिती देण्यात आली असली तरी अधिकृत स्तरावरून अद्याप संपूर्ण तपशील जाहीर झालेला नसल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली. त्यांचा मुलगा मुंबईबाहेर असल्याने तो परत आल्यानंतर अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय कुटुंबीयांनी घेतला आहे. जहाजावर सुमारे अठ्ठेचाळीस हजार मेट्रिक टन नेप्था भरण्याची प्रक्रिया सुरू होती. प्राथमिक माहितीनुसार स्फोटकांनी भरलेली चालकविरहित वेगवान बोट जहाजाच्या उजव्या बाजूला येऊन धडकली. या धडकेनंतर जहाजावर भीषण आग लागली. या हल्ल्याची जबाबदारी इराणच्या क्रांतिकारी रक्षक दलाने स्वीकारल्याचे वृत्त आहे. काही अहवालांनुसार हा प्रकार इराकच्या प्रादेशिक जलक्षेत्रात घडल्याचे सांगितले जाते. हल्ल्यानंतर जहाजावरील सर्व कर्मचार्यांनी जीव वाचवण्यासाठी समुद्रात उड्या मारल्या. इराकच्या तटरक्षक दलाने मदतकार्य राबवून 27 जणांना सुरक्षित बाहेर काढले. यामध्ये 15 भारतीय व 12 फिलिपीन्सचे नागरिक होते. त्यांना बसरा बंदराजवळील एका बेटावर नेऊन सुरक्षित ठेवण्यात आले. भारतीय दूतावासाने या घटनेबद्दल शोक व्यक्त करत बचावलेल्या भारतीयांना आवश्यक मदत पुरवली जात असल्याचे सांगितले आहे. भारतीय नौवहन मंत्रालय आणि भारतीय दूतावासाने या घटनेची दखल घेत पुढील तपास सुरू केला आहे. पर्शियन आखातात दोन तेलवाहू जहाजांवर पाण्याखालील मानवरहित साधनांच्या साहाय्याने हल्ला झाल्याचा दावा इराणी माध्यमांनी केला आहे. या जहाजांमध्ये सेफसी विष्णू आणि झेफिरोस यांचा समावेश असल्याचे सांगितले जाते. मध्यपूर्वेत सुरू असलेल्या अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्षामुळे समुद्री वाहतूक धोक्यात आली आहे. या संघर्षात आतापर्यंत किमान तीन भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला असून वीसहून अधिक जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. तणाव वाढत असल्याने परिस्थिती अद्यापही चिंताजनक असल्याचे मानले जात आहे.
होर्मुझ सामुद्रधुनीत वाहतूक जवळपास ठप्प
मध्यपूर्वेतील तणावामुळे ऊर्जा आणि समुद्री वाहतूक व्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे. विशेषतः पर्शियन आखाताला अरबी समुद्राशी जोडणार्या होर्मुझ सामुद्रधुनीत जहाजांची हालचाल जवळपास ठप्प झाली आहे. जगातील सुमारे वीस टक्के कच्चे तेल या मार्गाने वाहतूक होते. वाढत्या धोक्यामुळे अनेक तेलवाहू जहाजांनी हा मार्ग टाळण्यास सुरुवात केली आहे. सौदी अरेबिया, इराक आणि कुवेतसारख्या तेल उत्पादक देशांची निर्यात मोठ्या प्रमाणात या मार्गावर अवलंबून आहे. भारतासाठीही हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा आहे. देशाच्या कच्च्या तेलाच्या गरजेपैकी सुमारे अर्धा पुरवठा आणि द्रवरूप नैसर्गिक वायूचा मोठा हिस्सा याच मार्गाने येतो. त्यामुळे या समुद्री मार्गातील अडथळ्यांचा थेट परिणाम भारतासह अनेक देशांच्या ऊर्जा सुरक्षेवर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

COMMENTS