आग्रा : उत्तर प्रदेश दहशतवादविरोधी पथकाने आग्रा जिल्ह्यातून भारतीय नौदलातील एका जवानाला हेरगिरीच्या आरोपाखाली अटक केली आहे. हा जवान पाकिस्तानच्या

आग्रा : उत्तर प्रदेश दहशतवादविरोधी पथकाने आग्रा जिल्ह्यातून भारतीय नौदलातील एका जवानाला हेरगिरीच्या आरोपाखाली अटक केली आहे. हा जवान पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थेसाठी गोपनीय माहिती पुरवत असल्याचा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे. प्राथमिक चौकशीत त्याने देशातील युद्धनौकांशी संबंधित छायाचित्रे व महत्त्वाची माहिती परदेशातील संपर्कांना पाठविल्याचे संकेत मिळाले आहेत.
अटक करण्यात आलेला जवान आदर्श कुमार उर्फ लकी हा आग्रा जिल्ह्यातील कागारौल परिसरातील चीतपूर गावचा रहिवासी आहे. त्याची नियुक्ती केरळमधील कोची येथील दक्षिण नौदल कमांडमध्ये होती. काही काळापासून तो संशयास्पद हालचाली करत असल्याची माहिती यंत्रणांना मिळत होती. त्यानंतर त्याच्यावर गोपनीय पाळत ठेवण्यात आली. कारवाई करून दहशतवादविरोधी पथकाने त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडील इलेक्ट्रॉनिक साधनांची तपासणी केल्यानंतर काही संवेदनशील माहिती बाहेर पाठवल्याचे पुरावे मिळाल्याचा दावा तपास अधिकार्यांनी केला आहे. चौकशीत त्याने बँक खात्यांच्या माध्यमातून संशयास्पद व्यवहार केल्याचेही उघड झाले आहे. न्यायालयासमोर हजर केल्यानंतर आरोपीला न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले आहे. या प्रकरणामागे आणखी कोणते जाळे कार्यरत आहे का, याचा तपास आता यंत्रणा करत आहेत. आरोपीचे वैयक्तिक आयुष्यही चर्चेत आले आहे. सुमारे तीन आठवड्यांपूर्वी त्याचा विवाह मथुरा जिल्ह्यातील एका तरुणीसोबत झाला होता. विवाहानंतर तो पत्नीसमवेत परदेशात फिरायला गेला होता. काही दिवसांपूर्वीच तो परतल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. आरोपीच्या गावात या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. गावकर्यांच्या मते तो साधा आणि शांत स्वभावाचा वाटत असल्याने त्याच्यावर असे आरोप होतील, अशी कल्पनाही नव्हती. त्याचे कुटुंब संयुक्त पद्धतीने राहत असून वडील स्थानिक दुकानात काम करतात, अशी माहिती मिळते. तपास यंत्रणांच्या मते, काही प्रकरणांमध्ये परदेशी गुप्तचर संस्था सामाजिक माध्यमे किंवा खोट्या ओळखींचा वापर करून व्यक्तींना जाळ्यात ओढतात. त्यामुळे या प्रकरणातही तसे काही घडले का, याचाही तपास सुरू आहे. काही वर्षांपूर्वी आग्रा परिसरात अशाच प्रकारच्या हेरगिरी प्रकरणात एका व्यक्तीला अटक करण्यात आली होती.

COMMENTS