Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

‘अप्पर वॉटर’ बाजारतळासाठी स्वच्छता मोहीम

माजी खा.विखे यांच्या संकल्पनेतून प्रकल्प; नगरपरिषद पदाधिकारी-कर्मचारी ॲक्शन मोडमध्ये राहाता : शहराचा सर्वांगीण विकास साधत राहाता शहराला ‘रोल म

भाविक भक्तांच्या स्वागतासाठी साईबाबा संस्थान सज्ज!
देशभरात मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी
शिर्डीत हॉटेलमधील तरुण कामगाराचा मृत्यू

माजी खा.विखे यांच्या संकल्पनेतून प्रकल्प; नगरपरिषद पदाधिकारी-कर्मचारी ॲक्शन मोडमध्ये

राहाता : शहराचा सर्वांगीण विकास साधत राहाता शहराला ‘रोल मॉडेल सिटी’ बनविण्याच्या उद्देशाने जपानी तंत्रज्ञानाच्या साहाय्याने सुमारे सात कोटी रुपये खर्चून आधुनिक ‘अप्पर वॉटर’ बाजारतळ उभारण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी निधीची तरतूद केली असून प्रत्यक्ष कामास लवकरच प्रारंभ होणार आहे. या पार्श्वभूमीवर कात नाल्याच्या परिसरात राहाता नगरपरिषदेच्या वतीने स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

शनिवारी (दि. ७) सकाळी नगराध्यक्ष डॉ. स्वाधीन गाडेकर यांच्या पुढाकारातून उपनगराध्यक्ष डॉ. विजय सदाफळ, मुख्याधिकारी वैभव लोंढे, माजी नगराध्यक्ष कैलास सदाफळ, नगरसेवक प्रवीण सदाफळ, नितीन गाडेकर, माजी नगरसेवक भीमराज निकाळे, विजय गिधाड, सुरेश माळी, बाळासाहेब सदाफळ, सुयोग शेळके, प्रदीप बनकर तसेच नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी यांनी प्रत्यक्ष सहभागी होत स्वच्छता मोहीम राबविली. यावेळी झाडू, फावडे आदी साहित्यांच्या साहाय्याने कात नाल्यातील कचरा हटविण्यात आला तसेच जेसीबीच्या सहाय्याने साचलेली घाण काढण्याचे काम करण्यात आले.

राहाता शहरात जपानी तंत्रज्ञानाच्या सहाय्याने साकार होणारा हा आधुनिक ‘अप्पर वॉटर’ बाजारतळ सुमारे सात कोटी रुपये खर्चून उभारला जाणार आहे. महाराष्ट्रात प्रथमच असा प्रकल्प राबविण्यात येत असून त्याचा मान राहाता शहराला मिळत असल्याचे नगराध्यक्ष डॉ. स्वाधीन गाडेकर यांनी सांगितले.

राहात्यातील आठवडे बाजाराचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. हा बाजार वीरभद्र मंदिरासमोरील मैदानात भरत असल्याने परिसरातील व्यापाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. तसेच जागेअभावी शेतकरी व व्यापारी नगर-मनमाड महामार्ग व साकुरी रस्त्याच्या कडेला बसत असल्याने वारंवार वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत होती.

या समस्येवर तोडगा काढण्यासाठी कात नाला अंडरग्राऊंड करून त्या ठिकाणी सुमारे एक ते दीड एकर जागेत आधुनिक बाजारतळ उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. कात नाल्याच्या पुरस्थितीचे पुढील ५० वर्षांचे नियोजन लक्षात घेऊन या प्रकल्पाचा आराखडा तयार करण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे वीरभद्र मंदिर परिसरासह स्थानिक व्यापाऱ्यांना मोठा दिलासा मिळेल, असा विश्वास नगराध्यक्ष डॉ. स्वाधीन गाडेकर यांनी व्यक्त केला.

COMMENTS