Homeताज्या बातम्या

वाहतूक कोंडी 32 तासांनंतर पूर्वपदावर

पुणे ः मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर गेले तब्बल 32 तास सुरू असलेल्या तीव्र वाहतूक कोंडीतून अखेर गुरूवारी सकाळी दिलासा मिळाला आहे. अपघातग्रस्त गॅ

रश्मिका मंदानाच्या बॉडीगार्ड ने फॅनला ढकलले
स्वरातीमध्ये थायरॉईडचे  मोठ्या मोठ्या गाठी काढून शस्त्रक्रिया यशस्वी
भिडे वाड्याला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा द्या

पुणे ः मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर गेले तब्बल 32 तास सुरू असलेल्या तीव्र वाहतूक कोंडीतून अखेर गुरूवारी सकाळी दिलासा मिळाला आहे. अपघातग्रस्त गॅस टँकर हटवण्यात प्रशासनाला यश आल्याने मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली. मात्र हा दिलासा अल्पकालीन ठरला असून, महामार्गावरील अडथळ्यांचे संकट पूर्णतः टळलेले नाही.
मळवली परिसरात अचानक बंद पडलेल्या एका ट्रकने पुन्हा एकदा वाहतुकीचा खोळंबा निर्माण केला. त्यातच सलग तासन्तास वाहन चालवल्यामुळे अनेक जड वाहनचालकांना थकव्यामुळे झोप लागल्याच्या घटना समोर आल्या. परिणामी कामशेत परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून, प्रवाशांना तासनतास महामार्गावर अडकून पडावे लागत आहे. या महामार्गावर गॅसने भरलेला एक टँकर उलटल्यामुळे दोन्ही बाजूंची वाहतूक पूर्णतः ठप्प झाली होती. परिस्थिती गंभीर असल्याने बचावकार्य करताना विशेष दक्षता घेण्यात आली. क्रेन व तांत्रिक पथकांच्या मदतीने टँकर हटवण्यासाठी सुमारे दीड दिवसांचा कालावधी लागला. अखेर गुरूवारी सकाळी मुंबईकडे जाणारा मार्ग खुला करण्यात आला, ज्यामुळे हजारो वाहनचालकांना मोठा दिलासा मिळाला. दरम्यान, महामार्ग पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी तातडीची पावले उचलली आहेत. झोपलेल्या चालकांना जागे करून वाहने पुढे सरकवण्यात येत असून, काही ठिकाणी टप्प्याटप्प्याने वाहतूक सोडण्यात येत आहे. आडोशी बोगद्याजवळ वाहतूक तुलनेने सुरळीत असली तरी, अनेक ठिकाणी प्रवाशांना काही मिनिटांपासून तासभर थांबावे लागत आहे. मुंबई आणि पुणे या दोन प्रमुख शहरांना जोडणारा हा महामार्ग राज्याच्या आर्थिक आणि व्यावसायिक हालचालींसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे अशा दीर्घकाळ चालणार्‍या अडथळ्यांचा परिणाम केवळ प्रवाशांपुरता मर्यादित न राहता व्यापार, वाहतूक आणि पर्यटनावरही होण्याची शक्यता आहे. परिस्थिती पूर्णतः पूर्वपदावर येईपर्यंत वाहनचालकांनी संयम बाळगावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

COMMENTS