किनवट । प्रतिनिधीकार्यक्षम जुन्या कंत्राटी विद्युत कामगारांना डावलून नव्या कामगारांची बेकायदेशीर भरती करणे आणि मजुरांच्या वेतनात आर्थिक गैरव्यवहार

किनवट । प्रतिनिधी
कार्यक्षम जुन्या कंत्राटी विद्युत कामगारांना डावलून नव्या कामगारांची बेकायदेशीर भरती करणे आणि मजुरांच्या वेतनात आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप करत महाराष्ट्र नवनिर्माण सेना आता मैदानात उतरली आहे. या अन्यायाविरोधात 2 फेब्रुवारी 2026 रोजी नांदेड येथील मुख्य अभियंता कार्यालयासमोर मनसेतर्फे ’ढोल बजाओ’ आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा जिल्हा उपाध्यक्ष नितीन मोहरे यांनी दिला आहे.
किनवट उपविभागांतर्गत कार्यरत असलेल्या जुन्या कंत्राटी कामगारांना कंत्राटदार आणि वीज विभागाच्या अधिकार्यांनी संगनमत करून कामावरून कमी केले आहे. या संदर्भात मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष नितीन मोहरे यांनी 28 नोव्हेंबर 2025 रोजी तक्रार दाखल केली होती. तक्रारीनुसार पुराव्यासह खुलासा सादर करूनही प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई केली नाही. उलट, कंत्राटदाराकडून कामगारांना दमदाटी केली जात असून अधिकारी कंत्राटदारालाच पाठीशी घालत असल्याचा आरोप मनसेने केला आहे. मनसेच्या प्रमुख मागण्या पुढील प्रमाणे करण्यात आले असुन जुन्या अनुभवी कंत्राटी कामगारांना तात्काळ कामावर घ्यावे, शासन निर्णयानुसार कामगारांचे वेतन थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करावे, उपकार्यकारी अभियंता केंद्रे यांच्या कारभाराची चौकशी व्हावी. तसेच, कामावर नसलेल्या लोकांची ऑनलाइन हजेरी लावून दोन महिन्यांचे वेतन लाटल्याप्रकरणी दोषी अधिकारी व कंत्राटदारावर निलंबनाची कारवाई करावी, भ्रष्टाचार करणार्या कंत्राटदाराला तातडीने ’ब्लॅक लिस्ट’ (काळ्या यादीत) टाकावे, कामगारांचे मागील तीन महिन्यांपासून रखडलेले वेतन त्वरित अदा करावे.
आंदोलनाचा इशारा
वारंवार निवेदने आणि विनंती अर्ज देऊनही न्याय मिळत नसल्याने, मनसे जिल्हाध्यक्ष मॉन्टीसिंग जहागीरदार यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन छेडले जाणार आहे. प्रशासन झोपले असेल तर त्यांना जागे करण्यासाठी 2 फेब्रुवारीला ढोल बजाओ आंदोलन केले जाईल, असे नितीन मोहरे यांनी स्पष्ट केले आहे. या आंदोलनामुळे आता महावितरण प्रशासन काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

COMMENTS