मुंबई ः मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीत उमेदवारी अर्ज बाद ठरवण्यात आलेल्या इच्छुक उमेदवारांसाठी दिलासादायक घडामोड समोर आली आहे. विविध तांत्रिक

मुंबई ः मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीत उमेदवारी अर्ज बाद ठरवण्यात आलेल्या इच्छुक उमेदवारांसाठी दिलासादायक घडामोड समोर आली आहे. विविध तांत्रिक कारणांवरून फेटाळण्यात आलेले अर्ज पुन्हा स्वीकारण्यात यावेत, या मागणीसाठी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली असून न्यायालयाने या प्रकरणावर तातडीने सुनावणी घेण्याचा निर्णय घेतला आहे. ही सुनावणी आज शुक्रवारी होणार आहे.
महापालिकेच्या विभाग क्रमांक 1 ते 227 पर्यंतच्या निवडणूक निर्णय अधिकारी तसेच आयुक्तांनी घेतलेल्या निर्णयांना या याचिकेद्वारे आव्हान देण्यात आले आहे. उमेदवारी अर्ज तपासणीच्या प्रक्रियेत एकसमान निकष न लावता मनमानी पद्धतीचा अवलंब झाल्याचा आरोप याचिकाकर्त्यांनी केला आहे. तसेच काही प्रकरणांमध्ये राजकीय दबावाखाली अर्ज बाद केल्याचा संशयही व्यक्त करण्यात आला आहे. याचिकेत अर्ज भरण्यासाठी देण्यात आलेली केवळ सात दिवसांची मुदत अपुरी आणि अन्यायकारक असल्याचे नमूद करण्यात आले आहे. एवढ्या कमी कालावधीत सर्व कागदपत्रांची पूर्तता करणे अनेक उमेदवारांसाठी शक्य नसल्याचा दावा करण्यात आला आहे. या मुद्द्यांचे गांभीर्य लक्षात घेऊन मुख्य न्यायमूर्तींच्या खंडपीठाने तातडीच्या सुनावणीस संमती दिली आहे.

COMMENTS