उत्तर प्रदेशातील चित्रकूटमध्ये शुक्रवारी कैद्यांमध्ये गोळीबार झाला. यात पश्चिम उत्तर प्रदेशातील गँगस्टर अंशु दीक्षित याने मुख्तार अन्सारी गँगच्या मेराज आणि मुकीम काला यांची गोळ्या घालून हत्या केली.
लखनऊः उत्तर प्रदेशातील चित्रकूटमध्ये शुक्रवारी कैद्यांमध्ये गोळीबार झाला. यात पश्चिम उत्तर प्रदेशातील गँगस्टर अंशु दीक्षित याने मुख्तार अन्सारी गँगच्या मेराज आणि मुकीम काला यांची गोळ्या घालून हत्या केली. ठार झालेल्या मराज याची रवानगी वारणासीच्या तुरुंगातून इथे करण्यात आली होती, तर मुकीम काला याला सहारनपूरमधून इथे आणण्यात आले होते. या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी दीक्षित याला शरण येण्याचे आवाहन केले; पण नकार देत तो गोळीबार करत राहिला. त्यामुळे पोलिसांनी केलेल्या कारवाईत तोही ठार झाला.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी चित्रकूटमधील गोळीबाराच्या घटनेप्रकरणी राज्याच्या पोलिस महासंचालकांकडून अहवाल मागितला आहे. पुढील सहा तासांत पोलिस आयुक्त डी. के. सिंह, पोलिस महानिरीक्षक के सत्यनारायण आणि अतिरिक्त महासंचालक (तुरुंग विभाग) संजीव त्रिपाठी यांनी या प्रकरणी तापस अहवाल सादर करावा, असे आदेश आदित्यनाथ यांनी दिले आहेत. पश्चिम उत्तर प्रदेशातील कुख्यात गँगस्टर अंशु दीक्षित याने सकाळची परेड झाल्यानंतर आपल्या सोबत कैदेत असलेल्या मेराज अहमद आणि मुकीम काला या दोघांवर गोळीबार केला. या हल्ल्यात दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. यानंतर अंशु तुरुंगात गोळीबार करत होता. अंशुने तुरुंगातील आणखी काही कैद्यांना ठार मारण्याची धकमी दिली होती. जवळपास अर्धा तास तुरुंगातील कर्मचारी त्याच्या जवळ पोहोचू शकले नाही. पोलिस आल्यानंतर चकमकीत तो ठार झाला. मुकीम, मेराज यांच्याशिवाय आणखी तीन जणांना ठार मारण्याची धमकी अंशु दीक्षितने दिली होती. गोळीबाराच्या घटनेनंतर आता तुरुंग प्रशासनाच्या भूमिकेवर संशय व्यक्त होत आहे. तापासाचे धागेदोरे तुरुंगातील कर्मचार्यांच्या दिशेने जात आहे; पण ही घटना घडलीच कशी? असा प्रश्न सर्वांना पडला. एकही अधिकारी यावर बोलण्यास तयार नाही. तुरुंगात सकाळी साडेनऊ वाजता तुरुंगातील आदर्श कैदी हे बराकींमध्ये जाऊन नाश्ता देत होते. याकाही काही वेळ आधीच कैद्यांची संख्या मोजण्यात आली होती. बहुतेक कैदी बराकीच्या बाहेर होते. यादरम्यान बादलीत कच्चे चणे आणि गूळ घेऊन दोन कैदी अंशुच्या बराकीत दाखल झाले. ते चणे देऊन परतताच अंशूने पिस्तुल काढून मेराज आणि मुकीमवर गोळीबार करत त्यांची हत्या केली. यामुळे नाश्त्यासोबत अंशुला पिस्तूल दिल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
अंशुने कालाला मारण्याची घेतली होती सुपारी
या घटनेने तुरुंगातील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. गँगस्टर अंशु दीक्षित याच्याकडे पिस्तूल कुठून आले, हा एक मोठा प्रश्न आहे. अंशु दीक्षित हा यूपीतील कुख्यात गुन्हेगार होता. त्याने मुकीम काला याच्या हत्येची सुपारी घेतल्याची चर्चान आहे. यासाठी त्याने सेटींग करून चित्रकूट तुरुंगात आपली बदली करून घेतली होती.
COMMENTS