Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

श्री सिध्दनाथ मंदिरात शाही विवाहाची लगीनघाई सुरु : म्हसवडमध्ये उभ्या नवरात्रास प्रारंभ

म्हसवड / वार्ताहर : दक्षिण काशी म्हणून ओळखले जाणारे म्हसवड शहर सध्या भक्तीभावाच्या लहरींनी उजळले आहे. ग्रामदैवत श्री सिध्दनाथ व माता जोगेश्‍वरी

लोकनेते राजारामबापू पाटील राष्ट्रीय ललित कला सन्मान पुरस्कार जाहीर
कोयनेच्या पाणी विसर्गाचे आत्तापासून नियोजन करा : ना. शंभूराज देसाई
संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्‍वर माऊलींच्या पालखीचे जिल्ह्यात स्वागत

म्हसवड / वार्ताहर : दक्षिण काशी म्हणून ओळखले जाणारे म्हसवड शहर सध्या भक्तीभावाच्या लहरींनी उजळले आहे. ग्रामदैवत श्री सिध्दनाथ व माता जोगेश्‍वरी यांच्या पारंपरिक शाही विवाह सोहळ्याची लगीनघाई सध्या सुरू झाली आहे. दिवाळी पाडव्यापासून तुलसी विवाहापर्यंत चालणार्‍या उभ्या नवरात्राच्या कठोर उपासनेला प्रारंभ झाला आहे. प्राचीन परंपरेला अनुसरून भाविक मोठ्या श्रध्देने व निष्ठेने या उपासनेत सहभागी होत आहेत.
माणगंगेच्या तीरावर उभे असलेले दहाव्या शतकातील हे हेमाडपंथी श्री सिध्दनाथ मंदिर धार्मिक आणि ऐतिहासिक वैभवाने ओतप्रोत आहे. या मंदिरात पूर्वापार चालत आलेल्या अनेक व्रतपरंपरा आजही तेवढ्याच श्रध्देने पाळल्या जात आहेत. दिवाळी पाडव्याच्या पहाटे साडेपाच वाजता मंदिरातील मुख्य पुजारी आणि सालकरी यांच्या हस्ते घटस्थापना करून या 12 दिवसांच्या उभ्या नवरात्राचे विधिवत उद्घाटन करण्यात आले. या दिवसापासून उपवास करणारे भाविक दररोज पहाटे चार वाजता कार्तिक स्नान करून श्री सिध्दनाथ मंदिरापासून सुरू होणारी नगरप्रदक्षिणा घालतात.
संपूर्ण नगरातून निघणार्‍या या प्रदक्षिणेत श्रींच्या नावाचा अखंड जप, भजन, कीर्तन आणि जय सिध्दनाथ महाराजच्या गजराने वातावरण भारून जाते. कार्तिक शुध्द प्रतिपदेपासून ते तुलसी विवाहापर्यंत दररोज पहाटे प्रदक्षिणा घालत भाविक व्रतपूर्तीचा संकल्प पाळतात. या नगरप्रदक्षिणेचा मार्ग सिध्दनाथ मंदिरापासून महादेव मंदिर, माणगंगा नदीपात्र, बाजारपेठ, विठ्ठल व जोतिबा मंदिर, खंडोबा मंदिर, श्री सिध्दनाथ हायस्कूलमार्गे तुळजाभवानी मंदिर, वडजाई ओढा, मरीआई मंदिर, रथगृह, महादेव व मारुती-शनि मंदिर, श्रीनाथ मठ आणि पुन्हा सिध्दनाथ मंदिर असा ठरलेला आहे. या काळात संपूर्ण म्हसवड गाव श्रींच्या भक्तीने न्हाऊन निघते.
या व्रताचे वैशिष्ट्य म्हणजे यात केवळ पुरुष भाविकच सहभागी होतात. उपवास, संयम आणि भक्तिभावाने पार पडणार्‍या या नवरात्रात प्रत्येक रविवारी उपवास करणारे भाविक गावापासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या राजाच्या बागेतील म्हातारदेव मंदिरात प्रदक्षिणा घालतात आणि परत येताना वडजाई मंदिरात दर्शन घेतात. या धार्मिक यात्रेचा भाविकांना वेगळाच अध्यात्मिक अनुभव मिळतो.
रविवार, दि. 2 नोव्हेंबर रोजी पहाटे साडेपाच वाजता तुलसी विवाहदिनी घट उठवून या 12 दिवसांच्या उपवासाची सांगता होईल. त्याच रात्री बारा वाजता श्री सिध्दनाथ व माता जोगेश्‍वरी यांचा शाही मंगल विवाह सोहळा पारंपरिक व धार्मिक विधीपूर्वक मोठ्या थाटात पार पडणार आहे. माण तालुक्यासह पंचक्रोशीतील हजारो भाविक या सोहळ्यासाठी म्हसवडला दाखल होणार आहेत. मंदिर परिसर सजावटीने उजळून निघाला आहे. श्रींच्या जयघोषात, भक्तीच्या भावसागरात आणि पारंपरिक संस्कृतीच्या निष्ठावान आविष्कारात हे उभे नवरात्र संपूर्ण म्हसवडला पुन्हा एकदा आध्यात्मिक उर्जेने प्रज्वलित करत आहे.

COMMENTS