आज दसरा सण, अशोक विजयादशमी. भारतीय समाजाच्या विविध प्रवर्गाच्या संस्कृतीचे नाव जोडलेला हा महोत्सव, एका अर्थाने भारतातील सर्वात मोठा महोत्सव आहे

आज दसरा सण, अशोक विजयादशमी. भारतीय समाजाच्या विविध प्रवर्गाच्या संस्कृतीचे नाव जोडलेला हा महोत्सव, एका अर्थाने भारतातील सर्वात मोठा महोत्सव आहे! भारतीय समाज जरी दिवाळी मोठ्या प्रमाणात साजरी करत असला तरी दसरा हा महोत्सव भारतामध्ये दहा दिवस सलग साजरा केला जातो त्यामुळे याच्या पाठीमागे मोठा सांस्कृतिक इतिहास आहे; हे निश्चितपणे आपल्याला मानावं लागतं. शिवाय,,, हा महोत्सव केवळ सांस्कृतिकच महोत्सव आहे असं नाही, तर तो भारतीय समाजातील स्त्रियांचा एका अर्थाने सर्वोच्च महोत्सव देखील आहे. त्याचप्रमाणे, भारतासारख्या मोसमी हवामानाच्या प्रदेशातील तो शेती हंगामाचा सर्वात मोठा महोत्सवही आहे. त्यामुळे दसरा हा केवळ भारतीय लोकांसाठी एक सण आहे, असे नव्हे; तर, इतिहास, संस्कृती आणि आर्थिक सुबत्ता याचा एक मोठा इतिहास यामागे दडलेला आहे. सामाजिक आणि राजकीय विचारसरणी नुसार जरी आपण पाहिलं, तरी या सणाला महाराष्ट्रात वेगवेगळे उत्सव साजरे होतात. अशोक विजयादशमी दिनाच्या ऐतिहासिक वास्तवाला लक्षात घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर मुक्कामी भारतात बौद्ध धम्माचे पुनरूज्जीवन केले. १९५६ ला प्रथम डॉ . बाबासाहेब आंबेडकर दीक्षित झाले. त्यानंतर त्यांनी आपल्या ६ लाख अनुयायांना दीक्षित केले. या दिनानिमित्त नागपुरात दरवर्षी दीक्षा भूमीवर देश-विदेशातून लक्षावधी लोक येतात. दुसऱ्या बाजूला याच नागपूर शहरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे याच दिवशी संचलन होते. या दिवशी संचलन करून शस्त्रपूजा देखील संघाकडून केली जाते. शिवाय, हे वर्ष त्यांचे शतक वर्ष असल्याने, त्यांचे कार्यक्रम दिल्लीला देखील होणार आहेत. गेल्या ११ वर्षापासून संघाच्या कामगिरीमुळेच भारतीय जनता पक्ष सत्तेवर आहे. संघाच्या विचारधारेशी आजही ७० टक्के भारतीय जुळलेला नाही. परंतु, त्यांच्या विचारधारेत ज्या चार गोष्टी सांगितल्या जातात त्यातील पहिली म्हणजे जातीच्या श्रेष्ठतेचे तत्व ते प्रसवतात. ज्यात प्रत्येक जातीत एक दंभ भरवून देण्यात त्यांचा हातखंडा आहे. मी किंवा माझी जात इतरांपेक्षा वरची आहे, हा तो दंभ असतो. दुसरं म्हणजे त्यांच्या कडे कार्यकर्त्यांची-जे प्रशिक्षित आणि केडरबेस आहेत; त्यांची एक मोठी फळी आहे. शिवाय, सर्व समाजाला आकर्षूण घेणारा बहुसंख्यांकवाद. ज्यामध्ये त्यांना निर्माण करायचं स्वतःच्या जातीचे श्रेष्ठत्व हे इतरांच्या लक्षात येत नाही. त्यामुळे तो बहुसंख्यांकवाद हा अधिकतम लोकांकडून स्वीकारला जातो. यातील शेवटची गोष्ट म्हणजे देशातील जे मोठे भांडवलदार आहेत,, त्यांचा त्यांना मोठ्या प्रमाणात पाठिंबा आहे. या चार गोष्टी घेऊन आज संघ परिवार आपल्या राजकीय पक्षाला सत्तेवर ठेवण्यात यशस्वी झाला आहे. अशा या आरएसएसचा देखील सांस्कृतीक महोत्सव दसऱ्याच्या दिवशी साजरा केला जातो. त्याचप्रमाणे, मुंबईत शिवसेनेची स्थापना झाल्यापासून बाळासाहेब ठाकरे यांनी मुंबईच्या शिवाजी पार्कवर शिवसैनिकांचा मेळावा घेण्याची परंपरा सुरू केली आहे. आता, याच शिवसेनेतून अनेक पक्ष निघाल्यामुळे त्या सगळ्याच पक्षांनी दसऱ्याच्या दिवशी आपला मेळावा घेण्याची परंपरा सुरू केली. त्यामध्ये, शिवसेना उद्धव ठाकरे गट, शिवसेनेतून आधीच फूटून निघालेले राज ठाकरे यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि निवडणूक आयोगाच्या भूमिकेतून मुख्य शिवसेनाच ज्यांच्या ताब्यात गेली ते एकनाथ शिंदे यांची शिवसेना, अशा या तीनही पक्षांचा दसऱ्याच्या निमित्त मुंबईत मेळावा होतो. हे मिळावे महाराष्ट्राच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे ठरतात. कारण, या मेळाव्यांमध्ये महाराष्ट्राच्या स्थितीवर व त्यांच्या राजकीय भूमिकेवर एक परखड वक्तव्य केले जाते. महोत्सव या दृष्टीने जर आपण पाहिलं तर, महाराष्ट्रात दसरा या सणानिमित्त सांस्कृतिक आणि राजकीय दृष्ट्या कसे महोत्सव साजरे होतात, ते आपल्या लक्षात येतं. त्याचबरोबर शेजारच्या गुजरात राज्यात देखील गरबा हा नऊ दिवसांचा महोत्सव जोषपूर्ण साजरा होतो. या महोत्सवात स्त्रियांचा मोठा सहभाग असतो. तर तिकडे, पश्चिम बंगालमध्ये दुर्गा महोत्सव हा मोठ्या प्रमाणात साजरा होतो. या सर्वांचा जर आपण इतिहास पाहिला तर, एकंदरीत भारतीय समाजाचा तो सांस्कृतिक आणि राजकीय इतिहास आहे. त्यामुळे समाजातील वेगवेगळे प्रवर्ग दसरा या सणाच्या मागे दडलेल्या सांस्कृतिक, आर्थिक आणि राजकीय इतिहासाला आपल्या परीने अर्थ लावतात आणि त्याच अर्थाने ते आपली परंपरा पुढे चालवतात. याचा अर्थ दसरा हा महोत्सव भारतीय समाजाला एकत्रित करणारा सर्वात मोठा महोत्सव आहे, असं म्हटलं तरी चालेल. कारण, या सणाच्या निमित्ताने भारतीय समाजातील वेगवेगळ्या प्रवर्गांनी आपला इतिहास आणि संस्कृती या महोत्सवाशी जोडलेली आहे. स्वतः डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देखील याच दिवसाचे ऐतिहासिक महत्त्व विशद करून धम्मचक्र प्रवर्तन घडवले आहे. त्यामुळे, भारतीय समाजाचा सर्वोच्च महोत्सव म्हणून या महोत्सवाचा उल्लेख केला पाहिजे, असे आम्हाला वाटते.

COMMENTS