नगरच्या उड्डाण पुलाचे काम अंतिम टप्प्याच्या दिशेने ; खांबांवर सिमेंट प्लेटा टाकल्या जाणार, सहा महिने चालणार काम

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नगरच्या उड्डाण पुलाचे काम अंतिम टप्प्याच्या दिशेने ; खांबांवर सिमेंट प्लेटा टाकल्या जाणार, सहा महिने चालणार काम

अहमदनगर/प्रतिनिधी- नगर शहरातील बहुचर्चित उड्डाण पुलाचे काम अंतिम टप्प्याच्या दिशेने वाटचाल करू लागले आहे. स्टेशन रस्त्यावर सुमारे 87 मोठे सिमेंटचे खा

अभिनेत्यांनी हाकललेल्या लेकरावर नगरमध्ये झाली शस्त्रक्रिया
जरे हत्याकांडातील आरोपी बोठेच्या पत्नीने धमकावले…;संबंधितांवर कारवाई करण्याची रुणाल जरेंची पोलिस अधीक्षकांकडे मागणी
अर्बन बँकेच्या बनावट सोनेतारणाचा पहिला बळी… व्यवस्थापकाची आत्महत्या l LokNews24

अहमदनगर/प्रतिनिधी- नगर शहरातील बहुचर्चित उड्डाण पुलाचे काम अंतिम टप्प्याच्या दिशेने वाटचाल करू लागले आहे. स्टेशन रस्त्यावर सुमारे 87 मोठे सिमेंटचे खांब रोवून पूर्ण होत आले असून, त्यावर आता सिमेंट प्लेटा टाकून रस्ता तयार केला जाणार आहे. हे काम येत्या आठवड्यापासून सुरू होणार आहे व त्यासाठी पहिल्या टप्प्यात पंधरा दिवसांसाठी रात्रीच्यावेळी सहा तास या रस्त्यावरील सर्व प्रकारची वाहतूक बंद केली जाणार आहे. केंद्र सरकारने दिलेले सुमारे पावणे तीनशे कोटी रुपये व महाराष्ट्र सरकारने मंजूर केलेले 52 कोटी अशा सुमारे सव्वा चारशे कोटी रुपये खर्चातून स्टेशन रस्त्यावरील सक्कर चौक ते जीपीओ चौकापर्यंतच्या 3 किलोमीटर अंतरात हा उड्डाण पुल होणार आहे. सुमारे सात ते आठ महिन्यांपासून त्याचे काम सुरू असून, रस्त्याच्या मधोमध सिमेंटचे खांब उभारण्यात आले आहे. सुमारे 80च्यावर हे खांब असून, त्यांची उभारणी जवळपास पूर्ण होत आली आहे. या खांबांवर आता सिमेंटच्या मजबूत प्लेटा टाकल्या जाणार असून, या फाउंडेशनवर रस्ता केला जाणार आहे. या कामाला आता सुरुवात होणार असून, तीन किलोमीटर अंतराच्या या कामासाठी सुमारे सहा महिने अवधी लागणार आहे. येत्या डिसेंबरपर्यंत हे काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

15 दिवस रात्री वाहतूक बंद
नगर शहरातील सक्कर चौक ते जीपीओ चौकादरम्यान होत असलेल्या उड्डाणपुलाच्या कामासाठी सलग 15 दिवस मध्यरात्री सहा तास सर्व वाहनांना प्रवेश बंद करण्यात येणार असल्याचा आदेश काढण्यात आला आहे. 25 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर रोजी मध्य रात्रीपासून पहाटे सहा वाजेपर्यंत सक्कर चौक ते कोठी चौकादरम्यान सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद राहणार असल्याची माहिती शहर वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक राजेंद्र भोसले यांनी दिली. उड्डाणपुलाच्या वाहतुकीमध्ये बदल करण्यासंदर्भात मागील सोमवारी झालेल्या बैठकीमध्ये निर्णय झाला होता. नगर शहरातील सक्कर चौक ते जीपीओ चौक या दरम्यान उड्डापुलाचे काम प्रगतीपथावर असून त्या अनुषंगाने सक्कर चौक ते चांदणी चौकादरम्यान लाँचिंग गर्डरचे काम करायचे आहे. हे काम चालू असताना अपघात होण्याची शक्यता असल्याने वाहतूक बंद करून मार्गात बदल करण्यात आला आहे. तसेच उड्डाणपुलाचे काम 2 सप्टेंबर 2022 पर्यंत सुरू राहणार असल्याचे दिनेशचंद्र अग्रवाल इन्फ्राकॉन कंपनीने कळविले आहे.

वाहतुकीत असा असेल बदल
25 ऑगस्ट ते 8 सप्टेंबरच्या मध्यरात्रीपासून पहाटे सहा वाजेपर्यत सक्कर चौक ते कोठी चौक दरम्यान सर्व वाहनांना प्रवेश बंद आहे तसेच अहमदनगरकडून पुण्याकडे जाणारी सर्व अवजड वाहतूक शेंडी बायपास-शासकीय दूध डेअरी चौक-विळद बायपास-निंबळक बायपास-कांदा मार्केट रोड-केडगाव बायपास मार्गे वळविण्यात येणार आहे. पुण्याकडून मनमाड, औरंगाबादकडे जाणारी वाहतूक केडगाव बायपास- निंबळक-विळद-शासकीय दूध डेअरी चौक-शेंडी बायपासमार्गे वळविण्यात येणार आहे. बीड, जामखेड, पाथर्डीकडे जाणारी-येणार्‍या अवजड वाहतुकीत देखील बदल करण्यात आला आहे. पुण्याकडून येणार्‍या वाहनांसाठी केडगाव बायपास-अरणगाव-वाळुंज-मुठ्ठी चौकमार्गे वळविण्यात येणार आहे. मनमाड, औरंगाबादकडून येणार्‍या वाहनांसाठी विळद बायपास-शासकीय दूध डेअरी-शेंडी-एसपीओ चौक-चांदणी चौक-मुठ्ठी चौकमार्गे वळविण्यात येणार आहे. पुणे, अहमदनगर, औरंगाबाद या मार्गावरील हलक्या वाहनांसाठी मार्ग बदलला आहे. यामध्ये सक्कर चौक-आनंदऋषीजी हॉस्पिटल-महात्मा फुले चौक-कोठी आणि सक्कर चौक येथून टिळक रोड-आयुर्वेद कॉलेज कॉर्नर-नेप्ती नाका-दिल्लीगेट-अप्पू हत्ती चौक-पत्रकार चौक-एसपीओ चौक मार्गे वळविण्यात येणार आहे.

अवजड वाहतूक बंद
उड्डाण पुलाच्या कामासाठी 15 दिवस रात्री स्टेशन रस्त्यावर सर्व प्रकारची वाहने बंद करण्यात येत असताना या काळात तसेच अन्य वेळीही अवजड वाहतूक शहरातून जाऊ नये म्हणून हॉटेल यश पॅलेस, कोठी चौक तसेच कल्याण रोडवरील नेप्तीनाका येथून दिल्ली गेटकडे येणार्‍या रोडवर व पत्रकार चौक येथे अप्पू हत्ती चौकाकडे जाणार्‍या रोडवर फक्त दुचाकी व हलकी वाहने जातील इतक्या उंचीचे हाईट बॅरीअर बसविण्यात येणार आहेत.

COMMENTS