राजकारणात काहीही शक्य असते? याचा प्रत्यय गेल्या काही वर्षांत महाराष्ट्राच्या राजकारणातून येतांना दिसून येत आहे. खरंतर भाजप एकवेळ शिवसेनेला सोबत घ

राजकारणात काहीही शक्य असते? याचा प्रत्यय गेल्या काही वर्षांत महाराष्ट्राच्या राजकारणातून येतांना दिसून येत आहे. खरंतर भाजप एकवेळ शिवसेनेला सोबत घेवू शकते, मात्र राष्ट्रवादीला कदापी सोबत घेणार नसल्याचे वक्तव्य गेल्या अनेक वर्षांपूर्वी महाराष्ट्राने ऐकले होते, मात्र त्यानंतर राष्ट्रवादी भाजपसोबत सत्तेत दिसून आली. त्यामुळे राजकारणात काहीही अशक्य नसल्याचा प्रत्यय पुन्हा एकदा आलेला आहे. त्यानंतर आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चांनी वेग धरला आहे. त्याचे कारण म्हणजे खासदार शरद पवार यांनी नुकतेच एका मुलाखतीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचा निर्णय खा. सुप्रिया सुळे घेतील असे सांगितले. खरंतर मुळात राष्ट्रवादीचे विलीनीकरण शक्य आहे का? तर ते शक्य आहे. मुळातच प्रश्न असा आहे की, राष्ट्रवादी काँगे्रसमध्ये फूट नव्हती, ती फूट भविष्यातील राजकारणासाठी घडवून आणलेली होती, असे विधान केल्यास ते अजिबात तर्कसंगत होणार नाही. कारण ज्याप्रकारे शिवसेना संपवण्यासाठी प्रयत्न केले, त्याचप्रकारे राष्ट्रवादी काँगे्रस संपवण्यासाठी प्रयत्न केले. मात्र याउलट राष्ट्रवादी भाजपसोबत गेल्याने तो पक्ष टिकून आहे, भलेही या पक्षाकडे खासदार कमी असले तरी, आमदारांची संख्या मोठी आहे, त्याचबरोबर हा पक्ष सत्तेत आहे. त्यामुळेच खासदार शरद पवार यांनीच अजित पवारांना भाजपसोबत पाठवले असण्याची शक्यता जी वर्तवण्यात येते, ती शक्यता खरी ठरतांना दिसून येते. त्यामागे अनेक कारणे आहेत. मुळातच राष्ट्रवादी काँगे्रसचे राजकारण हे मराठा नेत्यांभोवती सारखे फिरतांना दिसून येते. राष्ट्रवादीचे राजकारण मराठा समाज आणि नेत्यांभोवती फिरत होते. पक्षाने कधीही ओबीसी, दलित या समूहांना सोबत घेतले नाही. घेतले तर ते केवळ तोंडी लावण्यापुरतेच. त्यासोबतच या पक्षाने सहकार संस्था, दूध महासंघ, यासारख्या अनेक सहकारी संस्था ताब्यात घेत आपल्या नेत्यांना बळ दिले. त्यानंतर राज्यातील सर्वात मोठा जलसिंचन घोटाळा बाहेर आल्यानंतर पक्षाचे नेते अजित पवार त्यांच्या पत्नी यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. अजित पवारांसह अनेक नेते ईडी, आयकर विभागाच्या रडारवर होते. त्यामुळे एकतर आमच्या सोबत या, किंवा तुरूंगात जा असा स्पष्ट संदेश तत्कालीन सत्ताधार्यांकडून राष्ट्रवादीपर्यंत पोहोचवण्यात आला होता. अशावेळी खासदार शरद पवार यांची पूर्ण ह्यात काँगे्रससोबत गेली, अशावेळी उजव्या विचासरणीच्या भाजपसोबत जाणे पवारांना परवडणारे नव्हते, त्यामुळे खासदार शरद पवारांनी राजकारणांतून संन्यास घ्यावा आणि सुप्रिया सुळे, अजित पवारांनी भाजपसोबत जावे, अशी एक खेळी तयार करण्यात आलेली होती. मात्र पक्षातील एका गटाचा भाजपसोबत जाण्यास सक्त विरोध होता. अशावेळी शरद पवारांना नेमके काय करावे कळेना. एकतर आपण राजकारणातून बाहेर पडल्यास पक्षावर संपूर्ण कमांड अजित पवारांची राहील, यासोबतच आपला पक्ष भाजपसोबत गेल्यास पुरोगामी विचारधारेचे नेते पक्षाबाहेर पडतील अशावेळी मध्यममार्ग निवडण्याचा प्रयत्न झाला. तोच म्हणजे अजित पवारांनी पक्षातून बाहेर पडून थेट भाजपसोबत जावे. त्यामुळे राष्ट्रवादी पक्ष टिकेल आणि त्यासोबतच पक्षाच्या नेत्यांवर जी अटकेची टांगती तलवार आहे, ज्या सहकार संस्था, साखर कारखाने ईडी, आयकर विभागाच्या रडारवर आहेत, त्यातून सुटका होणे शक्य आहे? त्यामुळेच अजित पवारांना पक्षातून बाहेर पडण्यास खासदार शरद पवारांनीच संमती दिल्याचा तर्क यातून काढता येतो. त्याचे कारण म्हणजे ज्या दिवशी शिवसेना फुटली त्यादिवशी उद्धव ठाकरेंचा झालेला तिळपापड, त्यांनी केलेली अश्लाघ्य टिका, त्यातुलनेत शरद पवारांच्या ठायी दिसून आली नाही. शरद पवार निश्चित होते, कारण डाव त्यांनी रचला होता, आणि तो पूर्णत्वास देखील त्यांनीच नेला होता. मात्र अलीकडच्या काही काळात शरद पवारांना कळून चुकले आहे की, केंद्रात काँगे्रसची सत्ता येवू शकत नाही. त्यापेक्षा आपण राजकारणातून वेगळे होणे आणि सुप्रिया सुळे यांना निर्णय घ्यावास लावून त्यांनी केंद्रात सत्तेत सहभागी व्हावे, असाच तर्क याखेळीमागे दिसून येत आहे. त्यावर लवकरच शिक्कामोर्तब होवू शकते, मात्र त्यासाठी काही दिवस आणखी वाट पाहावी लागू शकते, इतकेच.
COMMENTS