अहिल्यानगर : क्रिकेटच्याच भाषेत बोलायचे म्हंटले तर भारतीय क्रिकेटमधील दोन मोठ्या विकेट पडल्या. समस्त क्रिकेट जगताला एका आठवड्यात दोन मोठे धक्के

अहिल्यानगर : क्रिकेटच्याच भाषेत बोलायचे म्हंटले तर भारतीय क्रिकेटमधील दोन मोठ्या विकेट पडल्या. समस्त क्रिकेट जगताला एका आठवड्यात दोन मोठे धक्के बसले आहेत. प्रत्यक्ष खेळाबाबत म्हणायचे तर एकदा बाद झालेला खेळाडू पुढच्या डावात खेळू शकतो. मात्र रोहित शर्मानंतर आता विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केल्यानंतर हे दोन्ही महान खेळाडू पुन्हा कधीही पांढऱ्याशुभ्र पोशाखात खेळताना दिसणार नाहीत. सोमवारी कोहलीने इंस्टाग्रामवर पोस्ट करून ही माहिती दिली. गेल्या काही दिवसांपासून माध्यमांमध्ये अशी चर्चा होती की कोहलीने बीसीसीआयला त्याच्या निवृत्तीची माहिती दिली होती, परंतु बीसीसीआयने त्याला आगामी इंग्लंड कसोटी मालिकेच्या पार्श्वभूमीवर त्याच्या निर्णयावर पुनर्विचार करण्यास सांगितले होते. तथापि, कोहलीने कसोटीतून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला. बुधवारी नियमित कर्णधार रोहितनेही कसोटीतून निवृत्ती घेतल्याने भारतासाठी हा मोठा धक्का आहे. एका आठवड्यात दोन दिग्गज खेळाडूंच्या निवृत्तीमुळे त्यांचे चाहते गोंधळले आहेत. यासोबतच भारतीय कसोटी क्रिकेटमधील महान अध्यायाचा शेवट झाला. भारत पुढील महिन्यात इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. या काळात संघ पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळेल. परंतु या दोघांची उणीव संघाला भासेल का नाही हे मात्र येणारा भविष्यकाळच सांगेल.
विराटने त्याच्या पोस्टमध्ये लिहिले की, ‘मी १४ वर्षांपूर्वी कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच बॅगी ब्लू जर्सी घातली होती. खरं सांगायचं तर, हा फॉरमॅट मला अशा प्रवासात घेऊन जाईल अशी मी कधीच कल्पना केली नव्हती. त्याने माझी परीक्षा घेतली, मला परिभाषित केले आणि मला असे धडे शिकवले जे मी आयुष्यभर माझ्यासोबत घेऊन जाईन. पांढऱ्या जर्सीमध्ये खेळणे हा माझ्यासाठी खूप खास आणि वैयक्तिक अनुभव आहे. कठोर परिश्रम, लांब दिवस, छोटे क्षण जे कोणीही पाहत नाही, पण ते कायमचे तुमच्यासोबत राहतात. मी या फॉरमॅटपासून दूर जात असताना, ते सोपे नाही, पण सध्या ते योग्य वाटते. मी माझे सर्वस्व दिले आहे आणि त्याने मला अपेक्षेपेक्षा जास्त दिले आहे. मी खेळाबद्दल, मैदानावरील लोकांबद्दल आणि या प्रवासात मला साथ देणाऱ्या प्रत्येकाबद्दल आभारी आहे. मी माझ्या कसोटी कारकिर्दीकडे नेहमी हसतमुखाने पाहेन. त्याने पुढे त्याचा टेस्ट कॅप नंबर ‘२६९’ लिहिला आणि ‘साइनिंग ऑफ’ असे लिहिले.
आता विराट फक्त एकदिवसीय सामन्यांमध्ये खेळताना दिसेल. गेल्या वर्षी टीम इंडियाने टी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर त्याने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. एकूण, कोहलीने १२३ कसोटी सामने खेळले आणि २१० डावांमध्ये ४६.८५ च्या सरासरीने ९२३० धावा केल्या. यामध्ये ३० शतके आणि ३१ अर्धशतकांचा समावेश आहे. त्याच्या कसोटी कारकिर्दीत कोहलीने एकूण १०२७ चौकार आणि ३० षटकार मारले. याशिवाय, टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याने १२५ सामन्यांमध्ये ४८.७ च्या सरासरीने आणि १३७.०५ च्या स्ट्राईक रेटने ४१८८ धावा केल्या. यामध्ये एक शतक आणि ३८ अर्धशतकांचा समावेश आहे. एकदिवसीय सामन्यांमध्ये, कोहलीने ३०२ सामन्यांमध्ये ५७.८८ च्या सरासरीने आणि ९३.३५ च्या स्ट्राईक रेटने १४१८१ धावा केल्या आहेत. यामध्ये ५१ शतके आणि ७४ अर्धशतकांचा समावेश आहे. कसोटीत दहा हजार धावांचा टप्पा पुर्ण न करता आल्याची पुटपुट मात्र त्याला कायम सलत राहील. आता सचिन तेंडुलकरचा शंभर शतकांचा विक्रमही त्याच्या हातून निसटण्याची शक्यता वाढली आहे.
कोहलीने क्रिकेटच्या तिन्ही प्रारूपात टीम इंडियाचे नेतृत्वही केले आहे. धोनीच्या निवृत्तीनंतर २०१४ मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर तो पहिल्यांदाच कर्णधार बनला. तेव्हापासून २०२२ मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यापर्यंत तो कसोटी संघाचा कर्णधार राहिला. त्याच वेळी, सन २०२१ मध्ये, त्याच्याकडून टी-२० आणि एकदिवसीय संघाचे कर्णधारपद काढून घेण्यात आले. कोहलीने २० जून २०११ रोजी सबिना पार्क येथे वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी पदार्पण केले. त्याने या वर्षी ऑस्ट्रेलियाविरुद्ध सिडनी येथे शेवटचा कसोटी सामना खेळला.
शेवटच्या दोन कसोटी मालिकांमध्ये कोहलीची कामगिरी खूपच खराब होती आणि या दोन्ही मालिकांमध्ये टीम इंडियाला लाजिरवाण्या पराभवाचा सामना करावा लागला. गेल्या वर्षी न्यूझीलंडने भारतात येऊन तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत टीम इंडियाला ३-० ने क्लीन स्वीप केले. या मालिकेत कोहलीने तीन सामन्यांच्या सहा डावात १५.५० च्या सरासरीने ९३ धावा केल्या. तर, ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर, कोहलीला पाच सामन्यांपैकी नऊ डावात १९० धावा करता आल्या. यामध्ये एका शतकाचाही समावेश आहे. पर्थमधील पहिल्या कसोटीत कोहलीने शतक झळकविले होते. यानंतर, तो आठ डावांमध्ये फक्त ९० धावा करू शकला. कोहली आठ वेळा बाद झाला आहे, त्यापैकी सात वेळा तो ऑफ-स्टंपच्या बाहेर असलेल्या चेंडू खेळताना बाद झाला आहे.
कोहलीने त्याच्या संपूर्ण कारकिर्दीत अनेक पराक्रम केले असले तरी कसोटी क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर असलेले विक्रम भविष्यात तुटणे फार अवघड आहेत त्यावर एक नजर टाकूया. विराट कोहली हा भारताचा सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार आहे. कसोटी कर्णधार म्हणून विराट कोहलीचा रेकॉर्ड उत्कृष्ट आहे. विराट कोहलीने त्याच्या नेतृत्वाखाली भारताला ६८ पैकी ४० कसोटी सामन्यांमध्ये विजय मिळवून दिला आहे. विराट कोहली हा भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार आहे. विराट कोहलीचा हा विक्रम मोडणे भविष्यातील कोणत्याही कर्णधारासाठी खूप कठीण असेल.
विराट कोहलीने कर्णधार म्हणून कसोटी क्रिकेटमध्ये ६८ कसोटी सामने खेळले आहेत. कर्णधार म्हणून, विराट कोहलीने भारतासाठी ६८ कसोटी सामन्यांमध्ये ५४.८० च्या सरासरीने ५८६४ धावा केल्या आहेत. भारतीय कसोटी इतिहासात कर्णधार म्हणून विराट कोहली सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे.
विराट कोहलीने कर्णधार म्हणून कसोटी क्रिकेटमध्ये २० शतके ठोकली आहेत. विराट कोहलीने कर्णधार म्हणून कसोटी क्रिकेटमध्ये २० शतके आणि १८ अर्धशतके झळकविली आहेत. कसोटी कर्णधार म्हणून विराट कोहलीचा सर्वोच्च धावसंख्या नाबाद २५४ धावा आहे.
विराट कोहलीने कर्णधार म्हणून कसोटी क्रिकेटमध्ये ७ द्विशतके फडकविली आहेत. कर्णधार म्हणून कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक द्विशतके करणारा फलंदाज विराट कोहलीच आहे.
विराट कोहलीने त्याच्या नेतृत्वाखाली घरच्या मैदानावर कधीही कसोटी मालिका गमावलेली नाही. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताने घरच्या मैदानावर ११ मालिका खेळल्या. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताने १० मालिका जिंकल्या तर एक मालिका बरोबरीत सुटली.
छत्तीस वर्षीय विराट कोहलीच्या निवृत्तीची तीन प्रमुख कारणे अशीही असू शकतात. कोहलीने १२३ कसोटी सामन्यांमध्ये ९२३० धावा केल्या, ज्यामध्ये त्याने ३० शतके आणि ५१ अर्धशतके केली. वाढत्या वयामुळे कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला. तरुणांना जास्तीत जास्त संधी मिळाव्यात आणि भारतीय संघाला भविष्यातील स्टार खेळाडू मिळावेत जे ही जबाबदारी चांगल्या प्रकारे पार पाडू शकतील अशी कोहलीची इच्छा असेल.
कसोटी क्रिकेटमध्ये काही काळासाठी कोहलीची बॅट शांत दिसत होती. गेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात विराट त्याच पद्धतीने वारंवार बाद होत होता. ऑफ स्टंपच्या बाहेर जाणाऱ्या चेंडूंवर तो सातत्याने विकेटच्या मागे बाद होत होता. पर्थ कसोटीत कोहलीने नाबाद १०० धावा केल्या असल्या तरी, त्यानंतर त्याला धावा करण्यासाठी संघर्ष करावा लागत असल्याचे दिसून आले.
२०२४-२५ च्या बॉर्डर – गावस्कर ट्रॉफीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध टीम इंडियाला १-३ असा पराभव पत्करावा लागला. या मालिकेपूर्वी, भारताला घरच्या मैदानावर न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत ०-३ असा पराभव पत्करावा लागला होता, ज्यामध्येही कोहलीची बॅट शांत राहिली. किंग कोहलीला तीन सामन्यांमध्ये १०० धावाही करता आल्या नाहीत. अशा परिस्थितीत, कसोटी क्रिकेटमधील त्याच्या कामगिरीत सतत घसरण होत असल्याने, त्याने कसोटीतून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला असावा.
२०११ मध्ये कसोटी पदार्पण करणाऱ्या कोहलीने २०१९ पर्यंत शानदार कामगिरी केली. त्याची फलंदाजीची सरासरी ५४ होती, ज्यामध्ये त्याने २७ शतके केली, परंतु २०२० नंतर त्याचा आलेख घसरू लागला. २०२० पासून, कोहलीने ३९ सामन्यांमध्ये २०२८ धावा केल्या आहेत, ज्यात फक्त ३ शतकांचा समावेश आहे.
आता, ३६ वर्षीय विराट कोहलीचे ध्येय फक्त २०२७ चा एकदिवसीय विश्वचषक खेळणे असेल, ज्यासाठी तो त्याच्या तंदुरुस्तीवर लक्ष केंद्रित करू इच्छितो. सन २०२७ च्या विश्वचषकावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करण्यासाठी कोहलीला त्याचा कामाचा ताण कमी करायचा आहे. आगामी २०२७ च्या ऑलिंपिक स्पर्धेत टी २० क्रिकेटचा समावेश होत आहे. त्याच प्रमुख कारण कोहली आहे. हे दस्तुरखुद्द ऑलिंपिक संयोजन समितीनेच सांगितले आहे. कदाचित ऑलिंपिकसह क्रिकेटच्या सर्वच स्पर्धात खेळण्याची त्याची इच्छा पूर्णही होऊ शकतो. मात्र ती संपूर्णता बीसीसीआयवर अवलंबून आहे.
@ डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक
COMMENTS