Homeताज्या बातम्यासंपादकीय

सामाजिक धूव्रीकरण कशासाठी ?

राज्याची उपराजधानीत अर्थात नागपुरमध्ये जो हिंसाचार उसळला तो पूर्वनियोजित असल्याचे स्पष्ट झाले आहे. खरंतर राज्यात गेल्या काही वर्षांपासून जातीय दं

जागावाटपांतील नाराजीनाट्य
पवारांचे सोयीचे राजकारण …
कॉलेजियम पद्धत आणि संभ्रम

राज्याची उपराजधानीत अर्थात नागपुरमध्ये जो हिंसाचार उसळला तो पूर्वनियोजित असल्याचे स्पष्ट झाले आहे. खरंतर राज्यात गेल्या काही वर्षांपासून जातीय दंगली घडवण्याचे पूर्वनियोजन सुरू असल्याचे अशा घटनांवरून दिसून येते. निवडणुकीपूर्वी छत्रपती संभाजीनगर असेल, मालेगाव असेल किंवा इतर ठिकाणी आणि आता नागपूरमध्ये जो हिंसाचार, ज्या जातीय दंगली घडवून आणण्याचा प्रयत्न केला त्याला कुठेतरी अटकाव घालण्याची खरी गरज आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरातील परिस्थिती अतिशय योग्यपणे हाताळली, त्यामुळे सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र आरोपींची मजल पोलिस उपायुक्तासारख्या अधिकार्‍यावर कुर्‍हाडीने हल्ला करण्यापर्यंत जाते, यावरून हल्लेखोरांच्या मुसक्या ठेचण्याची खरी गरज आहे. यासोबतच एका महिला पोलिस कर्मचार्‍याची वर्दीवर हात घालून तिचा विनयभंग करण्यासारखे प्रकार जर महाराष्ट्रात घडत असेल तरह ी अतिशय शरमेची बाब आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत निवेदन करत हल्लेखोरांना सोडणार नसल्याचा इशारा दिला आहे. त्याप्रमाणे पोलिसांनी आक्रमक होवून हल्ला करणारे ते कोण? शोधून काढून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची खरी गरज आहे. खरंतर जातीय दंगली, किंवा हिंसाचारापुरता हा मुद्दा मर्यादित नाही तर, थेट पोलिसांवर हल्ला करण्याची यांची हिंम्मत होतेच कसे? हा कळीचा मुद्दा आहे.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून औरंगजेबाचा मुद्दा गाजतांना दिसून येत आहे. त्याला पार्श्‍वभूमी छावा चित्रपटाची असल्याचे दिसून येत आहे. या चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांना अतिशय कू्ररपणे त्यांचा छळ करून त्यांची हत्या करण्यात आली, हा प्रकार कोणत्याही मराठी माणसाला संताप आणणारा आहे. त्यामुळे महाराष्ट्रात औरंगजेबाची कबरच नको असा पावित्रा काही संघटनांनी घेतला आहे. तर दुसरीकडे ही कबर हटवण्यास काही समुदायाचा विरोध आहे, यावरून राज्यातील राजकारण तापतांना दिसून येत आहे. तसेच या कबरीला पुरातत्व विभागाचे कवच असल्यामुळे या कबरीला संरक्षण आहे, अशा परिस्थितीत ही कबर हटवता येणार नाही, जर कायदेशीररित्या ती हटवायची असेल तर केंद्राने तशी भूमिका घेण्याची खरी गरज आहे. मात्र अयोध्येतील मशीद ज्याप्रकारे हटवली त्याचप्रकारे ही कबर हटवण्याचा मुद्दा काहींनी अधोरेखित केला आहे. मात्र यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्रात हिंसाचार पेटण्याची शक्यता आहे. त्यामुळे कबर जैसे थे ठेवणेच अतिशय महत्वाचे आहे. त्यासोबतच कबरीचे उदात्तीकरण होणार नाही, याची काळजी सत्ताधार्‍यांसह विरोधकांकडून घेण्याची खरी गरज आहे, त्यातूनच महाराष्ट्रात शांतता नांदेल इतकेच. खरंतर औरंगजेबाने आपली 27 वर्ष या महाराष्ट्रात या दर्‍या-खोर्‍यात घालवली. अर्थात ही 27 वर्ष काही त्याने शांततेच्या मार्गाने घालवली नाही, तर त्याने या काळात प्रचंड हिंसाचार केला, लूटमार केली, त्यामुळे अनेक दशके महाराष्ट्र अशांत राहिला, हे वास्तव देखील काही समुदायांनी समजून घेण्याची गरज आहे. आपण ज्या मातीत राहतो, त्या मातीशी इमान राखण्याची आपली संस्कृती असे असतांना, या मातीशी द्रोह करण्याची गरज नाही. त्यामुळेच औरंगाजेबाचे उदात्तीकरण करणे नकोच. कारण हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे, तसाच तो महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा आहे. हा पुरोगामी महाराष्ट्र आहे, त्याला कडव्या विचारसरणीचा देखील शिक्का लागता कामा नये, तो पूर्वी होता तसाच पुरोगामी आणि प्रबोधन चळवळीचा अग्रेसर राहावा हीच महाराष्ट्रातील जनतेची इच्छा आहे, त्यामुळे एकीकडे औरंगाजेबचे उदात्तीकरण नको, त्याचबरोबर दुसरीकडे धर्मांध आणि कडव्या विचारसरणीला पोसण्याचे काम देखील होता कामा नये, हीच मराठी माणसांची इच्छा आहे, अन्यथा याविरोधी काम झाल्यास महाराष्ट्र पुढील अनेक दशके अशांत राहू शकतो, आज नागपुरात हिंसाचार झाला, तो उद्या इतर जिल्ह्यात, शहरात होवू शकतो, त्यामुळे महाराष्ट्र राज्य अशांत होणार नाही, याची खबरदारी घेणे गरजेचे आहे, तूर्तास इतकेच.

COMMENTS