यशस्विनी ंमहिला ब्रिगेडच्या अध्यक्ष रेखा जरे यांच्या हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी सकाळचा कार्यकारी संपादक व पत्रकार बाळ ज. बोठे याने कारागृहातून फोनद्वारे संपर्क साधलेले दोन वकील पोलिसांच्या चौकशी रडारवर आले आहेत.
अहमदनगर/प्रतिनिधी- यशस्विनी ंमहिला ब्रिगेडच्या अध्यक्ष रेखा जरे यांच्या हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी सकाळचा कार्यकारी संपादक व पत्रकार बाळ ज. बोठे याने कारागृहातून फोनद्वारे संपर्क साधलेले दोन वकील पोलिसांच्या चौकशी रडारवर आले आहेत. या वकिलांना पोलिसांनी नोटिसा पाठवून चौकशीला बोलावले आहे. त्यामुळे या चौकशीतून त्यांना बोठेने कशासाठी फोन केले व त्यांच्यात काय बोलणे झाले, हे स्पष्ट होणार आहे. जरे हत्याकांडाशी संबंधित काही संवाद बोठे व वकिलांमध्ये झाला काय, याचाही शोध पोलिस या चौकशीतून घेणार असल्याचे समजते.
जरे हत्याकांडातील मुख्य सूत्रधार बोठे याने पारनेर उपकारागृहातून वकिलांना फोन केल्याची माहिती समोर आल्यानंतर संबंधित दोन वकिलांना पोलिसांनी नोटीसा पाठविल्या आहेत. या नोटिसांद्वारे त्यांना जबाब नोंदविण्यासाठी बोलविण्यात आले असल्याची माहिती तपासी अधिकारी पारनेरचे पोलीस निरीक्षक घनश्याम बळप यांनी दिली. त्यामुळे या चौकशीची उत्सुकता व्यक्त होत आहे मागील महिन्यात अचानकपणे मध्यरात्रीच्या सुमारास नगर ग्रामीण विभागाचे उपविभागीय अधिकारी उपअधीक्षक अजित पाटील, पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे, निरीक्षक बळप यांनी पारनेर उपकारागृहाची झडती घेतली होती. यावेळी कारागृहातील दोन आरोपींकडे दोन मोबाईल आढळून आले होते. त्यांना हे मोबाईल कारागृहात जेवण पुरवणार्या दोघांनी दिल्याचे त्यांनी सांगितले होते. हे आरोपी कारागृहातील वापरलेले पाणी बाहेर टाकण्यासाठी असलेल्या पाईपमध्ये लपवून ठेवत होते. तसेच हे आरोपी असलेल्या बराकीमध्ये जरे हत्याकांडातील आरोपी बोठे असल्याने त्याने या मोबाईलचा वापर केला असावा, असा संशय होता व पुढे चौकशीत त्याने या मोबाईलचा वापर केल्याचे पोलीस तपासात समोर आले. त्याने या फोनद्वारे दोन वकिलांना तीन ते चार वेळा कॉल केले असल्याचे स्पष्ट झाल्याने या कॉलमधून त्यांच्यात काय संंभाषण झाले व कॉल करण्यामागील उद्देश काय होता याचा तपास पोलिसांना करायचा आहे व यासाठी संबंधित वकिलांचे जबाब पोलिस नोंदविणार आहे.पारनेर पोलिस ठाण्याच्या कारागृहात मोबाईल आढळून आल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात आतापर्यंत 11 आरोपी निष्पन्न झाले आहेत. त्यात बोठेचाही समावेश आहे. त्याला या गुन्ह्यात सहआरोपी करून घेण्यात आले आहे. बोठे सध्या पारनेर उपकारागृहात आहे. दरम्यान, त्याने फोन केलेल्या वकिलांना पोलिसांनी नोटीसा पाठविण्यात असल्या तरी ते जबाब देण्यासाठी अजून हजर झाले नसल्याचे समजते
COMMENTS