अहिल्यानगर : सन २०२५ च्या बहुचर्चित चॅम्पियन्स ट्रॉफीच्या एका महत्वपूर्ण सामन्यात रविवारी दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या पारंपारीक प
अहिल्यानगर : सन २०२५ च्या बहुचर्चित चॅम्पियन्स ट्रॉफीच्या एका महत्वपूर्ण सामन्यात रविवारी दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या पारंपारीक प्रतिस्पर्धी भारत व पाकिस्तान यांच्यातील लढतीत भारताने पाकिस्तानचा सहा गडी राखून पराभव केला आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानचा संघ ४९.४ षटकांत सर्वबाद २४१ धावांवर आटोपला. प्रत्युत्तरात भारताने ४२.३ षटकांत चार गडी गमावून लक्ष्य गाठले. विराट कोहलीने त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीतील ५१ वे शतक झळकविले. १११ चेंडूत बरोबर शंभर धावांवर तो नाबाद राहिला. विराटला शतक करू न देण्याचे कारस्थान पाकिस्तान करत असल्याचे वाटत होते. शाहीन आफ्रिदी वाईड लाईनच्या मागे गोलंदाजी करत होता. ४३ व्या षटकात भारताला विजयासाठी चार धावा आणि कोहलीला शतकासाठी पाच धावांची गरज होती. ४३ व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर कोहलीने एक धाव घेतली. त्यानंतर अक्षरने पुढच्या चेंडूवर एक धाव घेतली. विराटने तिसऱ्या चेंडूवर चौकार मारून शतक पूर्ण केले आणि भारताला विजय मिळवून दिला.
विद्यमान चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताने आपले दोन्ही सामने जिंकून उपांत्य फेरी गाठली आहे. त्याचबरोबर पाकिस्तानचा संघ चॅम्पियन्स ट्रॉफीमधून जवळपास बाहेर झाला आहे. पाकला आता इतर संघांच्या निकालावर अवलंबून राहावे लागणार आहे. भारताचे दोन सामन्यांनंतर चार गुण झाले आहेत, तर पाकिस्तानला दोन सामन्यांत खातेही उघडता आलेले नाही. आता पाकिस्तानचा एकमेव सामना बांगलादेशविरुद्ध आहे. दरम्यान, सोमवारी न्यूझीलंडचा सामना बांगलादेशशी होणार आहे. हा सामना किवी संघाने जिंकला तर बांगलादेश आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ स्पर्धेतून बाद होतील.
पाकने ठेवलेल्या विजयासाठीच्या २४२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. रोहित आक्रमक खेळण्याचा प्रयत्न करत असताना शाहीन आफ्रिदीच्या गोलंदाजीवर त्रिफळाचित झाला. १५ चेंडूंत तीन चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने २० धावा करून तो बाद झाला. यानंतर शुभमन गिल आणि विराट कोहलीने डावाची धुरा सांभाळली. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ६९ धावांची भागीदारी केली. गिलचे अर्धशतक हुकले. तो ५२ चेंडूंत सात चौकारांच्या मदतीने ४६ धावा करून बाद झाला. अबरार अहमदने त्याला क्लीन बोल्ड केले. यानंतर श्रेयस अय्यरने कोहलीसह भारताला विजयापर्यंत नेण्याची जबाबदारी घेतली. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी ११४ धावांची भागीदारी केली. खुशदिल शाहने श्रेयस अय्यरला इमामकरवी झेलबाद केले. ६७ चेंडूंत पाच चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ५६ धावा करून तो बाद झाला. यानंतर कोहलीने अक्षरसह टीम इंडियाला विजयापर्यंत नेले.
तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या पाकिस्तानचा संघ ४९.४ षटकांत २४१ धावांत गुंडाळला गेला. एकदिवसीय क्रिकेटमधील सलग पाचव्या सामन्यात भारताने विरोधी संघाला ५० षटकांत ऑल आऊट केले आहे. भारताकडून कुलदीपने सर्वाधिक तीन आणि हार्दिक पांड्याने दोन, अक्षर, जडेजा, व हर्षित ने प्रत्येकी एक बळी घेतला. पाकचे दोन फलंदाज धावबाद झाले. बांगलादेश विरूध्द पाच बळी मिळविणारा मोहम्मद शमी या सामन्यात फिका फिका दिसला. पायाच्या दुखापतीमुळे त्याच्याकडून पहिल्या षटकापासून वाईडच्या रूपात अवांतर चेंडू पडले.
यामुळेच कदाचित प्रथम फलंदाजी करताना बाबर आझम आणि इमाम उल हक यांनी पाकिस्तानला दमदार सुरुवात करून दिली. दोघांमध्ये पहिल्या विकेटसाठी ४१ धावांची भागीदारी झाली. हार्दिक पांड्याने ही भागीदारी तोडली. त्याने बाबरला यष्टिरक्षक राहुलकरवी झेलबाद केले. त्याला २६ चेंडूंत पाच चौकारांच्या मदतीने २३ धावा करता आल्या. पुढच्याच षटकात इमाम उल हकही धावबाद झाला. त्याला २६ चेंडूत १० धावाच करता आल्या. ४७ धावांवर दोन विकेट पडल्यानंतर सौद शकील आणि कर्णधार मोहम्मद रिझवानने डावाची धुरा सांभाळली. दोघांमध्ये तिसऱ्या विकेटसाठी १०४ धावांची भागीदारी झाली. दरम्यान, शकीलने वनडे कारकिर्दीतील चौथे अर्धशतक झळकविले. अक्षर पटेलने ही भागीदारी तोडली. त्याने रिझवानला क्लीन बोल्ड केले. तो ७७ चेंडूंत तीन चौकारांच्या मदतीने ४६ धावा करून बाद झाला. तो बाद होताच पुन्हा विकेट्सचा भडका उडाला. त्याने ७६ चेंडूंत पाच चौकारांच्या मदतीने ६२ धावा केल्या. त्यानंतर शकीलही हार्दिक पांड्याचा बळी ठरला. तय्यब ताहिर चार धावा करून बाद झाला तर सलमान अली आगा १९ धावा करून बाद झाला. सलमानला कुलदीपने तर तय्यबला जडेजाने पॅव्हेलियनमध्ये पाठवले. शाहीन आफ्रिदीला खातेही उघडता आले नाही. नसीम शाह १४ धावा करून बाद झाला तर हारिस रौफ आठ धावा करून बाद झाला. हर्षित राणाने खुशदिल शाहला कोहलीने झेलबाद करून पाकिस्तानचा डाव संपवला. खुशदिलने ३९ चेंडूत दोन षटकारांच्या मदतीने ३८ धावांची खेळी खेळली.
भारताकडून वेगवान गोलंदाज शमी, राणा व हार्दिक कडून वाईड चेंडू पडल्यामुळे पाकला अनेक अवांतर धावा व चेंडू मिळाले तसेच रोहित व कुलदिपकडून दोन झेलही सुटले. परंतु सामन्याच्या शेवटी विजय मिळाल्याने या चुकांवर पांघरून पडले. मात्र गेल्या दोन सामन्यात झेल घेण्यात भारतीय क्षेत्ररक्षकांकडून ढिलाई होत आहे. पुढे बाद फेरीत असे करणारे भारताला घातक ठरू शकते. त्यासाठी फिल्डींग कोच टी. दिलीपला या बाबींकडे कटाक्षाने लक्ष द्यावे लागेल. तसेच गोलंदाजांनाही वाईड चेंडूवर नियंत्रण ठेवावे लागेल, त्यासाठी नेटमध्ये थोडीशी मेहनत करावे लागेल. भारताचा पुढचा सामना २ मार्चला न्युझिलंडशी आहे. मधला सात दिवसांचा काळ चुका दुरूस्तीसाठी टीम इंडियाला लाभदायक ठरू शकतो.
भारताने पाकचा डाव २४१ धावांवर गुंडाळल्यानंतर भारताच्या मजबूत फलंदाजीसाठी हे लक्ष फारसे कठीण नाही हे खास करून पाकिस्तानातील क्रिकेटर सिकांना कळून चुकले होते. त्यामुळे अनेकांनी पाकचा डाव संपल्यानंतर सामना पाहणेच सोडून दिले होते. काही सार्वजनिक ठिकाणी लावलेले मोठ मोठे एलईडी स्क्रिन भारताचा डाव सुरू होण्यापूर्वीच काढून नेण्यात आले. तर ज्यांनी पूर्ण सामना पाहिला ते पाकिस्तानी खेळाडूंना शिव्यांची लाखोली वहाताना दिसले. पाकिस्तानमधील सामान्य क्रिकेटप्रेमी, माजी खेळाडू, प्रसारमाध्यमे, युट्यूब चॅनेल्सवर अक्षरशः शोककळा पसरली होती. प्रत्येक जण निराश झाला होता. अनेक जण रडत होते. काही जणांनी परिधान केलेले पाकिस्तानचे टि- शर्ट अक्षरशः फाडून फेकले. गतविजेता पाकिस्तान स्पर्धा सुरू होऊन चार दिवस होत नाही तोच स्पर्धेतून बाद झाल्याने तेथे जणू अघोषीत राष्ट्रीय दुखवटाच सुरू आहे असे वातावरण निर्माण झाले असून प्रमुख फलंदाज बाबर आझमवर तर अनेक जण जिवघेण्या टिका करत होते. एक गोष्ट मात्र नक्की की, पाकिस्तान क्रिकेट संघ व त्यांचे कर्तेधर्ते पाकिस्तानी जनतेच्या रागाच्या रडारवर आघाडीवर असून त्यांच्या रागाचा उद्रेक कधीही होऊ शकतो.
२७ तारखेला पाकचा शेवटचा साखळी सामना बांगलादेश विरूध्द असून त्या सामन्यातही फारसा वेगळा निकाल लागण्याची शक्यता नाही. जर तो सामना पाकने गमावला तर तेथे पाकिस्तानी खेळाडू व अधिकाऱ्यांवर संक्रांत येऊ शकते. फॉर्मात नसलेला विराट कोहली पाकविरूध्द नाबाद शतक करून संघाच्या पराभवाचा कर्दनकाळ ठरला तर तेथील सुज्ञ क्रिकेट रसिक कोहलीच्या मर्दुमकीचे कौतुक करतानाही आढळले. एक गोष्ट मात्र नक्की की, भारताविरूध्दचा पराभव पाकिस्तानी जनतेच्या मोठा जिव्हारी लागला असून स्क्वॅश, हॉकी व इतर खेळांप्रमाणे क्रिकेटही पाकिस्तानातून हद्दपार होऊ शकते.
@ डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक
COMMENTS