जळगाव :पुष्पक एक्सप्रेसमधील बोगीला आग लागल्याच्या भीतीने बुधवारी दुपारी काही प्रवाशांनी जळगाव-पाचोरा दरम्यान परधाडे गावाजवळ उड्या मारल्या. मात्र
जळगाव :पुष्पक एक्सप्रेसमधील बोगीला आग लागल्याच्या भीतीने बुधवारी दुपारी काही प्रवाशांनी जळगाव-पाचोरा दरम्यान परधाडे गावाजवळ उड्या मारल्या. मात्र समोरून येणार्या बंगळुरू एक्सप्रेसने या प्रवाशांना चिरडल्याची घटना घडली. या अपघातात आतापर्यंत 11 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तसेच 40 हून अधिक प्रवासी जखमी असल्याची माहिती आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. या ठिकाणी बचावकार्य सुरू करण्यात आले असून जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मुंबईकडे जाणार्या पुष्पक एक्सप्रेसने अचानक ब्रेक लावल्याने त्या ठिकाणी आगीच्या ठिणग्या उडाल्या. त्यामुळे काही प्रवाशांना ही आग लागल्याची भीती व्यक्त केली. त्यामुळे भयभीत झालेल्या त्या प्रवाशांनी गाडीतून उड्या मारल्या. पण समोरून येणार्या बंगळुरू एक्सप्रेसने या प्रवाशांना चिरडले, यात 11 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाच्या अधिकृत सूत्रांनी सांगितले की, ज्या ठिकाणी ही घटना घडली त्या ठिकाणी तीव्र वळण होते. परिणामी, दुसर्या ट्रॅकवर बसलेल्या प्रवाशांना रेल्वे येत असल्याचे लक्षात आले नाही. त्यामुळेच वेगाने येणार्या कर्नाटक संपर्क क्रांतीने इतक्या मोठ्या संख्येने लोक चिरडले गेले. घटनास्थळ मुंबईपासून 400 किमी अंतरावर आहे. मध्य रेल्वेचे सीपीआरओ स्वप्नील निला म्हणाले, मेडिकल रिलीफ ट्रेन भुसावळहून निघाली आहे. या अपघातात कोणत्याही प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती नाही. मिळालेल्या माहितीनुसार, कर्नाटक संपर्क क्रांती एक्सप्रेस ही ट्रेन यशवंतपूरहून हजरत निजामुद्दीनला जात होती. तर पुष्पक एक्सप्रेस (12533) लखनौहून मुंबईला जात होती. ब्रेक लावताना पुष्पक एक्सप्रेसच्या चाकांमधून धूर निघत होता. त्यामुळेच ट्रेनमध्ये आग लागल्याच्या अफवा पसरल्या आणि प्रवाशांनी घाबरून डब्यातून बाहेर उड्या मारल्या, यात अनेकांना चिरडण्यात आले आहे. याठिकाणी असलेल्या प्रत्यक्षदर्शींनी सांगितलक की, परधाडे स्टेशनच्या आधी ट्रेनचा ब्रेक लागल्याने घर्षण झाले आणि आगीच्या ठिणग्या उडाल्या. त्यावेळी प्रवाशांनी उड्या मारायला सुरूवात केली. त्यामध्ये अनेकजण बंगळुरू एक्स्प्रेसच्या खाली आले. यात 11 प्रवाशांनी आपला जीव गमावला.
घटना अतिशय वेदनादायी : मुख्यमंत्री फडणवीस
जळगाव जिल्ह्यातील पाचोरानजीक एका अत्यंत दुर्दैवी घटनेत काही लोकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय वेदनादायी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, असे ट्विट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. पुढे बोलतांना मुख्यमंत्री म्हणाल की, माझे सहकारी मंत्री गिरीश महाजन तसेच पोलिस अधीक्षक हे घटनास्थळी पोहोचले असून, जिल्हाधिकारी काही वेळात तेथे पोहोचत आहेत. संपूर्ण जिल्हा प्रशासन रेल्वे प्रशासनाशी समन्वयाने काम करीत असून, जखमींच्या उपचारासाठी तातडीने व्यवस्था करण्यात येत आहेत. 8 रुग्णवाहिका रवाना करण्यात आल्या आहेत. सामान्य रुग्णालय तसेच नजीकच्या इतर खाजगी रुग्णालयांना जखमींवर उपचारासाठी सज्ज ठेवण्यात आले आहे. ग्लासकटर, फ्लडलाईट्स इत्यादी आपातकालिन यंत्रणा सुद्धा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.
COMMENTS