Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कुस्तीला वैभव मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील : केंद्रीय मंत्री मोहोळ यांची ग्वाही

अहिल्यानगर : केंद्रीय नागरी विमान वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते कै. बलभीमअण्णा जगताप क्रीडा नागरी वाडिया पार्क येथे मह

श्री क्षेत्र महेश्‍वर व अमृतेश्‍वर देवस्थानास ‘क’ वर्ग दर्जा मंजूर
शालेय साहित्याचे वाटप
गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे गरजेचे ः भानुदास मुरकुटे

अहिल्यानगर : केंद्रीय नागरी विमान वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते कै. बलभीमअण्णा जगताप क्रीडा नागरी वाडिया पार्क येथे महाराष्ट्र केसरी स्पर्धा मैदानाचे मातीपूजन करण्यात आले. कुस्तीला नवे वैभव मिळवून देण्यासाठी सर्वांनी मिळून एकत्रित प्रयत्न करावे, असे आवाहन मंत्री मोहोळ यांनी केले. यावेळी आमदार शिवाजीराव कर्डिले, आमदार तथा अहिल्यानगर कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष संग्राम जगताप, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष पै. रामदास तडस, महापालिका आयुक्त यशवंत डांगे, माजी आमदार अरुणकाका जगताप, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष पै. संदीप भोंडवे, उपाध्यक्ष गुलाबराव दगडे, सरचिटणीस हिंदकेसरी पै. योगेश दोडके आदी उपस्थित होते.
केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ म्हणाले, अहिल्यानगर जिल्ह्याला कुस्तीची वैभवशाली परंपरा आहे. त्यामुळे इथे होणारी महाराष्ट्र केसरी स्पर्धा निश्‍चितपणे मोठी आणि यशस्वी होईल. खाशाबा जाधव यांच्यानंतर ऑलिम्पिकमध्ये पदक मिळविणारा पैलवान आपल्याकडे झाला नाही. त्यामुळे अशा स्पर्धेतून कुस्तीमध्ये देशाचे नेतृत्व करणारे कुस्तीगीर घडविण्याची गरज आहे. स्पर्धेचे यशस्वीपणे आयोजन झाल्यास कुस्तीगीरांना प्रेरणा मिळते. अहिल्यानगरमध्ये होणारी स्पर्धा कुस्ती क्षेत्राला नवी ऊर्जा देण्यात यशस्वी ठरेल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. महाराष्ट्रातल्या मातीतल्या या खेळाला शासनाने भरीव अर्थसहाय्य दिले असून महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी 1 कोटी रुपये देण्याचा आणि महाराष्ट्र केसरी आणि हिंदकेसरींच्या पुरस्कार रकमेतही वाढ करण्याचा निर्णय शासनाने यापूर्वीच्या स्पर्धेच्यावेळी घेतला आहे, असेही ते म्हणाले. आमदार कर्डिले म्हणाले, कुस्तीमुळे शरीर निरोगी आणि मन शुद्ध रहाते, जीवनात नवी ऊर्जा मिळते. लाल मातीत श्रम करतांना पैलवानांनी चुकीच्या गोष्टीपासून दूर राहण्याचा प्रयत्न करावा. स्पर्धेच्या निमित्ताने पैलवानांना प्रोत्साहन दिल्यास त्यांना पुढील कारकिर्दीसाठी ऊर्जा मिळेल, असे त्यांनी सांगितले. तडस म्हणाले, महाराष्ट्रातील कुस्तीगीरांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर चांगले यश संपादन केले आहे. महाराष्ट्र कुस्तीगीर संघातर्फे कुस्तीगीरांना चांगल्या सुविधा दिल्या जात आहेत. त्यांनी ऑलिंपिक, आशियाई आणि राष्ट्रकुल स्पर्धेत चांगले यश मिळावे यासाठी प्रयत्न होत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुस्तीगीरांना राजाश्रय देण्याचे, त्यांना शासकीय नोकरीत सामावून घेण्याचे कार्य केले. कुस्तीच्या विकासासाठी तालुका पातळीवर मॅटची सुविधा उपलब्ध होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. संतोष भुजबळ यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. कार्यक्रमाला महाराष्ट्र केसरी, उप महाराष्ट्र केसरी, कुस्तीप्रेमी नागरिक उपस्थित होते.

या स्पर्धेतून देशभरातील मल्लांना प्रेरणा मिळेल : आमदार संग्राम जगताप
महाराष्ट्र केसरी स्पर्धेला वेगळे महत्व आहे. 29 जानेवारी ते 2 फेब्रुवारी या कालावधीत ही स्पर्धा होणार असून राज्यातील मल्ल स्पर्धेत सहभागी होतील. या स्पर्धेतून देशभरातील मल्लांना प्रेरणा मिळेल असा विश्‍वास आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केला. अहिल्यानगर जिल्ह्याला कुस्तीची गौरवशाली परंपरा आहे, हे वैभव आणखी वाढविण्यासाठी ही स्पर्धा उपयुक्त ठरणार असल्याचा विश्‍वास यावेळी आमदार जगताप यांनी व्यक्त केला.

COMMENTS