राज्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीत सर्व काही आलबेल नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे, त्याचे कारण म्हणजे आगामी स्थानिक स
राज्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीत सर्व काही आलबेल नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे, त्याचे कारण म्हणजे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होय. लोकसभा निवडणुकीत प्रभावी कामगिरी केली असली तरी, विधानसभेत तशी कामगिरी करण्यात महाविकास आघाडीला अपयश आले आहे, त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी महाविकास आघाडीतील पक्षाने स्वबळाचा नारा दिला आहे.
खासदार शरद पवार यांनी पक्षाच्या बैठकीत दिलेली एक प्रतिक्रिया अतिशय बोलकी होती. लोकसभा निवडणुकीतून धडा घेत राष्ट्रीय स्वयंसवेक संघाने सुक्ष्म कामगिरी करून त्याची अंमलबजावणी विधानसभा निवडणुकीत केली. खरंतर पवारांनी निकालानंतर ईव्हीएमला विरोध दर्शवला होता, मात्र आता तो विरोध मावळल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पक्षसंघटन आणि पक्षवाढीसाठी कार्यकर्त्यांनी कठोर मेहनत घ्यायला हवी अशी कानटोचणी त्यांनी केली. तर दुसरीकडे ठाकरे गट मुंबई महापालिका स्वबळावर लढणार असल्याचे एव्हाना स्पष्ट झाले आहे. कारण दिल्लीत आपने जसा स्वबळाचा नारा दिला, तसाच नारा ठाकरे गट मुंबई महापालिकेसाठी देवू शकतो. महाविकास आघाडीत काँगे्रस आणि ठाकरे गटातील संघर्ष अनेकदा उफाळून आला आहे. दोन्ही पक्षाकडून आम्हालाच सर्वाधिक जागा हव्या आणि मनासारख्या जागा पदरात पाडून घेण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत टोकाचा संघर्ष केला, परिणामी कार्यकर्ते आणि नेत्यांना तयारी करण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला नाही, त्यामुळे या धड्यातून शहाणे होत महाविकास आघाडीत आता बेसूर दिसून येत आहे. यासंदर्भात खासदार अमोल कोल्हे यांनी काँगे्रस आणि ठाकरे गटावर टीकेची झोड उठवली आहे. काँग्रेसची मोडलेली पाठ अजून सरळ होत नाहीय, तर ठाकरे गट अजूनही झोपेतून जागा व्हायला तयार नाही, अशा शेलक्या शब्दांत त्यांनी कान टोचले आहे. खरंतर पराभव आणि विजय या राजकारणातील बाबी आहे. पराभव झाला तरी विचारमंथन होणे गरजेचे असते. पराभवाची कारणे शोधायची असतात, एकमेकांना दोष देण्यात धन्यता मानायची नसते. तर त्या चुका पुन्हा होणार नाही, यासाठी प्रयत्न करायला हवे, मात्र यातून महाविकास आघाडी धडा घ्यायला तयार नाही, त्यामुळे महाविकास आघाडीत फूट अटळ असल्याचे दिसून येत आहे. त्याची परिणती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्यात होवू शकते.
दरम्यान, दिल्ली विधानसभा निवडणुका बिगुल वाजल्यानंतर आप स्वबळावर लढतांना दिसून येत आहे. तर या निवडणुकीत काँगे्रस एकाकी पडल्याचे दिसून येत आहे. त्याचे प्रमुख कारण म्हणजे तृणमूल काँगे्रस, समाजवादी पक्ष आणि ठाकरे गटाने आपला पाठिंबा आपला जाहीर केला आहे, त्यामुळे इंडिया आघाडीतील नेते आपच्या व्यासपीठावर दिसतील, याउलट काँगे्रस या निवडणुकीत अजूनतरी कुठेही दिसून येत आहे. आपने आपले 70 उमेदवार निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वी जाहीर केले आहेत, तर दुसरीकडे भाजपने देखील बहुतांश उमेदवार जाहीर केले आहेत, मात्र काँगे्रसचे या निवडणुकीसंदर्भात कुठलेही स्टेटमेंट नाही, उमेदवार जाहीर नाहीत, त्यामुळे काँगे्रस शेवटच्या निवडणुकीत आपला पाठिंबा तर जाहीर करणार नाही ना? असा सवाल उपस्थित होत आहे. मात्र काँगे्रस राष्ट्रीय पक्ष असल्यामुळे अशी शक्यता कमी दिसून येत आहे. मात्र बहुतांश राज्यातील लोकसभा आणि विधानसभा निवडणुका संपल्यामुळे इंडिया आघाडीतील पक्ष आपल्या सोयीप्रमाणे भूमिका घेतांना दिसून येत आहे. त्यामुळे इंडिया आघाडीतही फूट दिसून येत आहे. वास्तविक पाहता आपल्या सोयीप्रमाणे भूमिका घेणार्या पक्षामुळे इंडिया आघाडी एकसंध असल्याचे दिसून येत नाही. आपच्या नेत्यांवर अर्थात केजरीवाल यांच्यावर काँगे्रस नेते अजन माकन यांनी देशद्रोही म्हणून टीका केली होती. तर दुसरीकडे इंडिया आघाडीचे नेतृत्व करण्याची इच्छा ममता बॅनर्जी यांनी व्यक्त केली होती. त्यामुळे या सर्व बाबी बघता इंडिया आघाडीचे तीनतेरा वाजतांना दिसून येत आहे. याउलट एनडीए आणि महायुती अजूनही एकसंध असल्याचे दिसून येत आहे. महाराष्ट्रात महायुतीमध्ये विसंवाद असला तरी त्याचे पडसाद उमटत नाहीत, त्यामुळे त्यांच्यापासून इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीने धडा घेण्याची गरज आहे.
COMMENTS