Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विद्यापीठांच्या प्रश्नांबाबत आ. तांबेंनी घेतली राज्यपालांची भेट 

अहिल्यानगर/मुंबई : शिक्षण क्षेत्रातील विविध प्रश्नांना सातत्याने वाचा फोडणाऱ्या आ. सत्यजीत तांबे यांनी राज्यातील विद्यापीठांच्या प्रश्नांबाबत राज

पाथर्डी तालुक्यातील जवखेडे खालसा येथे रविवारी रात्री आठच्या सुमारास बिबट्या जेरबंद
‘वंचित’च्या वतीने आयोजित सोलो डान्स स्पर्धा उत्साहात
कास्ट प्रकल्पांतर्गत प्राध्यापक थायलंड दौर्‍यासाठी रवाना

अहिल्यानगर/मुंबई : शिक्षण क्षेत्रातील विविध प्रश्नांना सातत्याने वाचा फोडणाऱ्या आ. सत्यजीत तांबे यांनी राज्यातील विद्यापीठांच्या प्रश्नांबाबत राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेतली. या भेटी दरम्यान आ. तांबे यांनी राज्यातील विद्यापीठांमध्ये प्रचलित असलेल्या विविध गंभीर समस्यांवर चर्चा करून समस्यांच्या तातडीने निराकरणासाठी निवेदन दिले तसेच विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करून समस्यांचे निराकरण तातडीने करण्यात यावे. आणि राज्यातील शैक्षणिक व्यवस्थेला नवी दिशा देण्यासाठी सरकारने सकारात्मक पावले उचलावीत अशी विनंती आ. तांबेंनी राज्यपालांना केली.

राज्यातील अनेक प्राध्यापक पदे रिक्त असल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या गुणवत्तेवर परिणाम होत आहे. त्यामुळे प्राध्यापकांची भरती ही विद्यापीठ स्तरावर करण्यात यावी. तसेच कोविड-19 महामारीमुळे शैक्षणिक सत्र विस्कळीत झाले असून, अद्यापही शैक्षणिक चक्र सुरळीत झालेले नाही. प्रवेश प्रक्रिया उशिरा होणे, परीक्षा वेळापत्रकाची घाई, आणि निकाल विलंब यामुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात येत आहे. त्याचबरोबर वारंवार परीक्षा पुढे ढकलल्या जातात किंवा रद्द होतात. परिणामी, विद्यार्थ्यांच्या पुढील अभ्यासक्रम प्रवेश आणि शैक्षणिक नियोजनावर विपरीत परिणाम होत असल्याचे आ. सत्यजीत तांबेंनी आपल्या निवेदनात म्हंटले आहे.

राज्यातील अनेक महाविद्यालयांमध्ये प्रयोगशाळा, वाचनालय, क्रीडांगण यासारख्या मूलभूत सुविधांचा अभाव आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी या सुविधांची तातडीने उपलब्धता सुनिश्चित केली जावी. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू झाल्यानंतरही अपेक्षित बदल शैक्षणिक प्रक्रियेत होत नसल्याने धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करणे आवश्यक आहे, त्यांनी म्हंटले आहे.

राज्यपाल हे राज्यातील सर्व विद्यापीठांचे कुलपती असल्याने त्यांची भेट घेतली. विद्यापीठांच्या प्रश्नाबाबत वारंवार विद्यार्थी संघटना व शिक्षक संघटना प्रश्न माझ्याकडे मांडत होते. त्यांचे प्रश्न राज्यपालांकडे मांडण्याचा प्रयत्न केला. सी. पी. राधाकृष्णन यांचा राज्यपाल म्हणून दोन तीन राज्यांचा अनुभव आहे. ते संपूर्ण राज्यभर फिरून समस्या जाणून घेत आहेत. आता पर्यंत त्यांचे २५ जिल्ह्यांचा दौरा झाला आहे. त्यांची ही गोष्ट खूप भावणारी असल्याने त्यांचे अभिनंदन देखील केले. त्याचबरोबर शिक्षण क्षेत्रातील प्रश्नांमध्ये लक्ष घालण्याची विनंती केली. राज्यपालांनी देखील हे प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिल्याचे आ. सत्यजीत तांबेंनी सांगितले.

पेपर फुटीवर कायदा करावा.

पेपर फुटीच्या घटना वारंवार घडत असून, यामुळे प्रामाणिक विद्यार्थ्यांवर अन्याय होतो. यावर राज्य सरकारकडून ठोस पावले उचलली जात नाहीत. त्यामुळे परीक्षार्थींंमध्ये मोठी नाराजी व्यक्त केली जात आहे. पेपर फोडणाऱ्यांना कोणत्याही कायद्याची भीती राहिलेली नाही. वेळीच यावर ठोस कायदा केला नाही तर भविष्यात स्पर्धा परिक्षांचे पेपर फुटतं राहतील. नोकर भरती करणाऱ्या खासगी कंपन्यांवर कायद्याचा धाक असायला हवा. जेणेकरून भविष्यात पेपर फुटणार नाही. यासाठी पेपरफुटी विरोधात कडक कायदा करावा, अशी मागणी आमदार सत्यजीत तांबेंनी राज्यपालांकडे केली

COMMENTS