Homeताज्या बातम्यासंपादकीय

श्याम बेनेगल : सामान्य प्रेक्षकांपर्यंत न पोहचलेले दिग्दर्शक !

 हिंदी चित्रपट सृष्टीत समांतर सिनेमा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या किंवा कलात्मक चित्रपट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चित्रपटसृष्टीचे दिग्दर्शक म्हणून ज्यां

Nanded : कोडगाव कामळज येथील रस्त्याच्या कामात घोटाळा : चौकशीची मागनी | LokNews24
शेततळ्यात बुडून सख्ख्या भावंडांचा मृत्यू; पाटण तालुक्यातील रोमणवाडी येथील दुर्दैवी घटना
भारतीय आणि पाकिस्तानी यूट्यूब न्यूज चॅनेलवर कठोर कारवाई.

 हिंदी चित्रपट सृष्टीत समांतर सिनेमा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या किंवा कलात्मक चित्रपट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चित्रपटसृष्टीचे दिग्दर्शक म्हणून ज्यांनी ख्याती मिळवली, त्या शाम बेनेगल यांचं वयाच्या ९० व्या वर्षी निधन झाले. भारतीय चित्रपट सृष्टीत विषयांचं वैविध्य असूनही, त्या विषयांना कधी भिडत नाही. परंतु, श्याम बेनेगल यांनी मात्र समांतर सिनेमाच्या माध्यमातून भारतातील ग्रामीण जीवनाचा जो सामाजिक संघर्ष, खास करून तिथल्या मागासवर्गीय आणि जमीनदार कुटुंबांच्या अनुषंगाने सुरू असतो; त्या संघर्षांची पार्श्वभूमी मांडत, त्यांनी अंकुर, निशांत, मंथन अशा अनेक कलात्मक चित्रपटांची निर्मिती केली. अर्थात, या सगळ्या चित्रपटांमध्ये जमीनदार किंवा त्या गावाचा जागीरदार यांच्या कुटुंबाचे एक खलनायकी स्वरूप दाखवत असताना, तिथल्या ग्रामस्थांचे जे मागासवर्गीय किंवा गरिब असणाऱ्या जनतेच्या जीवन संघर्षावर बेतलेले हे चित्रपट, एका मध्यमवर्गीय समूहापर्यंतच मर्यादित राहिले. ग्रामीण जीवनाचा जो बाज आहे, तो शास्त्रीय भाषेत जर मांडण्याचा प्रयत्न केला, तर, तो जनमनाची पकड घेत नाही; हे समांतर सिनेमांच्या मधून आलेल्या सामाजिक विषयाने दाखवून दिलं. दुसऱ्या बाजूला राज कपूर सारखा निखळ व्यावसायिक चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक एखाद्या सामाजिक विषयाला व्यावसायिक पद्धतीने मांडण्याचे कौशल्य ठेवून, तो विषयही प्रेक्षकांपर्यंत भिडवायचा.  तो विषय समाजात कसा चालला आहे, याचे दार्शनिक स्वरूपा प्रमाणे, खास करून जर आपण त्यांच्या अलीकडच्या काळातल्याच ‘प्रेमरोग’ चित्रपटाचे उदाहरण पाहिलं, तर ठाकूर किंवा राजपूत समाजामध्ये स्त्रियांच्या पुनर्विवाहाला किंवा विधवा विवाहाला बंदी होती; आणि हा विषय त्यांनी प्रेमरोग या चित्रपटातून दाखवताना, त्याचा बाज त्यांनी व्यावसायिक पद्धतीने मांडला. परंतु, तो लोकांपर्यंत पोहोचला. शाम बेनेगल यांनी भारतीय सिनेमाचं ग्रामीण जीवनाचं चित्रण करत असतानाही, ते वास्तव असतानाही, ते साध्या सरळ भाषेतून न आल्यामुळे किंबहुना, त्याचं सादरीकरण – कलात्मक चित्रपटांचे जे सादरीकरण आहे – ते तांत्रिक पातळीवर धुसर किंवा अंधुक प्रकाशपद्धतीने  केले जाण्याची प्रथा पडलेली होती, त्यामुळे ते सामान्य प्रेक्षकांपर्यंत कधीही भिडलं नाही. त्यांना चित्रपटांसाठी पद्म पुरस्कारही मिळाले. फिल्म फेअर अवार्ड ही मिळाले. परंतु, त्यांच्या चित्रपटांनी सामान्य प्रेक्षकांच्या मनाचा ठाव कधी घेतला नाही. यामुळे त्यांच्या स्वतःच्या गुणवत्तेला जराही कमतरता येत नाही; त्यांना जाणवलेलं समाज जीवन, मांडण्याचा प्रयत्न त्यांनी आपल्या चित्रपटातून केला. खासकरून ते कोंकणी भाषिक सारस्वत ब्राह्मण परिवाराकडून जरी आले असले तरी, आंध्र आणि तेलंगणा या भागातील ग्रामीण जीवन त्यांनी जे लहानपणी किंवा तरुण वयात  पाहिलं होतं, त्याचं चित्रण त्यांचा चित्रपटाचा विषय झाला. ते चित्रपट हे कलात्मक किंवा समांतर सिनेमा म्हणून भारतीय चित्रपट सृष्टीत ओळखले गेले. परंतु, अशा प्रकारच्या सामाजिक आशयांच्या चित्रपटांची निर्मिती करणे ही देखील निर्माता आणि दिग्दर्शक यांच्या साहसाचीच बाब म्हणता येईल. कारण, अशा चित्रपटांना सर्वसामान्यपणे सामान्य प्रेक्षक भेटत नाही. मध्यमवर्गीय प्रेक्षक ज्याला कथा आणि आशयाची समज असते किंवा त्याचं आकलन असतं, अशा प्रेक्षकांपर्यंतच हा चित्रपट पोहोचतो. त्यामुळे श्याम बेनेगल यांनी भारतीय समाज जीवनाच्या कथानकाला हात घालूनही ते भारतीय प्रेक्षकांपासून एक प्रकारे अलिप्त राहिले. परंतु, यामुळे या महान दिग्दर्शकाच्या कार्याचे मोल कमी होत नाही.  वयाच्या नव्वदित  त्यांनी जीवनाचा निरोप घेतला आणि भारतीय चित्रपटसृष्टीतील समांतर सिनेमाचं एक युगच त्यांच्या रूपानं पडद्याआड गेलं.

COMMENTS