Homeताज्या बातम्यासंपादकीय

संघप्रमुखांनी हिंदू बहुजनांना, अज्ञानाच्या गर्तेत लोटू नये !

लोकसंख्या वाढीच्या प्रश्नावर पुन्हा एकदा संघ प्रमुख मोहन भागवत यांनी वक्तव्य करून, या संदर्भात विवाद उभा केला आहे. लोकसंख्या वाढीचे प्रमाण २.१% प

पोलिस असल्याचे सांगून पैसे व दारु बॉक्सची मागणी
शास्त्रीजींनी १९६५ च्या भारत पाक युध्दात भारताला विजय मिळवून दिला – आ. डॉ. सुधीर तांबे
मांगरूळ येथील मैदानात पै. सिकंदर शेखची बाजी; चिंचेश्‍वर यात्रेनिमित्त कुस्ती मैदान पडले पार

लोकसंख्या वाढीच्या प्रश्नावर पुन्हा एकदा संघ प्रमुख मोहन भागवत यांनी वक्तव्य करून, या संदर्भात विवाद उभा केला आहे. लोकसंख्या वाढीचे प्रमाण २.१% पेक्षा जर कमी झाले, तर, जगातील तो देश कालांतराने नष्ट होतो, अशी भूमिका मांडून त्यांनी समस्त भारतीयांना अज्ञानाच्या गर्तेत लोटले आहे. वास्तविक, १९६० मध्ये जागतिक लोकसंख्या वाढीचा दर हा दोन टक्के झाला होता. हा दर लोकसंख्या विस्फोटाच्या कगारावर असल्याचे, जागतिक संस्थांनी म्हटले होते. त्यामुळे, १९६० पासून लोकसंख्या वाढीचा दर कमी करण्यासाठी सर्व जागतिक संस्थांनी प्रयत्न सुरू केले. याचा परिणाम लोकसंख्या वाढीचा दर एक टक्क्यापर्यंत आणला गेला. तरीही, या काळामध्ये जगाची लोकसंख्या ७०० कोटी पर्यंत वाढली आहे. त्यातील म्हणजे जगाच्या एकूण लोकसंख्येच्या ३०% पेक्षा अधिक लोकसंख्या,  आशियातील केवळ दोन देशांमध्ये वास्तव्याला आहे. हे दोन देश म्हणजे चीन आणि भारत. या दोन्ही देशांची लोकसंख्या जवळपास पावणे तीनशे कोटी लोकसंख्या, या दोन देशांची आहे. उर्वरित ४५० कोटी लोकसंख्या ही जगाची आहे. अर्थात, त्यातही आशियाई देशांमध्ये एकूण जगाच्या लोकसंख्येपैकी ६०% लोकसंख्या ही आशियाई देशांमध्ये आहे. याचं मुख्य कारण आशियाई देशांच्या लोकसंख्या वाढीचे प्रमाण हे सातत्याने दोन टक्क्यांच्या पुढे राहिले आहे.  चीन सारख्या जागतिक अर्थ सत्तेत बलाढ्य होऊ पाहणाऱ्या देशाने देखील, आपल्या लोकसंख्या वाढीच्या दरावर नियंत्रण मिळवले आहे. आता लोकसंख्या वाढीच्या दरात चीन भारतानंतर येतो. जेव्हा, कोणत्याही देशाचा लोकसंख्या वाढीचा दर अधिक असतो; तेव्हा, त्या देशाची लोकसंख्या वाढत जाते आणि त्याचे परिणाम चांगले शिक्षण, चांगले आरोग्य, पिण्यासाठीचे चांगले पाणी आणि एकूण जीवनमान हे कोसळते. त्यामुळे, जगाच्या लोकसंख्या वाढीचे प्रमाण आपण पाहिले, तर, ते गरीब आणि अविकसित देशांमध्ये अधिक आहे. भारत आणि चीनची तुलना जर केली तर, भारतातील लोकसंख्या वाढीचा दर आजही चीनपेक्षा अधिक आहे. आशियाई, आफ्रिका आणि लॅटिन अमेरिकन देशांचा जर विचार केला तर, युरोप आणि अमेरिकन देशांपेक्षा आशिया आफ्रिका आणि लॅटिन अमेरिका या देशांमधील लोकसंख्येची घनता अधिक आहे. कोणत्याही देशाला अर्धा टक्के पेक्षा अधिक लोकसंख्या वाढीचा दर परवडू शकत नाही. लोकसंख्येचा सिद्धांत मांडणारे शास्त्रज्ञ थॉमस माल्थस यांनी लोकसंख्या वाढीचा दर कुठल्याही परिस्थितीत हा अतिशय कमी केला गेला पाहिजे, असा सिद्धांत मांडला होता. त्या सिद्धांताला आजही जगाच्या शास्त्रीय सिद्धांतामध्ये सर्वोच्च स्थान आहे. असे असताना भारतामध्ये मात्र सातत्याने लोकसंख्या वाढीसाठी प्रोत्साहन देण्याचा विषय, खासकरून संघातील संघटना किंवा संघप्रमुखांकडून वारंवार होतो. बऱ्याच वेळा यामध्ये हिंदू-मुस्लिम हे दोन भेद करून हिंदूंना लोकसंख्या वाढीला प्रोत्साहन देऊन, त्यांना अशास्त्रीय विचारांच्या गर्तेत लोटलं जातं. मुलांची संख्या जर एक पेक्षा अधिक वाढली तर, त्यांना गुणवत्तायुक्त शिक्षण देता येत नाही. आरोग्याच्या सुविधा देता येत नाही. पिण्याचे चांगले पाणी आणि चौरस आहार देता येत नाही. या अभावी मुलांचे आरोग्य कोसळते. राहणीमान कोसळते आणि परिणामी त्यांना बौद्धिक क्षमता आणि शारीरिक क्षमता या दोन्ही गोष्टींच्या विकासाला मुकावे लागते. लोकसंख्या वाढीने सत्ता हातात येते किंवा लोकसंख्या वाढीमुळे आपण जगावर राज्य करू शकतो, असा जो सिद्धांत अप्रत्यक्षरीत्या संघाच्या संघटनांकडून मांडला जातो, तो अतिशय विपरीत आणि अशास्त्रीय आहे. तसे जर असते तर, मूठभर लोकसंख्या असलेले युरोपीय देश आणि जगाच्या लोकसंख्येच्या तुलनेने खूप कमी लोकसंख्या असलेला अमेरिकेसारखा देश हे जगाच्या नकाशावर महासत्ता म्हणून विराजमान झाले नसते. त्यामुळे लोकसंख्या वाढीचे प्रोत्साहन देऊन हिंदू समाजातील बहुजन समाजाला अशास्त्रीय विचारांकडे अवैज्ञानिक विचारांकडे नेण्याची भूमिका संघ आणि संघप्रमुखांनी निश्चितपणे टाळली पाहिजे. कारण, भारतीय समाजामध्ये बहुजन समाज हा अजूनही मागासलेला समाज म्हणून ओळखला जातो आणि त्याचे कारण या समाजाच्या कुटुंबांमध्ये वाढलेली लोकसंख्या. त्यामुळे, दर्जायुक्त शिक्षण त्यांना न दिल्या गेल्यामुळे त्यांची लोकसंख्या अजूनही श्रमाच्या कामावर जगते आहे. त्यांना शिक्षण आणि आरोग्य या दोन्ही गोष्टींपासून वंचित राहावं लागतं. त्यामुळे, बहुजन समाजाला अशा अवैज्ञानिक विचारांची प्रेरणा संघप्रमुखांनी देऊ नये हे वास्तव त्यांनी खरंतर अमलात आणायला हवं!

COMMENTS