आवश्यक असणाऱ्या २७० काॅलेजियम मधून डोनाल्ड ट्रम्प यांना आघाडी मिळाल्याने, कमला हॅरिस यांचा पराभव झाला, हे निश्चित झाले. ट्रम्प एक टर्म पूर्ण कर
आवश्यक असणाऱ्या २७० काॅलेजियम मधून डोनाल्ड ट्रम्प यांना आघाडी मिळाल्याने, कमला हॅरिस यांचा पराभव झाला, हे निश्चित झाले. ट्रम्प एक टर्म पूर्ण करून मधला गॅप घेऊन पुन्हा राष्ट्राध्यक्ष पदी विराजमान होत आहेत. त्यांच्या निवडून येण्याने एक बाब पुन्हा सिद्ध झाली की, अमेरिका या जागतिक महासत्ता असलेल्या देशाचे मतदार अजूनही स्त्री ला देशाच्या सर्वोच्च पदावर विराजमान करू इच्छित नाही. ही मानसिकता सनातन मानसिकतेचे प्रतीक आहे, यात वादच नाही. डोनाल्ड ट्रम्प यांनी पहिल्या टर्म मध्ये सत्ता सांभाळताच, अमेरिकन नागरिकांनी त्यांच्या विरोधात रस्त्यावर येत निदर्शने केली होती. अमेरिकन मतदार किंवा जनता कोणत्याही चुकीच्या गोष्टी विरोधात रस्त्यावर यायला कचरत नाही. ट्रम्प यांना भांडवलदार सत्ताधीश मानले जात असले तरी, त्यात नाविन्य असे काही नाही. मुळातच, अमेरिका हा देश भांडवलशाही चा देश असून त्यांनी जगातील अनेक देशांत ८० ते ९० च्या दशकात दादागिरी करून जगाला भांडवलशाहीचा स्वीकार करायला भाग पाडले. त्याच अमेरिकेत निस्सीम भांडवलशाही आणणाऱ्या ट्रम्प यांच्या आर्थिक धोरणांना अमेरिकन जनतेचा विरोध आहे, असे मानण्याचे कारण नाही. ट्रम्प यांचे जीवन हे विलासी असल्यामुळे आणि वैयक्तिक जीवनात पाळावयाची नैतिकता ट्रम्प पाळत नसल्याने त्यांच्या विरोधात वातावरण होते. परंतु, अमेरिकन मतदार अजूनही स्त्री ला राष्ट्राध्यक्ष करायला उत्सुक नसल्याने, त्यांचे नकारात्मक मतदान ट्रम्प यांना गेले. जगाच्या बलाढ्य लोकशाहीमध्ये अशा प्रकारची विचारसरणी असणं, ही विकसित देशातील मागासलेल्या विचारसरणीचे द्योतक असल्याचे स्पष्टपणे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही. ट्रम्प हे जागतिक भांडवलदार शक्तींना ताकद देणारे असले तरी, प्रामुख्याने ते अमेरिकेच्या भोवती सर्व जगाला गुरफटवून टाकणारी अर्थव्यवस्था उभी करण्याचा प्रयत्न करत असतानाच, जगभरातील नागरिकांना किंवा युवाशक्तीला अमेरिकेत रोजगार मिळणार नाही; याची तजवीच ते व्हिसा कायद्यानुसार करू इच्छित आहेत. हीच बाब जागतिकीकरणाच्या धोरणाला अडसर आहे. जे जागतिकीकरणाचे धोरण अमेरिकेने जगावर लादले, त्याच धोरणाला आता अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष जर स्वीकारणार नसतील तर, झालेले जागतिकिकरण आणि त्याचे जगावर झालेले दुष्परिणाम, या सगळ्यांना अमेरिका जबाबदार आहे. अशावेळी ट्रम्प जगाच्या युवकांना आपल्या देशाची प्रवेशद्वारे जर बंद करत असतील, तर, ते निश्चितपणे अमेरिकेच्या संदर्भामध्ये जगाच्या विचारसरणीला बदलणारे ठरेल, यात मात्र शंका नाही. डोनाल्ड ट्रम्प हे निवडणार नाही, अशीच जगभरात वाच्यता होती. परंतु, तेथील निकाल आल्यानंतर ते अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष म्हणून येत्या जानेवारी महिन्यात शपथ ग्रहण करतील. नेमकं काय या निवडणुकीमध्ये झालं, असा जर आपण विचार करायला गेलो तर, निश्चितपणे काही बाबी अजून पुढे यायच्या बाकी आहेत. यापूर्वी, ते जेव्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले त्यावेळी त्यांनी रशियन यंत्रणांचा वापर करत निवडणुका जिंकले होते, असा आरोप त्यांच्यावर झाला होता. त्या संदर्भात त्यांची चौकशी आणि अनेक खटलेही त्यांच्या विरोधात सुरू राहिले. वर्तमान निवडणुकांमध्येही असे काही झाले आहे का, या संदर्भात अजून कोणतीही माहिती नाही. परंतु, कमला हॅरीस यांचा पराभव म्हणजे, अमेरिकन लोकशाहीला अजूनही स्त्री उमेदवार चालत नाही; याच्यावर शिक्कामोर्तब करणेच आहे. या पलीकडे याचे वर्णन अनेक काहीही होऊ शकत नाही.
COMMENTS