खरंतर देशाची राजधानी म्हटले की, तिचा विशेष लौकिक असतो. तिच्याविषयी एक प्रकारची आपुलकी असते. तिथे जाणे प्रत्येकांना हवे-हवेसे वाटते. मात्र राजधानी
खरंतर देशाची राजधानी म्हटले की, तिचा विशेष लौकिक असतो. तिच्याविषयी एक प्रकारची आपुलकी असते. तिथे जाणे प्रत्येकांना हवे-हवेसे वाटते. मात्र राजधानी दिल्लीचा लौकिक आता प्रदूषणाच्या बाबतीत अग्रेसर राज्य म्हणून होतांना दिसून येत आहे. त्यामुळे इथे शिक्षण घेणार्या आरोग्याचे, इथं नोकरी करणार्या नोकरदारांचे प्रदूषणामुळे आरोग्य धोक्यात येतांना दिसून येत आहे. प्रदूषणामुळे आपण सकाळी फिरायला जात नाही किंबहून वायू प्रदूषणामुळे सकाळी फिरायला जावू नका, अन्यथा श्वसनाचा विकार होतील असा सल्ला डॉक्टरांनीच दिल्याची कबूली सरन्यायाधीशांनी दिली होती. त्यामुळे त्यांच्या वक्तव्यातून या प्रदूषणग्रस्त राजधानीची आजच्या परिस्थितीची जाणीव होते.
जगभराचा विचार केला तर जवळपास 70 लाख लोकांचा मृत्यू हा केवळ वायू प्रदूषणामुळे होतोय. यामध्ये सहा लाखांहून जास्त मृत्यू हे बालकांचे आहेत. दिल्लीमध्ये सर्वाधिक प्रदूषण पहायला मिळत आहे. या शहरातील प्रदूषणाच्या समस्येमध्ये गेल्या काही वर्षामध्ये वाढ झाली असून त्यामुळे सर्व शाळा आणि महाविद्यालयंही काही काळापूरती बंद करावी लागतात. उद्योगधंद्यानी प्रदूषणाच्या नियमांचे पालन न करणे आणि शेजारील पंजाब, हरियाणा या राज्यात शेतीतील पराली म्हणजेच उत्पादन काढल्यानंतर उरलेला पालापाचोळा जाळला जातोय. त्यामुळे दिल्लीच्या प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. खरंतर राजधानीतील प्रदूषण ही समस्या एका दिवसांत निर्माण झालेली नाही. तर दीड दशकांपासून हा प्रदूषणाचा विळखा राजधानी दिल्लीभोवती घट्ट होत आहे. यातून अनेक दिवस शाळा बंद ठेवण्याची नामुष्की ओढवली होती. तसेच रस्त्यांवर जास्त वाहने धावणार नाही, त्यासाठी आज सम क्रमांक असलेले उद्या विषम क्रमांक असलेले वाहने धावतील अशी व्यवस्था करावी लागली होती, तरीही राजधानीतील प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यात सरकारला अपयश आलेले आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे प्रदूषणाविषयी गांभीर्याने दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. राष्ट्रीय राजधानीत शनिवारी प्रचंड धुकं जमा झाले होते. तिथे हवेची गुणवत्ता 363 एक्यूआयसह ‘अत्यंत खराब’ श्रेणीत राहिली. तर आणखी काही भाग गंभीर झोनमध्ये आले. जवळजवळ सर्व हवामान निरीक्षण केंद्रे रेड झोनमध्ये होती. जहांगीरपुरी मॉनिटरिंग स्टेशनने 418 वर गंभीर वायु गुणवत्ता निर्देशांक नोंदवला, तर विवेक विहारचे वाचन 407 आणि आनंद विहारचे 402 होते. राजधानीतील प्रदूषण दिवाळीच्या दिवसांमध्ये उंच टोक गाठते, यात शंका नाही. गेल्या काही दिवसांपूर्वीच हरियाणा आणि पंजाब राज्यातील शेतकरी आपल्या शेतातील पर्हाटी जाळल्यामुळे होणार्या वायू प्रदूषणाविषयी चिंता व्यक्त करण्यात आली होती. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी घेण्यात आली. न्यायालयाने मुख्य सचिवांनी दिशाभूल माहिती दिल्यामुळे सरकारने ताशेरे ओढले आहेत. मात्र त्यामुळे हा प्रश्न सुटणारा नाही. हरियाणाच्या मुख्य सचिवांनी सर्वोच्च न्यायालयात सांगितले की, राज्यात पर्हाटी जाळण्याच्या 400 घटना घडल्या आहेत आणि राज्याने 32 एफआयआर नोंदवले आहेत. त्यांनी दिलेल्या विसंगत माहितीमुळे न्यायालयाने ताशेरे ओढले होते. यासोबतच वायू प्रदूषणाबाबत पर्यावरण संरक्षण कायद्यांतर्गत (ईपीए) नियम बनवण्यासाठी आणि जबाबदार अधिकार्यांची नियुक्ती करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दोन आठवड्यांची मुदत दिली आहे. दिल्ली-एनसीआरमध्ये सातत्याने वाढणार्या प्रदूषणामुळे सर्वोच्च न्यायालयाने कमिशन फॉर एअर क्वालिटी मॅनेजमेंटला फटकारले आहे. न्यायालयाने म्हटले-आयोगाने प्रदूषण रोखण्यासाठी कठोर अंमलबजावणी करण्यासाठी कोणतीही यंत्रणा तयार केलेली नाही. प्रदूषण रोखण्यात अपयशी ठरलेल्या अधिकार्यांवर थेट कारवाई का झाली नाही, उलट त्यांना केवळ नोटिसा बजावून उत्तरे मागितली गेली? असा सवाल न्यायालयाने उपस्थित केला आहे. वास्तविक पाहता प्रदूषण ही काही राजधानी दिल्लीपुरतीच मर्यादित समस्या नाही. तर ही समस्या जगभरात भेडसावतांना दिसून येत आहे. त्यामुळे प्रदूषण मुक्त देशासाठी व्यापक स्तरावर चळवळ सुरू करण्याची खरी गरज आहे.
COMMENTS