Homeताज्या बातम्यासंपादकीय

महादेव जानकर यांचा झटका!

 महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकांची धामधूम सुरू झाली असून, अशातच महायुतीमध्ये आणि खास करून भाजपाचे मित्र पक्ष असलेले राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते

उंदरी ते कुंभारवाडा मार्गे चंदनसावरगांव रस्ता तात्काळ दुरूस्त करा
कोयना भूकंपग्रस्त कुटुंबियांना अखेर 27 वर्षांनंतर न्याय
अनधिकृत फलक हटवण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात विनंती अर्ज

 महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकांची धामधूम सुरू झाली असून, अशातच महायुतीमध्ये आणि खास करून भाजपाचे मित्र पक्ष असलेले राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी महायुती सोडण्याची अधिकृत घोषणा केली. त्याचवेळी त्यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सर्व मतदारसंघांमध्ये म्हणजे २८८ मतदारसंघांमध्ये उमेदवार उभे करणार असल्याची घोषणा ही जाहीर केली. अर्थात, महादेव जानकर यांचे राजकारण भाजपाला पूरकच राहिलेले आहे. भाजपाशी त्यांनी आघाडी कायम ठेवली. परंतु, त्यांनी भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवण्यास मात्र कायम नकार दिला. त्याचप्रमाणे भाजपाच्या सरकारमध्ये काही काळ त्यांना मंत्रिपदाचाही अनुभव घेता आला. शिवाय, महादेव जानकर हे विधान परिषदेत आमदार म्हणूनही भाजपच्या माध्यमातूनच गेले. परंतु, निवडणुकीत अटीतटीचा सामना महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये असताना, मित्र पक्षांना समाधानकारक जागा न सोडण्याची रणनीती ही महादेव जानकर यांना डोईजड झाली;  त्यातून, त्यांनी महायुतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला, अशी तरी सध्याची परिस्थिती दिसते आहे. महादेव जानकर यांची राजकीय उभारणी खासकरून बहुजन विचारातून झालेली आहे. बहुजन समाज पक्षात त्यांनी दीर्घकाळ केंद्रिय कार्यकारिणीत  कार्य केलेले आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांनी बहुजन समाज पक्षाच्या माध्यमातून दीर्घकाळ काम केलेले आहे. परंतु, बहुजन समाज पक्षातून बाहेर पडल्यानंतर मात्र त्यांनी कायम भाजपासोबतच युती केली. किंवा भाजपाला पूरक असणार राजकारण केलं. त्यामुळे, दीर्घ काळ भाजपपूरक राजकारण करत असताना त्यांनी भाजप आणि भाजपच्या युतीतील पक्षांना सोडून जाणं, ही घटना महाराष्ट्राच्या राजकारणात धक्कादायक तर आहेच, परंतु, नवी समीकरणे देखील घडवणारी आहे. खास करून धनगर समाजाला राजकीय प्रतिनिधित्व मिळत नाही; ही बाब महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गेल्या दहा वर्षापासून अधिक प्रखरपणे दिसून येत आहे. त्याचा परिणाम कधी भाजपात कधी वंचित बहुजन आघाडी तर कधी महायुती असा प्रवास धनगर समाजाच्या नेत्यांचा राजकीय प्रवास झाला आहे. परंतु, अशा सगळ्याच प्रयोगातून हाती काही लागताना दिसत नाही. त्यामुळे स्वतंत्र राजकारण करण्याचा महादेव जानकर यांनी निर्णय घेतला असेल तर, तो निश्चितपणे महाराष्ट्राच्या नव्या राजकारणात स्वागतार्ह म्हणता येईल. कारण यातून प्रत्येक जाती घटकाचा एक राजकीय आत्मविश्वास जागा होऊन, नव्या राजकारणाच्या दिशेने समाजाला कुच करता येईल, यात मात्र शंका नाही. महाराष्ट्र विधानसभा  निवडणुका या अतिशय चुरशीच्या होतील, यातही शंका नाही. पण, त्याच वेळी या निवडणुकांमधून जो जी आघाडी सत्तेत येईल ती देखील अतिशय काठावरच्या बहुमतात येईल असा विश्वासही महाराष्ट्राच्या राजकारणासंदर्भात व्यक्त केला जात आहे. महायुती आणि महाविकास आघाडी याच्यामध्ये तीन प्रमुख पक्ष दोन्ही बाजूला आहेत. महायुतीमध्ये भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिवसेना एकनाथ शिंदे गट, एका बाजूला तर महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस, शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट असे हे तीन तीन पक्ष दोन्ही बाजूला आहेत. परंतु, या व्यतिरिक्त महाराष्ट्रामध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष, वंचित बहुजन आघाडी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी, शेतकरी कामगार पक्ष या अनेक पक्षांची स्वतंत्र आघाडी आहे. त्यामध्ये आता महादेव जानकर यांचा राष्ट्रीय समाज पक्ष, बच्चू कडू यांचा प्रहार, राजू शेट्टी यांचा स्वाभिमानी पक्ष, अशी अनेक पक्ष महाराष्ट्राच्या राजकारणात जनतळ घेऊन आहेत. हे पक्ष देखील आपापल्या मतदारसंघांमध्ये राजकीय निकालांवर मोठा परिणाम करतात; हे विसरून चालता येणार नाही. त्यामुळे, या पक्षांची जर एक स्वतंत्र आणि वेगळी आघाडी तयार झाली तर, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक वेगळा झंझावात आल्याशिवाय राहणार नाही.

COMMENTS