Homeताज्या बातम्यासंपादकीय

सभा दणाणल्या, माणूस हरवला!

भारतीय समाजात सण आणि उत्सव हे माणसांमधील प्रेम आणि स्नेह वृद्धिंगत करणारे प्रतीक आहे. कधी तो संस्कृती उत्सव असतो, कधी तो कृषी उत्सव असतो, तर, कधी

सत्ताधारी मराठांच्या दुर्लक्षामुळे मराठा आरक्षण प्रलंबित! 
तर, समान नागरी कायद्याचा बडगा येणार!
महाराष्ट्रात दुर्लक्षित, केंद्रात मजबूत ! 

भारतीय समाजात सण आणि उत्सव हे माणसांमधील प्रेम आणि स्नेह वृद्धिंगत करणारे प्रतीक आहे. कधी तो संस्कृती उत्सव असतो, कधी तो कृषी उत्सव असतो, तर, कधी तो इतिहासाचा उत्सव असतो. अशा या सर्व उत्सवातून माणसं जोडले जाऊन त्यांच्यातलं प्रेम-स्नेह, मैत्री वृद्धिंगत होऊन समाज शांततेच्या दिशेने जाऊन बंधूतेच्या वातावरणात नांदतो. व्यक्तीचा समाजाचा आणि पर्यायाने देशाचा विकास आणि उत्थान साधनारी ही प्रक्रिया निरंतर चालत आली आहे. परंतु, गेल्या काही वर्षापासून या सगळ्या परंपरेला एक प्रकारे ग्रहण लागलं की काय, अशी सांशकता मनात निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. काल, महाराष्ट्राच्या भूमीवर अनेक सभा दणाणल्या. या सभांमध्ये माणसं मोठ्या प्रमाणात आली. एका बाजूला नागपूर मध्ये संघ शस्त्रांची पूजा करत असताना आणि आता हिंदूंनी डरपोक राहू नये, असं मार्गदर्शन करताना त्यांनी एक प्रकारे समाज हिंसकतेकडे नेण्याची अघोषित प्रक्रिया सुरू केली. त्याच नागपूर शहरात दुसऱ्या बाजूला जगाला शांती देणाऱ्या बुद्धाचा धम्म स्वीकारलेल्या  धम्मदीक्षा भूमीवर लाखोंचा अनुयायी जगभरातून लोटला; जो शांतीचा संदेश देत होता. दुसऱ्या बाजूला, अनेक गडांवर सभा झाल्या. या सभांमध्ये सामाजिक प्रश्न जरी सांगितले गेले असले तरी, त्यामागे राजकारण ही मोठ्या प्रमाणात होतं. नारायण गडाची सभा असेल, भगवानगडावरची सभा असेल या प्रत्येक सभेमध्ये आमचं आणि आमचं एवढंच वक्तव्य ऐकायला आलं. मुंबईसारख्या महानगरामध्ये एका सेनेचे झालेल्या दोन सेना आणि त्यांच्या दोन मैदानावर झालेल्या सभा. एक परंपरागत झालेली शिवाजी पार्कवर ची सभा आणि दुसरी अलीकडेच परंपरा निर्माण होत असलेल्या शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सेनेची आझाद मैदानावरील सभा. त्याचवेळी महाराष्ट्राच्या इतर भागांमध्ये म्हणजे भगवानगडावर झालेली सभा आणि नारायण गडावर झालेली सभा या सगळ्याच सभांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात दणाणून आवाज केला. परंतु, प्रत्येक सभेच्या मुख्य विषयातून माणूस हा घटकच गायब होता. दारिद्र्य, शिक्षण, आरोग्य, रोजगाराची चिंता या महाराष्ट्रियन माणसांच्या चिंतेवर कोणतेही चिंतन या सभांमधून उमटले नाही. उमटली तर ती एकमेकांच्या विरोधातली राजकीय असूया! या सभांनंतर कदाचित, आज-उद्या महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका घोषित होतील. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरच या सर्व सभा झाल्या. त्यांच्यातील नेत्यांची जी भाषण झाली, त्या भाषणांमधून एकमेकांवर केवळ टीका आणि टीकाच ऐकायला आली. त्यामुळे, केवळ राजकीय स्पर्धेच्या अनुषंगाने एक प्रकारे निवडणुकांच्याच सभा होत्या काय, असा संशय मनात निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. वास्तविक, महाराष्ट्रातला माणूस हा संत चळवळीपासूनच शांतता प्रिय, कृषी श्रमातून समृद्ध होण्याचा मार्ग स्वीकारण्याची त्याची पारंपरिक कृती, औद्योगिक क्रांतीनंतर महाराष्ट्रात उभारल्या गेलेले उद्योग आणि त्यानंतर उर्वरित महाराष्ट्राच्या अनेक नगरांमध्ये त्या उद्योगांची प्रेरणा घेऊन निर्माण झालेले उद्योग, यामुळे उद्योगप्रिय महाराष्ट्र हा रोजगार निर्माण करणारा महाराष्ट्र कधीकाळी ठरला. परंतु, गेल्या काही काळापासून तरुणांच्या हाताला रोजगार नाही, श्रमिकांना काम नाही, शेतकऱ्यांना दाम नाही महिलांना सुरक्षितता नाही, समाजात बंधुता नाही, अशा अगदी विरोधाभासी निर्माण झालेल्या या परिस्थितीत, माणूस हरवत चाललाय! या हरवलेल्या माणसाला एकमेकांच्या विरोधात उभे करण्याची संस्कृती निर्माण करण्याचं कामच राजकीय पटलावरून केलं जात आहे. हरवलेला माणसाला माणूस आणि मानवतेच्या दिशेने नेण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करायला हवा. सुजलाम-सुफलाम, विकसित अशा सर्व विकासाच्या टप्प्यांवर माणूस आतून बाहेरून शांत असल्याशिवाय समाज सुखनैव नांदू शकत नाही; याची जाणीव तमाम नेत्यांनी ठेवल्याशिवाय ना राजकीय यश आहे ना मानसिक शांती!

COMMENTS