निघोज प्रतिनिधी : राज्याचे जागृत देवस्थान असलेल्या मळगंगा देवीच्या दर्शनासाठी निघोज तसेच चार किलोमीटर अंतरावर असलेल्या जगप्रसिद्ध रांजणखळगे परिसर
निघोज प्रतिनिधी : राज्याचे जागृत देवस्थान असलेल्या मळगंगा देवीच्या दर्शनासाठी निघोज तसेच चार किलोमीटर अंतरावर असलेल्या जगप्रसिद्ध रांजणखळगे परिसरातील कुंड माऊली मळगंगा देवीच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भावीकांनी गर्दी केली होती. पहाटे महापूजा,सकाळी सहा वाजता महाआरती व त्यानंतर गाव व परिसरातील तसेच नगर, पुणे व मुंबई येथून तसेच राज्यातील विविध भागांतून आलेल्या भावीकांनी मळगंगा देवीच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. यावेळी मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्ट, निघोज ग्रामस्थ व मुंबईकर मंडळ तसेच कुंडावरील नवरात्र उत्सव मंडळाने भावीकांना दर्शन घेण्यासाठी दर्शन रांगेची व्यवस्था केली होती. दोन्ही ठिकाणी पारनेर पोलीसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. यावेळी महिला पोलिस, होमगार्ड व पोलीस कर्मचारी यांनी परिश्रम घेत गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी चोख बंदोबस्त ठेवून भावीकांना सुखसुविधा पुरविण्यासाठी परिश्रम घेतले. गावातील व कुंडावरील मंदीरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. दोन्ही ठिकाणी प्रसादाचे व नारळांच्या दुकाणदारांनी गर्दी केली होती. मळगंगा महिला बचत गट व तेजस्वीनी महिला बचत गटाच्या पदाधिकारी व सदस्य यांनी भावीकांना उपवासाचे पदार्थ स्वस्त दरात उपलब्ध करून दिले होते. दररोज दुपारी मळगंगा मंदीरासमोर दुपारी तीन ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत पांढरकरवाडी, जवळा, गाडीलगाव, निघोज येथील पंचक्रोशीतील भजनी मंडळाने भजन संध्याचे आयोजन करीत देवी महात्म्यावर भजने गात धार्मिक वातावरण निर्माण केले आहे. रात्री दांडिया स्पर्धांचे नियोजन करण्यात येत असून महिलांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. तसेच जगप्रसिद्ध रांजणखळगे परिसरात कुंड माऊली मळगंगा देवीच्या दर्शनासाठी आलेल्या भावीकांसाठी कुंड माउली नवरात्र उत्सव मंडळाने प्रवचनाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच आलेल्या सर्व भावीकांना खिचडी महाप्रसादाचे वाटप करुण थंड पाणी पिण्याची व्यवस्था करण्यात आली राज्यातील जागृत देवस्थान म्हणून मळगंगा देवीचा महिमा राज्यात असून गाव व कुंडावर भावीकांनी दिवसभर दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. नवरात्र उत्सवात गेली सहा दिवसांच्या गर्दीचा उच्चांक मोडीत बुधवारी सातव्या माळेला मोठ्या संख्येने गर्दी झाली होती. नवरात्र उत्सवाचे नियोजन करण्यासाठी निघोज ग्रामस्थ व मुंबईकर मंडळ, मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्ट, निघोज ग्रामपंचायत, मळगंगा देवी यात्रा उत्सव समीती तसेच कुंड माऊली नवरात्र उत्सव मंडळ, दांडीया गरबा समीती, विविध समाजसेवी संघटना यांनी मोठ्या प्रमाणात परिश्रम घेतले.
COMMENTS