छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलाकडून तब्बल 31 नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे. त्यामुळे नक्षलवाद अजूनही पुरता संपल्याचे दिसून येत नाही. नक्षलवाद्यांची आर
छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलाकडून तब्बल 31 नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे. त्यामुळे नक्षलवाद अजूनही पुरता संपल्याचे दिसून येत नाही. नक्षलवाद्यांची आर्थिक नाकेबंदी केल्यास ही चळवळ मोडीत निघेल असा कयास होता, मात्र अजूनही ही चळवळ तग धरून असल्याचे दिसून येत आहे. गेल्या काही वर्षांपासून विविध राज्यातील राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या प्रयत्नातून नक्षलवादाचा बिमोड करण्यासाठी अथक प्रयत्न सुरू असल्याचे दिसून येत आहे. लोकसभा निवडणुकीच्या काही दिवसाआधीपासूनच नक्षलवाद वर डोके काढू नये, यासाठी विशेष प्रमाणावर व्यापक जनजागृती करत सुरक्षा दलाच्या जवानांनी चोख व्यवस्था ठेवली होती. त्यानंतर परवाच छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलाच्या तब्बल 1000 हजार जवानांनी 31 नक्षलवाद्यांचा खात्मा करत अभूतपूर्व यश मिळवले आहे. त्यामुळे नक्षलवाद्यांचा बिमोड करण्याच्या जवळपास आपण पोहोचलो असले तरी, या चळवळीचे राजधानी दिल्लीसह अनेक शहरात जाळे विस्तारलेले आहे. त्यामुळे संपूर्ण नक्षलवाद्यांचे जाळे उद्धवस्त करण्याची खरी गरज आहे. तरच नक्षलवादांचा बिमोड करणे शक्य होणार आहे. नक्षलवादाचा उगम आणि त्याची आजची स्थिती समजून घेण्याची गरज आहे. पश्चिम बंगालमध्ये दार्जिलिंग जिल्ह्याच्या सिलीगुडी पोटविभागात आणि हिमालयाच्या पायथ्याशी नक्षलबारी हा सु. 207 चौ. किमी.चा प्रदेश आहे. या भागात एकूण 60 खेड्यांचा अंतर्भाव होतो. तेथील वस्ती बव्हंशी संथाळ, ओराओं, मुंडा आणि राजवंशी या आदिवासी जमातींची आहे. मे 1967 मध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नक्षलबारी शाखेने मध्यवर्ती पक्षाला डावलून येथे आदिवासींचा सशस्त्र उठाव केला. नक्षलवादी उठावाची ही सुरुवात होती. ‘सशस्त्र क्रांतीने सत्ता संपादन’ आणि ‘माओ-त्से-तुंग हे आमचे प्रमुख’ या त्यांच्या घोषणा आणि चिनी सरहद्दीची समीपता यांमुळे नक्षलवादी उठावाकडे सर्व देशांचे लक्ष वेधले गेले. या उठावामागील विचारप्रणाली नक्षलवाद म्हणून ओळखली जाते. नक्षलवादी उठावांच्या एकंदर पाच अवस्था आढळून येतात. पहिली अवस्था म्हणजे प. बंगालमध्ये संयुक्त आघाडीचे सरकार अधिकारावर असताना झालेला उठाव ही होय. हा उठाव दोन महिने टिकला. जुलै 1967 मध्ये पोलिसांनी या बंडाचा बीमोड करून त्याचे सूत्रधार चारू मजुमदार व प्रत्यक्ष संचलन करणारे नेते कनू संन्याल व जंगल संथाळ यांना अटक केली. तीन महिन्यांनंतर त्यांना सोडून देण्यात आले. दुसर्या अवस्थेत नोव्हेंबर 1968 मध्ये आंध्र प्रदेशात श्रीकाकुलम् भागात असाच आदिवासी उठाव करण्यात आला. एप्रिल 1969 मध्ये उत्तर प्रदेश, बिहार, पंजाब, केरळ इ. राज्यांत अस्तित्वात आलेल्या नक्षलवादी गटांना एकत्र करून त्यांचा मार्क्सवादी-लेनिनवादी कम्युनिस्ट पक्ष हा स्वतंत्र पक्ष स्थापन करण्यात आला. मुख्यतः शेतकर्यांच्या द्वारा ग्रामीण भागांत सशस्त्र लढे करून सत्ता काबीज करणे, हे या पक्षाचे ध्येय होते. संसदीय कार्यपद्धतीला तसेच जनसंघटना व जनआंदोलन यांना त्यांचा तीव्र विरोध होता. चारू मजुमदार हे या पक्षाचे मुख्य सैद्धांतिक होते. माओ-त्से-तुंग आणि चीनचा कम्युनिस्ट पक्ष यांच्याशी संपूर्ण एकनिष्ठ राहणे व माओच्या विचारानुसार भारतात क्रांती करणे, ही नक्षलवादाची प्रमुख तत्त्वे होती. या तत्वांपासून सुरू झालेला नक्षलवाद अजूनही संपलेला नाही. एकीकडे दहशतवाद्यांकडून ज्याप्रकारे तरूणांची माथी भडकाविण्याचे काम केले जाते, त्याचप्रकारे नक्षलवाद्यांकडून समतेची भाषा करत सशस्त्र क्रांतीची भाषा बोलली जाते. आजमितीस देशाला स्वातंत्र्य मिळून 75 पेक्षा अधिक वर्षांचा कालावधी लोटला आहे, त्याचबरोबर आदिवासी भागात बहुतांश सुधारणा करण्यात आल्या आहेत, तरीही आपण इथल्या आदिवासी बांधवांना आपलेसे करू शकलेलो नाही, त्यामुळे आदिवासी बांधवांचा फायदा घेऊन नक्षलवादी आपले हात-पाय पसरवतांना दिसून येत आहे, आणि त्याला साथ शहरातील अर्बन नक्षलवाद्यांची साथ भेटल्यामुळेच हा नक्षलवाद फोफावतांना दिसून येत आहे. त्यामुळे नक्षलवाद्यांची पाळेमुळे खणून त्यांची आर्थिक नाकेबंदी करण्याची खरी गरज आहे.
COMMENTS