Homeताज्या बातम्यासंपादकीय

बदलती जीवनशैली आणि तणाव !

आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात मानवी जीवनशैलीत प्रचंड बदल झाल्याचे दिसून येत आहे. काही दशकांपूर्वी रात्री 8 किंवा जास्तीत-जास्त 9 वाजेपर्यंत

शेतकर्‍यांची कोंडी
सुवर्णकन्येचा संघर्ष
समतेच्या विचारांचे पाईक

आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात मानवी जीवनशैलीत प्रचंड बदल झाल्याचे दिसून येत आहे. काही दशकांपूर्वी रात्री 8 किंवा जास्तीत-जास्त 9 वाजेपर्यंत ग्रामीण भाग, निमशहरी भाग शांत झोपी जात असे. मात्र हल्लीच्या काही दशकांपासून महानगरीय शहरे तर रात्रभर सुरू असतात, त्याचप्रमाणे कार्पोरेट क्षेत्रातील वर्ग तर रात्री 2 किंवा 3 वाजता झोपी जातो आणि पुन्हा 7 वाजता उठून कामाला जातो. या चक्रामुळे तणाव वाढत असल्याचे दिसून येत आहे. याच कामाच्या तणावातून सीए असलेल्या 26 वर्षीय तरूणीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. खरंतर या बातमीकडे दुर्लक्ष करता येणार नाही. कारण आजमितीस सेवा क्षेत्रातील प्रत्येक क्षेत्रात कामाचा तणाव मोठा आहे, तो कमी जास्त असेल मात्र तणाव आहे, हे मान्यच करावे लागेल. खरंतर आनंददायी शिक्षण असावे ही संकल्पना आपण जितक्या जोरकसपणे मांडतो तितक्याच प्रमाणात आपण आनंददायी जॉब असावा यासाठी लक्ष देण्याची खरी गरज आहे. कार्पोरेट क्षेत्रात अनेक प्रोजेक्टवर काम करावे लागते, तो प्रोजेक्ट वेळेत पूर्ण करण्यासाठी मग रात्रीचे दिवस करावे लागतात. अशावेळी कर्मचार्‍यांना मोठ्या मुश्किलीने 2-3 तास झोप मिळते. यातून ह्दयावर ताण येतो, मानवी मेंदू थकतो, त्यातून अनेक समस्या निर्माण होतात, त्यातून हद्यविकारामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण देखील वाढले. त्यामुळे कॉर्पोरेट क्षेत्रात आनंनदायी काम होण्यासाठी आता व्यापक चळवळ राबविण्याची खरी गरज आहे. यासंदर्भात ज्या सीए तरूणीचा मृत्यू झाला त्या अ‍ॅना सेबॅस्टियन पेरायिलची आई अनिता ऑगस्टीन यांनी ईवाय इंडियाचे चेअरमन राजीव मेमाणी यांना पत्र लिहून यासंदर्भातील कैफियत मांडली आहे. माझी मुलगी माझे विश्‍व होते, मात्र अवघ्या 26 व्या वर्षी तिचा मृत्यू झाल्यामुळे मला चटका बसला आहे, तो चटका तो त्रास इतरांना होवू नये म्हणून या आईने लिहिलेले पत्र खूपच बोलके आहे. या पत्राच्या निमित्ताने तिने आपली मुलगी उशीरा रात्री घरी यायची, यामुळे ती इतकी थकलेली असायची की, आहे त्याच कपड्यात झोपी जायची. खरंतर या कामाच्या तणावामुळे तिला वेळेवर जेवण मिळत नव्हते. त्यामुळे आपण मृगजळाच्या मागेतर धावत नाही ना, याचा विचार करण्याची खरी गरज आहे. तणावाशी योग्य प्रकारे जुळवून घेण्याची खरी गरज आहे. त्या तणावाला मनावर अधिराज्य मिळवू देण्याला प्रतिरोध करण्याची खरी गरज आहे. त्यासोबत आरोग्याची काळजी देखील घेणे महत्वाचे आहे. किमान 6-7 तास झोप, वेळेवर जेवण, सकाळी फिरायला जाणे किंवा योगा करणे या बाबींचा समावेश दररोजच्या क्रमात असायला हवा. मात्र या बाबींकडे आजची पिढी सर्रास दुर्लक्ष करतांना दिसून येत आहे. नुकत्याच काही महिन्यापूर्वी प्रकाशित झालेल्या एका अहवालात म्हटले आहे की, भारतातील तब्बल 86 टक्के भारतीयांना असे वाटते की, ते त्यांच्या कामाच्या ठिकाणी संघर्ष करत आहेत किंवा कामाच्या कार्यसंस्कृतीमुळे तणावात आहेत. केवळ 14 टक्के भारतीयांना असे वाटते की, त्यांना आपल्या कामात आनंद मिळत आहे. त्यामुळे प्रत्येक कार्यालयात तणाव आहे. या तणावाला दूर सारण्याची खरी गरज आहे. या तणावामुळे आपण जीवनातील आनंद, आरोग्य हरवून बसतो. याच तणावामुळे अनेक व्याधी आपल्या मागे लागतात. याच तणावातून सुटण्यासाठी मग आपण धुम्रपान, मद्यपान, अमली पदार्थाच्या सेवनांकडे कल वाढतो आणि आपण आपले आरोग्य आणि शरीराचा नाश करून बसतो. खरंतर आपण जे श्रम करतो आहे, ते कशासाठी याचा विचार करणे गरजेचे आहे. तणावाचा जसा आरोग्यावर परिणाम होतो तसाच परिणाम कौैटुंबिक स्तरावर देखील होतो, त्यातून मानवी नातेसंबंध बिघडत जातात. त्यामुळे तणाव मानवी जीवनातून हद्दपार करण्याची खरी गरज आहे.

COMMENTS