विटा / प्रतिनिधी : खानापूर तालुक्यातील नेवरी हद्दीत सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी अचानक छापा टाकून रोख रकमेसह सात संशयितांकडून 6 दुचाकी
विटा / प्रतिनिधी : खानापूर तालुक्यातील नेवरी हद्दीत सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी अचानक छापा टाकून रोख रकमेसह सात संशयितांकडून 6 दुचाकी गाड्या आणि एक चारचाकी गाडी असा एकूण 11 लाख 14 हजार रुपयांचा मुद्दे माल जप्त केल्याची माहिती पोलीस उपविभागीय अधिकारी विपुल पाटील यांनी दिली.
याबाबत पोलीस उपविभागीय अधिकारी विपुल पाटील म्हणाले , नेवरी गावच्या हद्दीत राहुल महाडिक यांच्या शेतातील पत्र्याच्या उघड्या शेडमध्ये पत्त्यांचा क्लब सुरू असल्याची माहिती आम्हाला मिळाली. ही माहिती समजताच कडेगाव पोलीस पथकांसह तिथे छापामारी केली.
यावेळी मायाक्कानगर येथील अक्षय सुनील धुमाळ (वय 22), प्रशांत संजय घोरपडे (वय 26), नेहरूनगर भागातील अमित महेश भिंगारदेवे (वय 24), खानापूर तालुक्यातील गार्डी येथील साईराज नंदकुमार बोडरे (वय 34), बिरजू दिनेश पंडित (वय 29) हे कडेगाव येथील नाथा सुदाम गुरव (वय 40) हे सहाजण महेश अर्जुन लिमकर (वय 35) यांच्या सांगण्यावरून तीन पानी पत्त्याच्या पानावर पैसे लावून जुगार खेळ खेळत होते. पोलिसांनी त्यांना रंगेहाथ पकडून ताब्यात घेतले आहे.
यावेळी अक्षय धुमाळकडे आठ हजार रुपये रोख व हातातील तीन पत्त्याची पाने, प्रशांत घोरपडे, साईराज बोडरे, अमित भिंगारदेवे, बिरजू पंडित, नाथा गुरव यांच्याकडे एकूण 54 हजार रुपये रोख तसेच 40 हजार रुपये किंमतीच्या एकूण पाच दुचाकी आणि 70 हजार रुपये किमतीची एक दुचाकी आणि 8 लाख रुपये किंमतीची चारचाकी असे मिळून 11 लाख 14 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. संशयिताविरोधात महाराष्ट्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी विट्याच्या उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय येथे प्रतिनियुक्तीवर असलेले पोलीस श्रीकांत कुंभार यांनी फिर्याद दिली आहे.
COMMENTS