Homeताज्या बातम्यासंपादकीय

पदकांचा दुष्काळ

जगातील सर्वाधिक लोकसंख्या असणार्‍या आणि जगातील पाच प्रमुख अर्थव्यवस्थेत गणल्या गेलेल्या देशाला ऑलिपिंकमध्ये पदकांसाठी झगडावे लागते, यासारखी दुर्द

विकासांच्या मुद्दयांना बगल
निकालापूर्वीच ठिणगी
आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी

जगातील सर्वाधिक लोकसंख्या असणार्‍या आणि जगातील पाच प्रमुख अर्थव्यवस्थेत गणल्या गेलेल्या देशाला ऑलिपिंकमध्ये पदकांसाठी झगडावे लागते, यासारखी दुर्देवी बाब नाही. ऑलिपिंकमधील ही व्यथा आजची नाही तर, गेल्या अनेक दशकांपासून हा कित्ता तसाच सुरू आहे. यात खेळाडूंचे अपयश नाहीच, तर हे अपयश व्यवस्थेचे आहे. त्यामुळे पदकांचा दुष्काळासाठी खेळाडू जबाबदार नसून ही व्यवस्था जबाबदार असल्याचे दिसून येते. पॅरिस ऑलिपिंकसाठी तब्बल 117 खेळाडूंनी सहभाग नोेंदवला आणि केवळ 6 पदके आपल्या हाती आली. त्यातच एकही सुवर्ण नाही, हे विशेष. तसेच या मोहिमेसाठी तब्बल 470 कोटी रूपयांचा खर्च करण्यात आला. पदरी मात्र निराशाच पडली. खरंतर या स्पर्धेत भारताच्या बाजूने अनेक बाबी घडल्या नाही, हे जरी खरं असले तरी प्रतिकूल परिस्थितीचा सामना करतच खेळाडू घडत असतात. नीरज चोप्रा आणि विनेश फोगाट यांच्याकडून सुवर्णपदकाची अपेक्षा होती. मात्र ती अपेक्षा पूर्ण होवू शकली नाही. विनेश फोगाट हिचे केवळ 100 ग्रॉम वजन अतिरिक्त भरणे शंकास्पद आहे. कारण शंभर ग्रॉम वजन कमी करणे इतके अवघड नाही. असे असतांना या बाबी गंभीर आणि शंकास्पद आहे. याप्रकरणाची चौकशी होण्याची गरज आहे. याविषयी अजूनतरी विनेशने सविस्तर भाष्य केलेले नाही. त्यामुळे जोपर्यंत तिचे यावर संपूर्ण भाष्य येत नाही, तोपर्यंत यावर बोलणे योग्य होणार नाही. मात्र या संपूर्ण स्पर्धेत पदकांची वाणवा दिसून आली. मनू भाकरने दोन पदके मिळवली म्हणून नामुष्की टळली. महाराष्ट्राच्या बाबतीत बोलायचे झाल्यास 11 कोटींपेक्षा अधिक लोकसंख्या असणार्‍या या राज्यात खाशाबा जाधव यांच्यानंतर तब्बल 72 वर्षांनी आपल्याला पदक मिळाले, हेच आश्‍चर्य. त्यामुळे महाराष्ट्राच्या क्रीडा विभागाने देखील आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. महाराष्ट्रात तालुका, जिल्हा, प्रादेशिक आणि राज्य स्तरीय क्रीडा स्पर्धांना किती प्रोत्साहन दिले जाते, याकडे लक्ष देण्याची गरज आहे. खेळाडूंना मिळत नसलेल्या सुविधा, ग्राउंड उपलब्ध नसणे, याकडे राज्य सरकारने लक्ष देण्याची खरी गरज आहे.स्वप्निल कुसाळेने नेमबाजीत कांस्यपदक जिंकत महाराष्ट्राचा ऑलिम्पिक पदकाचा दुष्काळ संपवला. खाशाबा जाधव यांच्यानंतर आपल्याला असे पदक आणायला 72 वर्षे लागली. त्यामुळे हरियाणा, पंजाबप्रमाणे ऑलिम्पिकपटू घडवण्यात महाराष्ट्र का कमी पडतोय, याचे आत्मपरीक्षण केले पाहिजे. हेलसिंकीमध्ये महाराष्ट्राचे कुस्तीपटू (स्व.) खाशाबा जाधव यांनी स्वातंत्र्यानंतर देशाला पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक जिंकून दिले. त्यानंतर महाराष्ट्राला दुसरा ऑलिम्पिक पदक विजेता घडवायला 72 वर्षे लागली. आता आणखी पुढील पदक मिळवण्यासाठी किती वर्ष लागतील सांगता येत नाही, त्यामुळे आपले क्रीडा धोरण बदलण्याची गरज आहे. या स्पर्धेत सुवर्णपदके सर्वाधिक मिळवल्यामुळे अमेरिका अव्वलस्थानी कायम राहिला तर, चीन दुसर्‍या स्थानी. मात्रयाउलट भारत 71 व्या स्थानावर दिसून आला. चीन असो वा अमेरिका या देशांमध्ये खेळाडूंना लहानपणापासून योग्य असे प्रशिक्षण दिले जाते. खेळाडूंना घडवले जाते. मात्र भारतात तशा सोयी सुविधा अजूनही नाही. भारतातील बहुतांश विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण मिळत नाही, तिथे क्रीडा शिक्षणाचे तर नावच काढायला नको. जिल्हा परिषद, महानगरपालिकांच्या शाळांत कबड्डी, खो-खो वगळता इतर खेळांचे शिक्षणच दिले जात नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांची खेळांविषयीची रूची वाढत नाही. त्यातच जिल्हा आणि राज्य स्तरावर विविध खेळांविषयीचे प्रशिक्षण देणार्‍या संस्था अ‍ॅकडमी असल्या तरी त्यामध्ये शिरलेले राजकारण पाहता सुयोग्य खेळाडूंची निवड होत नाही. त्यापाठीमागे होत असलेले राजकारण, त्यामुळे अनेक उमेदवार पदकांपासून वंचित राहतात. गेल्या काही वर्षांपासून केंद्र सरकार क्रीडा क्षेत्रांसाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून देत असले तरी, त्यामध्ये होणारे राजकारण मोडीत काढण्याची खरी गरज आहे.

COMMENTS