मुंबई ः राज्यात विधानसभेचे वारे जोरदार वाहतांना दिसून येत आहे. विधानसभेमध्ये सपाटून पराभव पत्करल्यानंतर आता सर्वच पक्षांनी कंबर कसत जोरदार प्रचार
मुंबई ः राज्यात विधानसभेचे वारे जोरदार वाहतांना दिसून येत आहे. विधानसभेमध्ये सपाटून पराभव पत्करल्यानंतर आता सर्वच पक्षांनी कंबर कसत जोरदार प्रचाराला सुरूवात केली आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँगे्रसने जनसन्मान यात्रा काढत महाराष्ट्रातील किमान 150-200 विधानसभा मतदारसंघ पिंजून काढत सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न होतांना दिसून येत आहे. तर दुसरीकडे शरद पवारांच्या पक्षाने देखील शुक्रवारपासून शिवस्वराज्य यात्रा काढत संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. तर दुसरीकडे शिंदे यांच्या शिवसेनेने काही दिवसांपूर्वीच सिल्लोडमध्ये लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ करत मोठे शक्तीप्रदर्शन केले. मात्र या सर्वच पक्षांच्या तुलनेत भाजप कुठेही सक्रिय असल्याचे दिसून येत नाही.
लोकसभा निवडणुकीत भाजपला मोठा फटका सहन करावा लागला होता. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप सुक्ष्म नियोजन करून महाराष्ट्र पिंजून काढेल अशी अपेक्षा होती, मात्र भाजप अजूनही इतर पक्षाच्या तुलनेत मागे असल्याचे दिसून येत आहे. 16 ऑगस्ट रोजी भाजपचे नेते अमित शहा महाराष्ट्रात दाखल होणार आहे, त्यानंतर भाजपचे पुढील नियोजन ठरण्याची शक्यता आहे, मात्र तोपर्यंत इतर पक्ष बरीच मजल गाठण्याची शंका आहे. इतर पक्षासोबत काँगे्रस नेत्यांच्या देखील बैठका, मतदारसंघातील कल याबाबतीत सर्वेक्षण सुरू असल्याचे दिसून येत आहे. सरकारच्या महत्त्वकांक्षी ’माझी लाडकी बहीण’ योजनेच्या माध्यमातून राज्यात मतांची पेरणी करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या नेत्यांच्या ताफ्यासह महाराष्ट्राच्या दौर्यावर निघालेत. या दौर्याच्या माध्यमातून ते तळागाळापर्यंत आपला पक्ष पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या शिवस्वराज्य यात्रेला आजपासून सुरुवात झाली. यावेळी या पक्षाचे युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी अजित पवार व त्यांच्या पक्षाच्या जनसन्मान यात्रेवर निशाणा साधला. ते म्हणाले की, शरद पवारांनी 20 वर्षे ज्या नागांना दूध पाजले, तेच नाग आता त्यांना डसले. आता ते लोक (अतुल बेनके) आमच्याकडे हेलपाटे मारत आहेत. लोकसभेपूर्वी आमच्याकडे येणार्यांचे आम्ही मनापासून स्वागत केले. पण आता तिकडे उरलेले अली बाबा आणि चाळीस चोर आहेत.
चूक झाली, माफ करा; अजित पवारांची कबुली – लोकसभेला जो झटका दिला तो जोरात लागला, कंबर मोडली, आमची चूक झाली, माफ करा. जो काम करतो तोच चुकतो, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकर्यांसमोर चुकीची कबूल दिली आहे. आता कांदा निर्यात बंदी करायची नाही, वीज बिल माफ केले, असे निर्णय घेतले असल्याचे देखील अजित पवार यांनी म्हटले आहे. आम्ही अभ्यास करणारी माणसे आहोत. हवेत गप्पा मारणारे नाही. केंद्र सरकार आमच्या विचारांचे आहे. आता कांदा निर्यात बंदी करायची नाही. असे देखील अजित पवार यांनी म्हटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जनसन्मान यात्रेनिमित्त ते नाशिक जिल्ह्यातील निफाड येथे झालेल्या सभेत बोलत होते.
ज्या पक्षाला जास्त जागा, त्या पक्षाचा मुख्यमंत्री : पृथ्वीराज चव्हाण – आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी आपापल्या पक्षाची तयारी सुरू केली आहे. त्यातच उद्धव ठाकरे हे दिल्ली दौर्यावर गेले आहेत. जागा वाटप आणि मुख्यमंत्री पदाच्या चेहर्याबाबत त्यांनी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केली, अशी शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी उद्धव ठाकरे यांना सल्ला दिला आहे. आधी निवडणुकीवर लक्ष केंद्रित करा, विजयी झाल्यानंतर मुख्यमंत्री पदाच्या चेहर्याबाबत निर्णय घेतला जाईल, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे.
COMMENTS