नवी दिल्ली ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी मॉस्को येथे आयोजित एका कार्यक्रमात रशियातील भारतीय समुदायाशी संवाद साधला. भारतीय समुदायाने त्य
नवी दिल्ली ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी मॉस्को येथे आयोजित एका कार्यक्रमात रशियातील भारतीय समुदायाशी संवाद साधला. भारतीय समुदायाने त्यांचे जल्लोषात हार्दिक स्वागत केले. भारतीय समुदायाशी संवाद साधताना त्यांनी दाखवलेल्या अगत्याबद्दल पंतप्रधानांनी त्यांचे आभार मानले आणि भारत-रशिया संबंध वाढविण्यात त्यांच्या योगदानाचे कौतुक केले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ऐतिहासिक तिसर्या कार्यकाळात भारतीय समुदायाला ते पहिल्यांदाच संबोधित करत असल्याने 1.4 अब्ज भारतीयांच्या वतीने त्यांना अभिवादन करत हा संवाद खास असल्याचे मोदींनी नमूद केले.
गेल्या दहा वर्षांत भारतात झालेल्या दृश्य परिवर्तनाबद्दल अवगत करताना सर्व भारतीयांसाठी ही अभिमानाची बाब असून आपल्या तिसर्या कार्यकाळात जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणे हे सरकारचे उद्दिष्ट असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. जागतिक विकासाच्या टक्केवारीत भारताच्या आर्थिक विकासाचा असलेला लक्षणीय वाटा; त्याचे डिजिटल आणि फिनटेक यश; त्याची हरित विकास कामगिरी; आणि त्याचे प्रभावी सामाजिक-आर्थिक कार्यक्रम सामान्य लोकांना कसे सक्षम बनवतात हे त्यांनी निदर्शनास आणून दिले. भारताचे परिवर्तनीय यश हे भारताला एक विकसित देश बनवण्याचे स्वप्न पाहणार्या 1.4 अब्ज भारतीयांच्या समर्पण, वचनबद्धता आणि योगदानामुळे साध्य झाल्याचे त्यांनी अधोरेखित केले. भारत बांधिलकीच्या भावनेने, हवामान बदलाचा सामना करण्यापासून ते शाश्वत विकास उद्दिष्टे पूर्ण करण्यापर्यंत, जागतिक समृद्धीमध्ये – एक विश्वबंधू, जगन्मित्र म्हणून महत्त्वपूर्ण योगदान देत असल्याचे त्यांनी उद्धृत केले. जागतिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी भारताने घातलेली शांतता, संवाद आणि मुत्सद्देगिरीची साद प्रतिध्वनीत होत आहे यावर त्यांनी प्रकाश टाकला. पंतप्रधानांनी भारतीय समुदायाला रशियासोबत मजबूत आणि घनिष्ट भागीदारी करण्यात सक्रिय भूमिका बजावण्याकरिता प्रोत्साहित केले. कझान आणि एकाटेरेनबर्ग येथे दोन नवीन भारतीय वाणिज्य दूतावास उघडण्याच्या निर्णयामुळे लोकांमधील परस्पर संबंधांना अधिक चालना मिळेल असे त्यांनी नमूद केले. त्यांच्या या निर्णयाचे भारतीय समुदायाने टाळ्यांच्या गजरात स्वागत केले. देशातील भारतीय सांस्कृतिक परंपरांचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी आणि त्यातील चैतन्य रशियन लोकांसह सामायिक करण्यात समुदायाने केलेल्या प्रयत्नांचे त्यांनी कौतुक केले.
COMMENTS