बोठेच्या नगर मुक्कामाचा उलगडा अजून गुलदस्त्यातच ; दोषारोपपत्राचे काम अंतिम टप्प्यात

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बोठेच्या नगर मुक्कामाचा उलगडा अजून गुलदस्त्यातच ; दोषारोपपत्राचे काम अंतिम टप्प्यात

यशस्विनी महिला ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्ष रेखा जरे यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी दैनिक सकाळचा कार्यकारी संपादक बाळ ज. बोठे हा खुनाची घटना घडल्यानंतर पहिले दहा दिवस कुठे मुक्कामाला होता, याचा उलगडा अजूनही पोलिसांना झालेला नाही.

शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांचा परीक्षा कामांवर बहिष्कार
समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच
पावसाळ्यात विद्युत सुरक्षेचे नियम पाळा;अपघात टाळा!

अहमदनगर/प्रतिनिधी-यशस्विनी महिला ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्ष रेखा जरे यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी दैनिक सकाळचा कार्यकारी संपादक बाळ ज. बोठे हा खुनाची घटना घडल्यानंतर पहिले दहा दिवस कुठे मुक्कामाला होता, याचा उलगडा अजूनही पोलिसांना झालेला नाही. दरम्यान, त्याच्याविरोधात पुरवणी दोषारोपपत्र तयार करण्याची तयारी अंतिम टप्प्यात आली असून, पुढील आठवड्यामध्ये दोषारोपपत्र दाखल होणार आहे, अशी माहिती तपासी अधिकारी पोलिस उपअधीक्षक अजित पाटील यांनी दिली.

    जरे हत्याकांड प्रकरणामध्ये बोठे हा मुख्य आरोपी आहे. घटना घडल्यानंतर तो तीन महिने फरार होता. हैदराबाद येथे त्याला पकडण्यात आले. त्यानंतर त्याने पोलिस तपासामध्ये दिलेल्या माहितीनुसार घटनेनंतर पहिले दहा दिवस नगर येथील रेल्वेस्थानकावर तो राहिला असल्याचे समजले. त्यामुळे रेल्वे पोलिसांना पत्र लिहून याची माहिती मागवली होती. पण अद्याप पर्यंत ती मिळू शकलेली नाही. तसेच रेल्वे पोलिसांना पत्र देऊन तेथे बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांना जबाबसाठी बोलवले आहे. मात्र, अद्यापपर्यंत त्यांचे जबाब होऊ शकलेले नाही. पोलिसांना अजूनही त्यांची प्रतीक्षा आहे. घटनेनंतर फरार झाल्यावर 3 ते 10 डिसेंबर 2020दरम्यान नगरच्या रेल्वेस्थानकावर थांबलो असल्याचे बोठेने सांगितल्यावर पोलिसांनी आधी रेल्वेस्थानकावरील सीसीटीव्ही फुटेज शोधण्याचा प्रयत्न केला. पण तीन महिन्यांच्या कालावधीत ते नष्ट झाल्याचे समजल्यावर रेल्वे पोलिसांना जबाबासाठी बोलावले होते. पण तेही अजूनपर्यंत आलेले नाहीत. बोठेच्या रेल्वेस्थानकावरील मुक्कामासंदर्भात आणखी कोणाकडून काही माहिती मिळते का, याचाही पोलिसांनी शोध घेतला. पण त्यातही यश आले नसल्याचे समजते. दरम्यान, हैदराबादला बोठेला पकडल्यावर तेथे त्याच्या समवेत चार साथीदार होते. त्यांना सुद्धा पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेमध्ये एक महिला असून, तिचा अद्याप पर्यंत ठावठिकाणा लागलेला नाही. या प्रकरणामध्ये आतापर्यंत 11 आरोपींचा समावेश करण्यात आलेला आहे.

दोषारोपपत्र काम सुरू

बोठे याला अटक केल्यानंतर त्याच्याविरोधात आता पुरवणी दोषारोपपत्र न्यायालयामध्ये दाखल केले जाणार आहे. या संदर्भामध्ये 40 हून अधिक जणांचे जबाब घेतलेले आहेत. या जबाबांची जुळवाजुळव आता कागदोपत्री सुरू झाली आहे. अंतिम टप्प्यामध्ये आता हे काम आले असून, दोषारोपपत्र तयार होत आहे. पुढच्या आठवड्यामध्ये हे दोषारोपपत्र पारनेर येथील न्यायालयामध्ये दाखल केले जाणार आहे, असे तपासी अधिकारी अजित पाटील यांनी सांगितले.

COMMENTS