चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर कायमस्वरूपी उपाययोजना करणार : अजित पवार

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर कायमस्वरूपी उपाययोजना करणार : अजित पवार

कोकण किनारपट्टीवर आतापर्यंत चार वादळं येवून गेली. चक्रीवादळाच्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर कोकणसाठी कायमस्वरूपी संरक्षण उपाययोजना करण्याचा प्रयत्न राज्य सरकार कडून केला जात आहे.

Ukraine War: ‘आम्ही करून दाखवलं!’ , व्हिडीओ व्हायरल | LOKNews24
राज्यभर एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन
अंतर विद्यापीठ इंद्रधनुष्य स्पर्धेसाठी सगामच्या पाच विद्यार्थ्यांची निवड

अलिबाग : कोकण किनारपट्टीवर आतापर्यंत चार वादळं येवून गेली. चक्रीवादळाच्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर कोकणसाठी कायमस्वरूपी संरक्षण उपाययोजना करण्याचा प्रयत्न राज्य सरकार कडून केला जात आहे. यासाठी कुठेही निधी कमी पडता कामा नये, याची दक्षता देखील घेतली जात असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी श्रीवर्धन येथे केले. श्रीवर्धन येथील कोविड-19 बाबतच्या उपाययोजना व “ताऊक्ते” चक्रीवादळ नुकसान आढावा बैठकीत ते बोलत होते. 

    श्रीवर्धन नगरपरिषदेच्या पाणी पुरवठा प्रकल्प व बीच सुशोभिकरण करणे या कामांचे भूमीपूजन त्यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर त्यांनी श्रीवर्धन उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे जिल्ह्यातील प्रमुख अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक घेतली. यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे, पालकमंत्री आदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे, जिल्हा परिषद रायगड अध्यक्षा योगिता पारधी, आमदार भरत गोगावले, आमदार बाळाराम पाटील, आमदार अनिकेत तटकरे, जिल्हाधिकारी निधी चौधरी, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील,पोलीस अधीक्षक अशोक दुधे जिल्ह्यातील इतर प्रमुख अधिकारी, लोकप्रतिनिधी उपस्थित होते. 

अजित पवार म्हणाले की, जिथे करोना संक्रमित रुग्णांचे प्रमाण जास्त आहे अशा जिल्ह्यामध्ये आम्ही दौरा करायचे ठरविले. त्यानुसार आज जिल्ह्यातील करोनासदृष्य परिस्थितीचा आढावा घेऊन जिल्ह्यातील रुग्णालयाचे फायर ऑडिट, ऑक्सिजन ऑडिट करून घ्या,असे निर्देश संबंधितांना दिले. पनवेलला सिडकोचे व पेणला जेएसडब्लू जम्बो कोविड हॉस्पिटल कार्यान्वित करण्यासाठी तातडीने कार्यवाही करावी. करोनाची तिसरी लाट आल्यास आरोग्य सोयीसुविधांची कोणतीही कमतरता भासू नये, या दृष्टीने शासन प्रशासनाच्या सर्व स्तरावर बरोबर आहे. कालच टप्पाटप्प्याने लॉकडाऊन कमी करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यात प्रामुख्याने कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील करोना वाढीचा दर 10 टक्केच्या पुढे असल्याने येथे शिथिलता देण्यात आलेली नाही. नागरिकांचा त्रास कमी करण्याचा प्रयत्न आपण सर्वांनी मिळून करायला हवा. म्युकरमायकोसिससारख्या आजारांवरील उपचारांसाठी असलेल्या औषधांची किंमत जास्त आहे. त्यामुळे या औषधांवरील जीएसटी कमी करून नागरिकांचा त्रास कमी करण्याचा प्रयत्न शासनाने केला आहे. म्युकरमायकोसिस म्हणजेच काळी बुरशी या आजाराचे उपचार तीन प्रकारात विभागले आहे. पहिल्या प्रकारात ज्यांना खर्च शक्य नाही त्यांना सर्व शासकीय रुग्णालयात मोफत उपचार देण्यात येत आहेत. दुसऱ्या प्रकारात महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून उपचार करण्यात येत आहेत. तर तिसऱ्या प्रकारात ज्यांना खाजगी रुग्णालयात उपचार करायचे आहेत त्यांना खाजगी रुग्णालयात उपचार उपलब्ध आहेत. अशी माहिती देवून पवार पुढे म्हणाले की, ही माहिती जनतेपर्यंत पोहोचवा. कोकण किनारपट्टीवर आतापर्यंत 4 चक्रीवादळे येऊन गेली. चक्रीवादळाचा तडाखा कोकणाला सारखा बसत असून यामुळे येथे प्रचंड प्रमाणात नुकसान होत आहे. यासाठी शासनाकडून यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यात भूमिगत विद्युत केबल करणे ज्यामुळे वादळाने विद्युत खांब पडण्याचा धोकाच राहणार नाही. त्यासह कोकणात वीज पडण्याचे प्रमाण अधिक आहे, त्यावर उपाय म्हणून लायटनिंग अरेस्टर बसविण्यात येणार आहेत तर झाडे उन्मळून पडण्याचे देखील प्रमाण अधिक आहे. किनारपट्टीवर सारखे येणाऱ्या चक्रीवादळाचा तडाखा सहन करतील, अशी झाडे लावण्याचे निर्देश त्यांनी वन विभागाला दिले. अशा प्रकारच्या कायम स्वरूपी उपाययोजना करण्यासाठीचे प्रस्ताव शासनाला त्वरित सादर करण्यात यावे असे निर्देश त्यांनी संबंधितांना दिले तर यासाठी निधीची कमतरता पडणार नाही असेही आश्वस्त केले.

COMMENTS