मुळातच राष्ट्रवादी काँगे्रसमध्ये उभी फूट पडली असली तरी, अजित पवार गट सत्तेत सहभागी झाला. खरंतर ही फूट काही वैचारिक नव्हती, तशीती सत्तेच्या लालसेप
मुळातच राष्ट्रवादी काँगे्रसमध्ये उभी फूट पडली असली तरी, अजित पवार गट सत्तेत सहभागी झाला. खरंतर ही फूट काही वैचारिक नव्हती, तशीती सत्तेच्या लालसेपाटी झालेली नव्हती. त्यामागचे प्रमुख कारण म्हणजे कातडी बचाव धोरण होते, यातूनच हा पक्ष वेगळा झाल्याचे प्रामुख्याने दिसून येते. कारण या पक्षातील मातब्बर नेते अनेक दशकांपासून सत्तेत आहेत. त्यामुळे काही वर्षे सत्तेबाहेर राहिल्यास या नेत्यांना काहीही फरक पडू शकत नव्हता, मात्र अनिल देशमुख आणि छगन भुजबळ यांच्यासारखे तुरूंगातील दिवस आपल्याला देखील काढावे लागू शकतात, याच भीतीपोटी ही फूट पडल्याचे एव्हाना स्पष्ट झाले आहे. या पक्षात उभी फूट पडल्यानंतर पहिल्यादांच दोन्ही पक्ष लोकसभा निवडणुकीला सामोरे गेले. एकीकडेे 8 खासदार निवडून आले तर, दुसरीकडे केवळ 1 खासदार निवडून आला. त्यामुळे दोन्ही पक्षांतील मतांचे अंतर आणि विजयाचे अंतर स्पष्ट होत आहे. तरीदेखील घेतलेला निर्णय योग्य असल्याचे दाखवण्यासाठी दोन्ही पक्षांनी कंबर कसल्याचे दिसून येत आहे. मात्र रिक्त राज्यसभेच्या जागेवर नेमके कुणाला पाठवावे यावरून राष्ट्रवादी काँगे्रसमध्ये खडाखडी होतांना दिसून येत आहे. खरंतर ही खडाखडी केंद्रातील मंत्रिपदावरून होतांना दिसून आली. यामागे अनेक कंगोरे आहेत. केंद्रात सुनील तटकरे यांना मंत्रिपद द्यावे, असा आमदारांच्या एका गटाचा प्रवाह होता. कारण प्रफुल्ल पटेल यांना केंद्रात मंत्रिपद दिल्यानंतर त्याचा पक्षाला काहीच फायदा होणार नाही. कारण पटेल लोकनेते नाहीत, शिवाय महाराष्ट्रात त्यांचे राजकीय वजन देखील नाही.
केंद्रामध्ये त्यांची उठबस असली तरी, पक्षाला त्याचा फायदा होणार नाही, यामुळेच तटकरे यांना मंत्रिपद देण्याची मागणी होत होती. मात्र पटेल यांना डावलण्यास अजित पवारांनी नकार दिला. त्याचबरोबर यामागचे प्रमुख कारण म्हणजे जर लोकसभा निवडणुकीत छगन भुजबळांना जर उमेदवारी मिळाली असती आणि ते निवडून आले असते, तर केंद्रात देखील मंत्रिपदासाठी त्यांच्याच नावाला भाजपने पसंदी दिली असती. कारण भुजबळांच्या मागे ओबीसी मते असल्यामुळे त्याचा फायदा भाजपला देखील झाला असता, मात्र भुजबळांचे पंख लोकसभा निवडणुकीत कापण्यात आले. त्यानंतर आता होणार्या राज्यसभा निवडणुकीत जर राष्ट्रवादीकडून भुजबळांना संधी देण्यात आली तर, भुजबळ पुन्हा एकदा केंद्रीय मंत्रिपदाच्या शर्यतीत येवू शकतात, आणि त्यांच्या मंत्रिपदाच्या नावाला अमित शहा यांची प्रथम पसंदी असेल, असेच काही चित्रांवरून स्पष्ट होत आहे. त्यामुळे आमच्या मंत्रिपदाच्या शर्यतीत आणखी एक तिसरा व्यक्ती नको म्हणून राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांचा भुजबळांच्या नावाला विरोध असणार यात शंका नाही. यासोबतच राज्यसभेसाठी सुनेत्रा पवार किंवा पार्थ पवार यांच्या नावावर देखील चर्चा होतांना दिसून येत आहे. मात्र सुनेत्रा पवार यांच्या नावाला छगन भुजबळांनी विरोध केल्याचे दिसून येत आहे. तसेच आतच्या गोटातून सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याचे देखील समोर आले आहे. त्यामुळे राजकीय पदे कुटुंबांतील व्यक्तीला देण्यावरून अजित पवारांवर टीका होण्याची शक्यता आहे. शिवाय पक्षातील ज्येष्ठ नेत्यांना संधी मिळत नसल्याने अनेक नेते नाराज असल्याचे दिसून येत आहे. त्यात प्रामुख्याने छगन भुजबळांचे नाव घ्यावे लागेल. शिवाय दिलीप वळसे पाटील यांच्या कन्या पूर्वा यांनी डॉ. अमोल कोल्हे यांच्या विजयाबद्दल शुभेच्छा देणारे ट्विट केले होते, त्यामुळे दिलीप वळसे पाटील देखील काही दिवसांत माघारी फिरण्याची शक्यता दिसून येत आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्रात पुन्हा एकदा अनेक राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
COMMENTS