लातूर प्रतिनिधी - येथील उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीत उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी 168 पैकी 106 जणांनी माघार घ

लातूर प्रतिनिधी – येथील उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीत उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी 168 पैकी 106 जणांनी माघार घेतली आहे. त्यामुळे आता 18 जागांसाठी 54 उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात असून, प्रचाराच्या तोफा धडाडणार आहेत. लातूर बाजार समितीच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरु आहे. 18 जागांसाठी 170 उमेदवारांनी अर्ज भरले होते. छाननी अंति दोन उमेदवारांचे अर्ज नामंजूर करण्यात आले. तर 168 उमेदवारांचे नामनिर्देशनपत्र वैध ठरले होते. गुरुवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. यात 106 उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आले आहेत. आता 54 उमेदवारांचे 62 नामनिर्देशन पत्र आहे. यामध्ये काही जणांनी दोनदा उमेदवारी अर्ज भरले आहेत. आता निवडणुकीच्या प्रचाराचा धुराळा उडणार आहे. बाजार समितीच्या सहकारी संस्था मतदारसंघातून सर्वाधिक 57 उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आले आहेत. यात सर्वसाधारण गटातून 37, महिला 6, इतर मागासर्गीय 8, विमुक्त जाती किंवा भटक्या जमाती गटातून सहा उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहेत. ग्रामपंचायत मतदारसंघातील सर्वसाधारण गटातून 27, अनुसुचित जाती, जमाती 3, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील 6 अशा एकूण 36 उमेदवारांनी माघार घेतली आहे. व्यापारी व आडते मतदारसंघातून 9, हमाल व तोलारी मतदारसंघातून 4 जणांनी माघार घेतली आहे. सहकारी संस्था मतदारसंघातील सर्वसाधारण गटातील 7 जागांसाठी 29, महिलांच्या 2 जांगासाठी 6, इतर मागासवर्गीय 1 जागेसाठी 3, विमुक्त जाती गटातील 1 जागेसाठी 2, ग्रामपंचायत मतदारसंघ सर्वसाधारण गटातील 2 जागांसाठी 7, अनुसुचित जाती-जमातीच्या 1 जागेसाठी 2, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाच्या एका जागेसाठी 3, व्यापारी व आडते मतदारसंघांतील 2 जागांसाठी 5, हमाल व तोलारी मतदारसंघातील एका जागेसाठी 5 अशा एकूण 18 जागांसाठी 54 उमेदवार निवडणुक रिंगणात आहेत. लातूर बाजार समितीसाठी 28 एप्रिल रोजी सकाळी 8 ते 4 या वेळेत मतदान होणार आहे. मतदानानंतर लगेच मतमोजणी होऊन निवडणुकीचा निकाल जाहीर केला जाणार आहे. 5 हजार 982 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार असून, आता 54 उमेदवारांचे भवितव्य मतदारांच्या हातात आहे. दरम्यान, गुरुवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी प्रशासकीय कार्यालयातील जिल्हा उपनिबंधक कार्यालयात उमेदवारांची मोठी गर्दी झाली होती.
COMMENTS