नाशिक- पर्यावरण रक्षणासाठी महावितरणने टाकलेल्या पाऊलाला महावितरणच्या नाशिक परिमंडळातील ४० हजार ८३५ पर्यावरणस्नेही ग्राहकांनी पुढाकार घेत छापील व
नाशिक- पर्यावरण रक्षणासाठी महावितरणने टाकलेल्या पाऊलाला महावितरणच्या नाशिक परिमंडळातील ४० हजार ८३५ पर्यावरणस्नेही ग्राहकांनी पुढाकार घेत छापील वीजबिल नाकारून कागदाचा वापर बंद करून ऑनलाईन सेवेच्या पर्यायाचा वापर करीत महावितरणच्या गो-ग्रीन सेवेचा लाभ घेतला आहे. त्यामुळे गो-ग्रीन नोंदणी केलेल्या प्रत्येक ग्राहकाची वार्षिक १२० रुपये या प्रमाणे एकूण ग्राहकांची ४९ लाख रुपये इतकी वार्षिक बचत होत आहे. वीजबिलासाठी ई-मेल व एसएमएस चा पर्याय निवडल्याने या ग्राहकांना दर महीन्याला प्रत्येक वीजबिलामागे १० रूपयाची सुट देण्यात येत असून इतरही ग्राहकांनी गो-ग्रीन योजनेत सहभागी होऊन पर्यावरण रक्षणाचा व सवलतीचा लाभ घ्यावा असे आवाहन महावितरणने केले आहे.
सद्यस्थितीत नाशिक जिल्ह्यात २४ हजार ३८३ आणि अहमदनगर जिल्ह्यात १६ हजार ४५२ अशाप्रकारे एकूण नाशिक परिमंडळात ४० हजार ८३५ वीज ग्राहकांनी महावितरणच्या ‘गो-ग्रीन’ योजनेमध्ये सहभाग घेतला आहे. पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी महावितरणकडून ‘गो-ग्रीन’ योजना सुरू करण्यात आली आहे. यामध्ये वीज बिलाच्या छापील कागदाऐवजी फक्त ई-मेल व एसएमएस चा पर्याय निवडल्यास वीज ग्राहकांना प्रती बिलात दहा रुपये सवलत देण्यात येत आहे. त्यामुळे वीज बिलामध्ये वार्षिक १२० रुपयांची बचत होणार आहे. विज बिल तयार झाल्यानंतर लगेचच ई-मेल तसेच एसएमएस द्वारे दरमहा विज बिल प्राप्त होत असल्याने ग्राहकांना प्रॉम्प्ट पेमेंट्सह ते तात्काळ घरबसल्या ऑनलाइनद्वारे भरण्याची सोय उपलब्ध आहे सोबतच ऑनलाईन वीजबिल भरल्यास ग्राहकाला वीजबिलाच्या ०.२५ टक्के किंवा जास्तीत जास्त ५०० रुपये पर्यंत सूट मिळते.
वीज ग्राहकांना छापील वीज बिलांची गरज भासल्यास त्यांना ई-मेल द्वारे प्राप्त झालेले दर महा विज बिल संगणकात सॉफ्ट कॉपी मध्ये जतन करून ठेवता येईल. सोबतच महावितरणच्या www.mahadiscom.in या अधिकृत संकेत स्थळावर चालू वीजबिल यासह मागील अकरा महिन्याचे असे एकूण बारा महिन्याचे वीज बिले मूळ स्वरूपात उपलब्ध आहेत. आवश्यकतेप्रमाणे वीज ग्राहकांना ते कधीही डाउनलोड करण्याची किंवा मूळ स्वरूपात रंगीत प्रिंट करण्याची सोय आहे. महावितरण ‘गो-ग्रीन’ योजनेचा पर्याय निवडण्यासाठी ग्राहकांनी वीज बिलावर छापलेल्या जीजीएन या क्रमांकाची नोंदणी महावितरण मोबाईल अँपद्वारे किंवा संकेतस्थळाच्या https://billing.mahadiscom.in/gogreen.php लिंक वर जाऊन करावी. याबाबतची अधिक माहिती www.mahadiscom.in या संकेत स्थळावर उपलब्ध आहे. तरी पर्यावरणाच्या समृद्धीसाठी आणि वीज खर्च कमी करण्यासाठी गो-ग्रीन या पर्यायाचा लाभ घ्यावा असे आवाहन महावितरणने केले आहे.
COMMENTS