लातूर प्रतिनिधी - सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करणे, लाइक करणे आणि ती फॉरवर्ड करणे अंगलट येऊ शकते. असे करताना जनसामान्यांच्या धार्मिक
लातूर प्रतिनिधी – सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करणे, लाइक करणे आणि ती फॉरवर्ड करणे अंगलट येऊ शकते. असे करताना जनसामान्यांच्या धार्मिक भावना दुखावणार नाहीत याचीही दक्षता घ्यावी. आक्षेपार्ह, चुकीच्या पोस्ट व्हायरल केल्या तर तीन वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षा आहे. त्यासाठी सोशल मीडिया वापरताना अधिक दक्ष राहण्याची गरज आहे, असे पोलिस अधीक्षक सोमय मुंडे म्हणाले.
सोशल मीडिया हा आजच्या जमान्यात नागरिकांच्या दैनंदिन जीवनातील महत्त्वाचा घटक बनला आहे. सोशल मीडियाचा वापर सकारात्मक दृष्टीकोन ठेवून केला पाहिजे. सोशल मीडियाचा वापर जितका चांगला ठरू शकतो, तितकाच तो कोणाच्याही जिवावरही उठू शकतो. सोशल मीडियामुळे एखाद्याच्या भावना दुखावू शकतात. कोणाची माथी भडकू शकतात आणि त्यातून तेढ निर्माण होण्याचा धोका असतो. घटनेने अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले आहे. मात्र, त्या स्वातंत्र्यामुळे दुसर्या कोणाच्या हक्क, अधिकारांवर गदा येत असेल तर ते अभिव्यक्ती स्वातंत्र्य ठरत नाही. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर करताना अतिशय काळजीपूर्वक करावा, असे आवाहन पोलिस अधीक्षक मुंडे यांनी केले आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून द्वेष पसरविण्याचा प्रयत्न केल्यास आयटी क्टनुसार कलम 67 नुसार कारवाई करण्याची तरतूद आहे. त्यामुळे भावना दुखावणारी भाषा असलेले मजकूर, फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करू नका. धार्मिक भावना भडकविण्याचा प्रयत्न करणारा, दुसर्याचा आत्मसन्मान दुखावणारा, देशाची एकता-सार्वभौमत्व आदींचे नुकसान करणारा, कोणत्याही संप्रदायाच्या विरोधातला मजकूर सोशल मीडियावर व्हायरल करू नका. कोणाला जिवे मारण्याची धमकी देऊ नका, अश्लील कंटेंट, चाईल्ड पोर्नोग्राफी शेअर करू नका. अफवा पसरविणे हा गुन्हा आहे. तसे केल्यास कारवाई केली जाते. यातील काही गुन्ह्यांसाठी तुरुंगवासाची शिक्षाही आहे. भारतीय आयटी क्टनुसार सायबर क्राइमसाठी तीन वर्षांपासून आजीवन कारावासापर्यंतच्या शिक्षेची तरतूद आहे. एक लाख ते दहा लाख रुपयांपर्यंतच्या दंडाचीही शिक्षा न्यायालयाकडून ठोठावली जाऊ शकते. नियमबाह्य मजकूर सोशल मीडियावर पोस्ट केल्यास माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 नुसार दोषी ठरविले जाते. यामध्ये सोशल मीडिया युझर्स, सोशल मीडिया कंटेंट प्रोव्हायडर, नेटवर्क सर्व्हिस प्रोव्हायडर्स आदींचाही समावेश असतो.
COMMENTS