Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

म्हाडाच्या सदनिकेचे आमीष दाखवून 21 जणांची फसवणूक

मुंबई ः प्रभादेवी परिसरातील सेंच्युरी बाजार येथील म्हाडा वसाहतीमध्ये सदनिका मिळवून देण्याचे आमीष दाखवून 21 जणांची दोन कोटी 30 लाख  रुपयांची फसवणू

मुंबईला आंतरराष्ट्रीय शाश्वत शहर बनविण्याचा प्रयत्न करुया – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन 
कार वरील ताबा सुटल्याने कार आणि चालक थेट नाल्यात.
भावना गवळी यांना ईडीची दुसर्‍यांदा नोटीस

मुंबई ः प्रभादेवी परिसरातील सेंच्युरी बाजार येथील म्हाडा वसाहतीमध्ये सदनिका मिळवून देण्याचे आमीष दाखवून 21 जणांची दोन कोटी 30 लाख  रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दादर पोलिसांनी सहा जणांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी सुनील घाटवीसावे, त्याची पत्नी सुजाता, प्रशांत जाधव, बबिता भांगरे, रवी शिवगण आणि सरस्वती लोकरे यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. प्रभादेवीमधील रहिवासी दत्तप्रसाद बाईत (39) यांनी केलेल्या तक्रारीवरून या सर्वांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बाईत सार्वजनिक बांधकाम विभागातील लिपिक आहेत. बाईत यांची एप्रिल 2017 मध्ये आरोपी घाटविसावे यांच्याशी ओळख झाली होती. म्हाडा कार्यालयात आपला चांगला प्रभाव असल्याचे घाटविसावे यांनी तक्रारदाराला सांगितले. तसेच प्रभादेवीमधील सेंच्युरी बाजार म्हाडा कॉलनीतील म्हाडाच्या गिरणी कामगाराच्या सदनिका बाजार भावापेक्षा कमी किंमतीत मिळवून देण्याची आमीषही त्यांनी दाखवले, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. घाटविसावे यांच्यावर विश्‍वास ठेऊन तक्रारदार बाईत व त्यांच्या यांच्या नातेवाईकांसह अन्य 20 जणांनी सेंच्युरी बाजार म्हाडा कॉलनीतील सदनिका मिळवण्यासाठी एप्रिल 2017 ते नोव्हेंबर 2019 या कालावधीत आरोपींना एकूण दोन कोटी 30 लाख रुपये दिले. घर खरेदी करणार्‍यांनी आरोपींसोबत सामंजस्य करार (एमओयू) केला. त्यात आरोपींनी त्यांना दिलेल्या आश्‍वासने लिखीत स्वरूपात नमुद केली. पण आरोपीला पैसे देणार्‍या कोणालाही अद्यापही सदनिका मिळालेली नाही. तक्रारदारांनी त्यांना विलंबाबद्दल विचारले असता आरोपी त्यांच्याकडे दुर्लक्ष करू लागले. काही ना काही सबब सांगून जास्त वेळ मागून घ्यायचे. अखेर घर खरेदीदारांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी बुधवारी पोलिसांत तक्रार केली. तक्रारदारांना सेंच्युरी बाजार म्हाडा कॉलनीतील म्हाडाच्या गिरणी कामगारांच्या सदनिका दाखवण्यात आल्या होत्या. तसेच आरोपींनी त्यांना वांद्रे येथील म्हाडा कार्यालयातही नेले होते. तिथे त्यांचे बायोमेट्रिक तपशील घेण्यात आले होते. आरोपींनी तक्रारदारांचा विश्‍वास संपादन केला होता. सर्व तक्रारदार प्रकल्पग्रस्त आहेत आणि त्यांना नुकतेच एका बांधकाम व्यावसायिकाकडून प्रत्येकी 30 लाख रुपये मिळाले होते. पीडितांनी हे पैसे म्हाडाची सदनिका घेण्यासाठी आरोपींना दिले होते. पण त्यांची फसवणूक झाली. आरोपींनी रोख तसेच धनादेशाद्वारे पैसे स्वीकारले होते. याप्रकरणी पुरावे गोळा करण्यात येत असल्याचे अधिकार्‍याने सांगितले. प्राथमिक तपासात घटविसावे मुख्य आरोपी असल्याचा पोलिसांना संशय आहे, तर उर्वरित आरोपी हे लाभार्थी आहेत. त्यांच्या खात्यात फसवणुकीचे पैसे जमा झाले आहेत. पोलिसांनी याप्रकरणी 38 लाखांहून अधिक फसवणुकीच्या रकमेचा माग घेतला आहे. याप्रकरणी दादर पोलिसांनी  सहा आरोपींविरूद्ध भादंवि कलम 406 (गुन्हेगारी विश्‍वासघात ), 409 (लोकसेवक,  व्यापारी किंवा दलाल यांच्याकडून विश्‍वासाघात), 420 (फसवणूक) आणि 34 (सामान्य हेतू) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

COMMENTS