ढेबेवाडी / वार्ताहर : देशात आदर्श निर्माण करण्यात नेहमीच आघाडीवर असलेल्या मान्याचीवाडीतील मिळकतधारकांनी आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी शंभर टक्के कर
ढेबेवाडी / वार्ताहर : देशात आदर्श निर्माण करण्यात नेहमीच आघाडीवर असलेल्या मान्याचीवाडीतील मिळकतधारकांनी आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी शंभर टक्के कर भरून गेल्या पंचवीस वर्षांची परंपरा कायम ठेवली आहे. क्यूआर कोडच्या माध्यमातून सर्व खातेदारांनी आपल्या घरातून ग्रामपंचायतीचा कर भरणा करून एक वेगळा आदर्श घालून दिला. परराज्यात असलेल्या मिळकतधारकांनी तिथूनही क्यूआर कोडच्या माध्यमातून कराचा भरणा केला. या गावात एकूण 212 मिळकती असून, त्याचा 1 लाख 81 हजार कर जमा झाला आहे.
स्थापनेपासून आजपर्यंत गेल्या 25 वर्षांत मान्याचीवाडी ग्रामपंचायतीने अनेक उपक्रम राबवत सातत्य ठेवले आहे. ग्रामविकासात नावीन्यपूर्ण संकल्पना प्रभावीपणे राबवत पंचायतराज व्यवस्थेत दिशादर्शक काम करणारी ग्रामपंचायत म्हणून ग्रामपंचायतीची ओळख आहे. पंचायतीकडे गावातील मिळकतधारकांकडून आरोग्य, वीज, पाणीपट्टी, व्यवसाय मिळकत कर अशा विविध करांच्या माध्यमातून कर जमा होतात. हा करत भरताना खातेदार जिथे असेल तिथूनच कर भरणा करता यावा यासाठी ग्रामपंचायतीच्या नावे क्यूआर कोड काढण्यात आला. तो गावातील प्रत्येक खातेदाराच्या घरावर लावण्यात आल्याने सर्व खातेदार घरातूनच कराचा भरणा करतात.
आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी एक वर्षाचा आगाऊ कर भरणा करण्याची या ग्रामपंचायतीची परंपरा आहे. सलग 25 वर्षांपासून गावकर्यांनी ही परंपरा जपली आहे. आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी शंभर टक्के कर वसूली पूर्ण झाली. या उपक्रमाबद्दल जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना वाघमाळे, गटविकास अधिकारी सविता पवार यांनी ग्रामस्थ व ग्राम पंचायतीचे अभिनंदन केले.
COMMENTS