नवी दिल्ली : पीएम ई बस सेवा’ योजने अंतर्गत केंद्र शासनाने ठाणे महापालिकेच्या परिवहन सेवेसाठी 100 पर्यावरणपुरक वातानुकूलीत ई बसेस मंजूर केल्या आहे

नवी दिल्ली : पीएम ई बस सेवा’ योजने अंतर्गत केंद्र शासनाने ठाणे महापालिकेच्या परिवहन सेवेसाठी 100 पर्यावरणपुरक वातानुकूलीत ई बसेस मंजूर केल्या आहेत. येत्या एप्रिल महिन्यात या बसेस टीएमटीच्या ताफ्यात दाखल होतील. वाढीव बसेस आणि उर्वरित केंद्र शासनाच्या अनुदानासाठी प्रयत्नशील असल्याची ग्वाही ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के यांनी दिली आहे.
नगरविकास आणि गृहनिर्माण विषयक स्थायी समितीची बैठक श्री मागुंता श्रीनिवासुलु रेड्डी यांच्या अध्यक्षतेखाली संसदेत झाली. या समितीचा सदस्य म्हणून खासदार नरेश म्हस्के या बैठकीला उपस्थित होते. परिवहन सेवेच्या विस्तारासाठी तसेच आगारांच्या पायाभूत सुविधांचा विकास आणि अद्ययावतीकरण या विषयांवर ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के यांनी महत्वपूर्ण मुद्दे बैठकीत मांडले. प्रदूषण कमी करण्यास हातभार लावणार्या 100 वातानुकूलीत आरामदायी ई बसेस ठाणेकरांच्या सेवेसाठी दिल्याबद्दल बैठकीत खासदार नरेश म्हस्के यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र शासनाचे प्रथम आभार मानले. तसेच ठाणे शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन ठाणे परिवहन सेवेला जादा बसेस द्याव्यात, अशी मागणी खासदार नरेश म्हस्के यांनी केली. कोविड-19 साथीच्या रोगाचा सामना करत संघर्ष करत असलेल्या ठाणे महापालिकेवरील आर्थिक भार कमी करण्यासाठी केंद्र सरकारकडून देण्यात येणार्या अनुदानात 5 रु. वाढ म्हणजेच 24 प्रति किलोमीटर ऐवजी रु.29 प्रति किलोमीटर इतके अनुदान देण्याची तसेच योजनेसाठी किमान अंतराची आवश्यकता 200 किलोमीटरवरून 160 किलोमीटरपर्यंत कमी करण्याची सूचना खासदार नरेश म्हस्के यांनी केली. या बदलामुळे ही योजना नागरिकांसाठी अधिक सुलभ आणि फायदेशीर होईल ठरेल असे बैठकीत त्यांनी निदर्शनास आणून दिले.
COMMENTS