होळी, धुलीवंदन व रंगपंचमी साजरी करण्यावर निर्बंध ;  कोरोनामुळे प्रशासनाचा निर्णय

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

होळी, धुलीवंदन व रंगपंचमी साजरी करण्यावर निर्बंध ; कोरोनामुळे प्रशासनाचा निर्णय

कोरोनाचा प्रादूर्भाव पुन्हा वाढू लागल्याने जिल्हा प्रशासनाने होळी, धुलीवंदन व रंगपंचमी साजरी करण्यावर निर्बंध घातले आहेत.

साखळी उपोषणास त्रिदल माजी सौनिक सेवा संघाचा पाठिंबा
वडगाव गुप्ता ग्रामस्थांनी केले सीना नदीचे जलपूजन
महाराष्ट्रात गरीबांना लस मोफतचः पवार

अहमदनगर/प्रतिनिधी- कोरोनाचा प्रादूर्भाव पुन्हा वाढू लागल्याने जिल्हा प्रशासनाने होळी, धुलीवंदन व रंगपंचमी साजरी करण्यावर निर्बंध घातले आहेत. हे सण साधेपणाने साजरे करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सार्वजनिक स्वरुपाच्या धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना 28 मार्च ते 2 एप्रिल कालावधीत प्रतिबंध करण्यात आल्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांनी जारी केले आहेत. 

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन होळी, धुलीवंदन आणि रंगमंचमी सण कोणत्याही प्रकारे गर्दी न करता साधेपणाने साजरा करण्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना राज्य शासनाने दिल्या आहेत. त्यानुसार जिल्हावासियांनी या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी केले आहे. त्याचबरोबर, जिल्ह्यात कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारीच्या उपाययोजना म्हणून गर्दी टाळण्यासाठी एकत्रित येऊन सार्वजनिक ठिकाणी, हॉटेल्स, रिसोर्ट, सार्वजनिक सभागृहे, सार्वजनिक व खासगी मोकळ्या जागा, सर्व गृहनिर्माण  संस्थांमधील मोकळ्या जागा येथे 28 मार्च ते 2 एप्रिल 2021 या कालावधीत कोणत्याही सार्वजनिक स्वरुपाचे धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आयोजनास प्रतिबंध करण्यात आला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

कोणतीही व्यक्ती, संस्था, संघटना यांनी या आदेशाचे उल्लंघन केल्यास ते साथरोग अधिनियम 1897 मधील तरतुदीनुसार भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) च्या कलम 188 नुसार दंडनीय, कायदेशीर कारवाईस पात्र राहतील, असे या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

राज्य शासनाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता कोणत्याही प्रकारे गर्दी न करता सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करावे तसेच एकमेकांवर रंग टाकणे, पाणी टाकणे, एकमेकांना गुलाल लावून रंगांची उधळण टाळावी. धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करु नयेत, असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, या मार्गदर्शक सूचनांपेक्षा कडक निर्बंध स्थानिक प्रशासनाने लागू केले असतील तर ते लागू राहतील तसेच या मार्गदर्शक सूचनांच्या परिपत्रकानंतरही कडक निर्बंध लागू शकतील, स्थानिक पातळीवर संबंधित शासकीय विभाग व यंत्रणांनी विहित केलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

COMMENTS