काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांनी स्वबळावर निवडणुका लढण्याचा नारा दिला आहे
मुंबई/प्रतिनिधी: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांनी स्वबळावर निवडणुका लढण्याचा नारा दिला आहे. आता माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी ही या नेत्यांच्या सुरात सूर मिसळला आहे. स्वबळावर लढल्याने काँग्रेसची ताकद वाढेल आणि कार्यकर्त्यांमध्ये नवीन ऊर्जा संचारेल, असे त्यांनी म्हटले आहे.
काँग्रेस राहुल गांधी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने विविध कार्यक्रम राबवून संकल्प दिन साजरा केला. तसेच काँग्रेसचे मुख्यालय असलेल्या दादर येथील टिळक भवनच्या नूतनीकरणानंतरचे उद्घाटन सोहळा पार पडला. या वेळी शिंदे यांनी हे विधान केले आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये स्वबळावर लढण्याचे वारे जोरात वाहत असल्याची चिन्हे दिसत आहेत. शिंदे म्हणाले, की स्वबळावर निवडणुका लढवण्याचा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा नारा हा संघटनेत नवी उमेद व ताकद उभी करण्याचे काम करणारा आहे. पटोले हे काँग्रेसचा झेंडा घेऊन नव्या जोमाने निघाले आहेत. खर्या अर्थाने ते बारा बलुतेदारांचे कैवारी असून त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पुन्हा जोमाने उभी राहील. पटोले यांनी पक्षाध्यक्षपदाची सूत्रे हाती घेऊन अवघ्या तीन-चार महिन्यातच वादळ उठवून दिले आहे, याचा अभिमान वाटतो. विधानसभेच्या अध्यक्षपदाचा त्याग करून ते पक्षासाठी ही पालखी घेऊन पुढे निघाले आहेत. खुर्ची सोडून पक्षासाठी वाहून घेणे ही साधी गोष्ट नाही. या वेळी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनीही भाषण केले. मध्यंतरीच्या काळात नाइलाजाने काँग्रेस पक्षातून काही लोकांना बाहेर जावे लागले. त्या सर्वांसाठी घरवापसीचा कार्यक्रम हाती घेण्याची गरज आहे. जनसंपर्काचे अभियान हाती घेऊन आगामी काळात कामाला लागले पाहिजे. राहुल गांधींच्या संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्याचे काम करण्यासाठी पक्ष संघटना व शासन एकत्र येऊन काम करावे लागणार आहे, यातूनच काँग्रेस पक्षाचा विस्तार होईल, असे चव्हाण म्हणाले.
काँग्रेसला नंबरवन करा
देशाला आज राहुल गांधी यांच्यासारख्या नेतृत्वाची गरज आहे. खर्या अर्थाने आज काँग्रेसचा संकल्प दिन आहे. सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस पक्षाला राज्यात पुन्हा एकदा नंबर एकचा पक्ष करण्यासाठी आपणास काम करावे लागणार आहे, असे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.
काँग्रेसचे राज्यभर आंदोलन
दरम्यान, टिळक भवनमधील कार्यक्रमाआधी संत रोहिदास चौकात नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली वाढती महागाई, पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढ, खाद्यतेलाची दरवाढ तसेच मोदी सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांचा निषेध करत आंदोलन करण्यात आले. राज्यभर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोदी सरकारचा निषेध करत आंदोलन केले.
COMMENTS