सावधान…कोरोना पुन्हा हात-पाय पसरतोय…;

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सावधान…कोरोना पुन्हा हात-पाय पसरतोय…;

पारनेर-जामखेड-कर्जत-संगमनेर-पाथर्डी-श्रीगोंद्याला रुग्णांचा वाढता आलेखअहमदनगर/प्रतिनिधी : मागील दीड-दोन महिन्यांपासून थंडावलेले कोरोना वातावरण पुन्हा

ना.छगनराव भुजबळ समर्थकांनी केला जल्लोष
अकरा गावेही विकासाच्या रडारवर – आ. आशुतोष काळे 
तहसीलदार देवरेंना न्याय मिळण्यासाठी सोमवारी काळ्या फिती लावून आंदोलन

पारनेर-जामखेड-कर्जत-संगमनेर-पाथर्डी-श्रीगोंद्याला रुग्णांचा वाढता आलेख
अहमदनगर/प्रतिनिधी : मागील दीड-दोन महिन्यांपासून थंडावलेले कोरोना वातावरण पुन्हा गंभीर दिशेने जाऊ लागल्याचे दिसू लागले आहे. मागील पाच दिवसातच जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोना रुग्ण सापडण्याचे प्रमाण वाढल्याचे दिसू लागले आहे. रविवारी जिल्ह्यात एक हजारावर कोरोना रुग्ण सापडल्याने कोरोना पुन्हा हात-पाय पसरू लागल्याचे दिसू लागले आहे. जिल्ह्यातील पारनेर, संगमनेर, श्रीगोंदे, पाथर्डी, कर्जत व जामखेड या सहा तालुक्यांतून कोरोना रुग्ण वाढीचा आलेख चढता दिसू लागला आहे. या पार्श्‍वभूमीवर, नागरिकांसह प्रशासनाने काळजी घेण्याची गरज वाढली आहे.
मागील जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याने नगर जिल्हा निर्बंध स्तर एकमध्ये होता. त्यामुळे सर्व दैनंदिन व्यवहार सुरळीत सुरू करण्यात आले होते. आधीचे दोन महिने अत्यावश्यक सेवेतील मेडिकल, भाजी व किराणा दुकाने वगळता बंद असलेली कापड, सलून, सोने-चांदी, फॅशन, मोबाईल अशी दुकाने सुरू झाल्याने समाधान पसरले होते. पण हा आनंद काहीकाळच राहिला. त्यानंतर 15 दिवसातच नगर जिल्ह्याचा समावेश निर्बंधस्तर तीनमध्ये झाला व त्यानुसार सकाळी 7 ते दुपारी 4पर्यंत दुकाने खुली आणि सायंकाळी 5 ते सकाळी 7पर्यंत संचारबंदी लागू झाली तसेच दर शनिवारी व रविवारी पूर्ण व्यवहार बंदचे आदेश जारी झाले. गेल्या महिनाभरापासून असे निर्बंध असताना दुसरीकडे कोरोना रुग्णांची संख्या मात्र आटोक्यात येण्याची चिन्हे नाहीत. अर्थात नगर शहरातील कोरोना रुग्ण संख्या कमी असली तरी ग्रामीण भागातील संगमनेर, पारनेर, श्रीगोंदे, पाथर्डी, कर्जत व जामखेडमधील वाढती संख्या चिंताजनक दिसू लागली आहे.

पाच दिवसातच वाढ
मागील पाच दिवसात संगमनेरला 389, श्रीगोंद्याला 324, पाथर्डीला 375, कर्जतला 329, जामखेडला 300 व पारनेरला सर्वाधिक 617 रुग्ण नवे सापडले आहेत. पारनेर तालुक्यात तर 71 गावांतून कडक निर्बंध लागू केले गेले असतानाही तेथे रुग्ण सापडण्याचे वाढते प्रमाण जिल्हा प्रशासनासह तालुका प्रशासनासमोरही आव्हानात्मक झाले आहे. कोरोनाच्या सुरुवातीच्या काळापासून नगरपाठोपाठ संगमनेरचे रुग्ण आकडे असायचे. नगर शहरात मात्र हळूहळू हे आकडे कमी झाले, पण संगमनेरचे आकडे कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मतदारसंघातील ही कोरोना वाढीची आकडेवारी त्यांच्यासह त्यांच्या समर्थकांच्या नियोजनातील कमतरता स्पष्ट करून जाऊ लागली आहे.
जिल्ह्यात बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 2 लाख 83 हजार 146 इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण आता 96.39 टक्के इतके झाले आहे. तर उपचार सुरू असणार्‍या रुग्णांची संख्या आता 4 हजार 496 इतकी झाली आहे. पोर्टलवरील जिल्ह्यातील मृत्यू नोंद 6 हजार 116जणांची झाली असून, जिल्ह्यातील एकूण रुग्ण संख्या 2 लाख 93 हजार 758 झाली आहे.

अनेकविध कारणे
नगर जिल्ह्यात कोरोना निर्बंध स्तर 3नुसार नवे नियम लागू असून, विवाह समारंभ, अंत्यसंस्कार व अन्य कार्यक्रमांवर उपस्थितीची बंधने आहेत. याशिवाय हॉटेल सेवांनाही सायंकाळी फक्त पार्सल सेवा देण्याची मुभा आहे. पण बंधने असली तरी ती धुडकावण्याचे प्रकार सर्रास सुरू आहेत. मास्क वापरण्याबाबत थोडीफार जागृती आली असली तरी सार्वजनिक ठिकाणी गर्दी न करणे, बाहेर कोठेही गेल्यावर सोशल डिस्टन्स पाळणे, हात सतत सॅनिटाईझ करण्यासारखे नियमही अनेकजण पाळत नाहीत. राजकीय कार्यक्रमही जोरात सुरू असून, मेळावे, बैठका, आंदोलनांतून गर्दी दिसत आहे. तेथे कोरोनाचे कोणतेही नियम पाळण्याचे बंधन आपल्यावर नाही, असे समजूनच सारे व्यवहार सुरू आहेत. प्रशासनाकडूनही नियम मोडणारांवर कारवाईचा बडगा फार कठोरपणे उगारला जात नसल्याचा गैरफायदा घेतला जाऊ लागल्यानेच कोरोना रुग्ण संख्या वाढू लागली आहे. जगभरात सगळीकडे ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये कोरोनाची तिसरी लाट येण्याची भीती व्यक्त होत आहे. पण नगर जिल्ह्याची सध्याची वाढती रुग्णसंख्या पाहता जुलैअखेरीसच जिल्ह्याला तिसर्‍या लाटेचा तडाखा बसण्याची भीती व्यक्त होत आहे.

मागील आठवड्याचे आकडे
-19 जुलै- 350 रूग्णांना डिस्चार्ज तर नवे 460 बाधित
-20 जुलै- 610 रुग्णांना डिस्चार्ज तर नवे 567 बाधित
-21 जुलै- 520 रुग्णांना डिस्चार्ज तर नवे 610 बाधित
-22 जुलै- 454 रुग्णांना डिस्चार्ज तर नवे 789 बाधित
-23 जुलै- 575 रुग्णांना डिस्चार्ज तर नवे 784 बाधित
-24 जुलै- 581 रुग्णांना डिस्चार्ज तर नवे 729 बाधित
-25 जुलै- 752 रुग्णांना डिस्चार्ज तर नवे 1026 बाधित

सहा तालुक्यांतील 21 ते 25 जुलैची रुग्ण संख्या
-संगमनेर-55,66,95,103 व 70
-श्रीगोंदे-42,87,79,96 व 17
-पाथर्डी-62,88,97,79 व 59
-पारनेर-93,158,95,61 व 210
-कर्जत-66,81,53,55 व 74
-जामखेड-25,55,21,19 व 180

COMMENTS