अहमदनगर/प्रतिनिधी : पोस्कोच्या गुन्ह्यातील आरोपी सादिक लाडलेसाब बिराजदार हा पोलिसांच्या ताब्यातून पळून जाण्याच्या प्रयत्नात पोलिसांच्या वाहनातून खाली
अहमदनगर/प्रतिनिधी : पोस्कोच्या गुन्ह्यातील आरोपी सादिक लाडलेसाब बिराजदार हा पोलिसांच्या ताब्यातून पळून जाण्याच्या प्रयत्नात पोलिसांच्या वाहनातून खाली पडून जखमी होऊन मरण पावल्याचे पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले आहे. तशी माहिती पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी सोमवारी दिली. दरम्यान, या प्रकरणाचा तपास आता सीआयडीद्वारे केला जाणार आहे.
15 ऑगस्ट रोजी सायंकाळी पोलिसांनी सादिकला ताब्यात घेतल्यावर त्याला भिंगार पोलिस ठाण्यात नेत असताना त्याने पोलिसांच्या ताब्यातून पळून जाण्याचा प्रयत्न केला. यात तो गाडीतून खाली पडून जखमी झाला व खासगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू असताना त्याचे निधन झाले. या प्रकरणी पोलिसांनी सादिक विरोधात पोलिसांच्या ताब्यातून पळून जाण्याच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. मात्र, याप्रकरणी सादिकची पत्नी रुक्सार बिराजदार यांनी दिलेल्या दुसर्या फिर्यादीनुसार पाचजणांनी सादिकला मारहाण केल्याने त्यात तो जखमी होऊन मरण पावल्याचे त्यांचे म्हणणे आहेे. या प्रकरणी दोन स्वतंत्र गुन्हे दाखल झाल्याने पोलिस अधीक्षक पाटील यांनी उपअधीक्षक विशाल ढुमे यांना चौकशीचे आदेश दिले होते. त्यांनी दोन्ही गुन्ह्यांच्या अनुषंगाने तब्बल 50हून अधिक जणांचे जबाब घेतले आहेत व त्यांच्या या चौकशीचा प्राथमिक अहवाल त्यांनी पोलिस अधीक्षक पाटील यांना दिला आहे. त्याआधारे सादिकचा मृत्यू पोलिसांच्या वाहनातून पडून झाल्याचे त्यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
प्राथमिक अहवाल प्राप्त झाल्यानंतर यामध्ये सदरची घटना ही पोलीस विभागाच्या आरोपी पकडण्याच्या संदर्भात योग्य कार्यवाही झालेली नाही. जेवढी काळजी घ्यायला पाहिजे होती, तेवढी घेतलेली नाही, असे प्राथमिक अहवालावरून दिसून येत असल्याचे अधीक्षक पाटील यांनी सांगितले. या संदर्भामध्ये अंतिम अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधित पोलिसांवर निश्चित कारवाई केली जाईल, असे पाटील यांनी सांगितले. तपासाच्या प्राथमिक अहवालामध्ये सदरची घटना ही पोलिसांनी दिलेल्या फिर्यादीनुसार घडलेली आहे, हे प्राथमिकदृष्ट्या समोर येत आहे, पण यासंदर्भातला अहवाल अंतिम आल्यानंतर सर्व बाबींचा उलगडा स्पष्ट होईल, असेही अधीक्षक पाटील यांनी सांगितले. आम्ही फिर्यादीच्या चौकश्या केलेल्या आहेत. तसेच जे कोणी पोलिस या प्रकरणात दोषी असतील, त्यांच्यावर सुद्धा निश्चितपणे कारवाई करणार असल्याचे त्यांनी सांगितले. पोलीस प्रशासनाची खात्यांतर्गत चौकशीमध्ये या बाबी समोर आलेल्या आहेत. मात्र, भिंगार कॅम्पमध्ये घडलेल्या प्रकाराचा सीआयडी स्वतंत्र तपास करत आहे, असेही त्यांनी सांगितले.
अपघातात झाला मृत्यू
सादिकचा शवविच्छेदनाचा अहवाल आला असून यात प्राथमिक माहिती देण्यात आलेली आहे. डोक्याला व शरीराला जखम झाली असल्याचे यात म्हटले आहे. सविस्तर माहिती अद्याप आलेली नाही. मात्र, फॉरेन्सिक विभागाकडून आलेल्या अहवालामध्ये सदरची घटना ही अपघात असल्याचे दिसून येत आहे, असेही पोलीस अधीक्षक पाटील यांनी सांगितले.
COMMENTS