जगभरात क्षयरोग झपाट्याने वाढत असून त्यामध्ये भारताचा अव्वल क्रमांक आहे.
सातारा / प्रतिनिधी : जगभरात क्षयरोग झपाट्याने वाढत असून त्यामध्ये भारताचा अव्वल क्रमांक आहे. जगाच्या तुलनेत 27 टक्के रुग्ण भारतात असून महाराष्ट्रात हे प्रमाण 10 टक्के आहे, अशी सध्याची क्षयरुग्णांची सध्यस्थिती आहे. असे असताना सातारा आरोग्य विभागाने क्षयरोग निर्मूलनासाठी कंबर कसली असल्याने, त्यांच्याच कार्याची पावती म्हणून क्षयरोग उच्चाटनासाठी करत असलेल्या कार्याबद्दल ब्रॉन्झ पदक भारत सरकारतर्फे प्रदान करणेत आले आहे. हि सातारा जिल्ह्याकरिता अभिमानाची गोष्ट आहे.
दिल्ली येथे जागतिक क्षयरोग दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन व आरोग्य राज्यमंत्री अश्विनीकुमार चौबे यांच्या हस्ते सातारा जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करत असलेले जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. अविनाश पाटील यांना रौप्य पदक देऊन सन्मानित करण्यात आले.
भारतातून 628 जिल्ह्यांमधून 70 जिल्हे नामांकनासाठी पात्र झाले होते. त्यातील 29 जिल्ह्यांचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. सातारा जिल्ह्यामधून जागतिक आरोग्य यंत्रणेच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा क्षयरोग विभागातील एसटीएस, एसटीएलएस व चाय एनजिओ कडील तालुका समन्वयक यांच्या टीमने 11 तालुक्यातील 8 हजार 104 घराघरात जाऊन तब्बल 33 हजार 302 लोकांची तपासणी करून सत्यता पडताळणी केली. तसेच गत 5 वर्षाचे क्षयरोग विभागाने केलेल्या क्षयरोग निर्मूलनाचे कामाची दखल घेतली गेली. यामध्ये सातारा जिल्हा क्षयरोग विभागाने मोठी मजल मारली असून सन 2025 पर्यंत जिल्ह्यातून क्षयरोग समूळ उच्चाटनासाठी वाटचाल सुरु आहे.
या कामी जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांचे बहुमोल मार्गदर्शन व साथ जिल्हा क्षयरोग केंद्रास मिळाली. या सर्वांच्या नेतृत्व व मार्गदर्शनाखाली जिल्हा क्षयरोग केंद्र यांनी सातारा जिल्हा 2025 पर्यंत क्षयरोग मुक्त करण्याचे ठरविले आहे. सातारा जिल्हा क्षयमुक्त करणेकामी जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, औषध निर्माण अधिकारी, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी व इतर सर्व आरोग्य कर्मचारी तसेच खाजगी वैद्यकीय व्यावसायिक व औषध विक्रेते, गावपातळीवरील आशा सेविका या सर्वांची मोलाची साथ मिळत आहे.
COMMENTS