अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथील प्रसिध्द बिरोबा देवस्थान येथे होईकचा धार्मिक कार्यक्रम गुरुवारी (दि.21 ऑक्टोबर) पार पडला.
अहमदनगर (प्रतिनिधी)-
नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथील प्रसिध्द बिरोबा देवस्थान येथे होईकचा धार्मिक कार्यक्रम गुरुवारी (दि.21 ऑक्टोबर) पार पडला. मागील वर्षी पिकांच्या रोगराईचे व अतिवृष्टीचे भाकित खरे ठरले. तर देशात मोठ्या चळवळीचे भाकीत शेतकरी आंदोलनाने पुढे आले.
देवाचे भगत नामदेव भुसारे यांनी होईक (भविष्यवाणी) सांगताना पुढील वर्षी येणार्या संकटाचे स्पष्टीकरण दिल्याने अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला. तर कोरोना महामारीचे संकट साडेपाच महिन्यात संपणार असल्याचे सांगताच उपस्थितांनी सुटकेचा निश्वास सोडला. भविष्यवाणी ऐकण्यासाठी पंचक्रोशीतील भाविकांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांचे पालन करुन मोठ्या संख्येने हजेरी लावली होती.
पशु हत्या बंदीचे पालन करुन देवाला भाजी-भाकरीचा नैवद्य दाखविण्यात आला. देवाचे भगत नामदेव भुसारे यांनी अंगावर वेताचे फटके ओढून भविष्यवाणी (होईक) सांगताना म्हणाले की, बाया न्हात्यान, धुत्यान व पालखीत मिरत्याल. लक्ष्मीला पिडा असून, बाळाला संकट नाही. चित्ता सवातीचा पाच ते अडीच दिवस तिन खंडात आभाळ फिरेल व ज्वारीच्या पिकाला अपकार होईल.
दिवाळीच दिपान तीन ते पाच दिवस आभाळ येऊन काही ठिकाणी पाऊस पडेल. सटीच सटवान पाच ते नऊ दिवस फिरुन कर्मभागी पाऊस होणार आहे. गायी देठाला लागून, नव तूप होणार. गहू, हरभरावर तांबारा रोग पडेल व गहू, हरभराचे मनभाव राहणार असल्याचे सांगितले. तर कल्याण कुर्तिका सात ते अकरा दिवस पाच खंडात आभाळ फिरुन पाऊस होईल. मुगराळ्याची पेर होऊन घडमोड होईल. ज्वारी, गहू व हरभाराची पेर होऊन काही हसतेन काही रडतेन, असे भाकीत होईकात सांगण्यात आले आहे.
गावातील भविष्यवाणी कार्यक्रमाच्या आयोजनासाठी ग्रामपंचायत सदस्य पै.नाना डोंगरे, गोकुळ जाधव, बाबा जाधव, नामदेव जाधव, अंशाबापू शिंदे, काशीनाथ जाधव, बाबा पुंड, संजू डोंगरे, पांडूरंग गुंजाळ, राजू भुसारे, नवनाथ जाधव, सुरेश जाधव, रामदास वाखारे, दत्तू शिंदे, ठकाराम शिंदे, बबन कापसे, अण्णा जाधव, गोरख काळे, बशीर शेख, भरत फलके, संजय कापसे, मयुर काळे यांनी परिश्रम घेतले. पाच दिवस देवाचे ओव्या गाणार्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. भाविकांसाठी गावात भंडार्याचे आयोजन करण्यात आले होते.
COMMENTS