मुंबई : 100 कोटींच्या वसुलीचा गौप्यस्फोट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून गंभीर आरोप करणारे मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी स
मुंबई : 100 कोटींच्या वसुलीचा गौप्यस्फोट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून गंभीर आरोप करणारे मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी साक्षी पुरावे देण्यास नकार दिला आहे. राज्य सरकारने नेमलेल्या चांदीवाल आयोगासमोर त्यांनी मुखत्यारमार्फत हा खुलासा केला आहे.
’मी माझी तक्रार मुख्यमंत्री महोदयांकडे दिलेली आहे, आता त्या संदर्भात मला कुठलेही साक्षी-पुरावे द्यायचे नाहीत वा उलटतपासणीही करायची नाही,’ असे शपथपत्र सिंह यांनी नमुद केले आहे. सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना 20 मार्च, 2021 रोजी दिले होते. त्या पत्राची चौकशी करण्यासाठी राज्य शासनाने चांदीवाल आयोग स्थापन केला. या आयोगासमोर सिंह यांनी मुखत्यारपत्र दिलेले महेश पांचाल यांनी शपथपत्र सादर केले. परमबीर यांच्या वतीने या शपथपत्रात अशी भूमिका मांडण्यात आली आहे की, त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार दिलेली होती, तसेच सर्वोच्च न्यायालयासही त्याबाबत अवगत केलेले आहे. तब्येतीच्या कारणामुळे स्वत: आयोगासमोर हजर राहू शकत नाही, असेही स्पष्ट करण्यात आले. आता त्या पत्रासंदर्भात त्यांना कोणतेही साक्षी-पुरावे द्यायचे नाहीत, तपासणी वा उलटतपासणीही करायची नाही. चांदीवाल आयोगाने यापूर्वी परमबीर सिंग यांना हजर राहण्यासंदर्भात दोन वेळा जामीनपात्र वॉरन्ट काढला होता.
COMMENTS