साकळाई’ साठी शेतकर्‍यांनी अडवला नगर-दौंड महामार्ग

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

साकळाई’ साठी शेतकर्‍यांनी अडवला नगर-दौंड महामार्ग

अहमदनगर/प्रतिनिधी : गेल्या 35 वर्षापासून लालफितीत अडकलेल्या साकळाई उपसा जलसिंचन योजनेसाठी नगर व श्रीगोंदा तालुक्यातील 35 गावांमधील शेतकरी व ग्रामस्थ

शिर्डी लोकसभा निवडणुकीत मातंग समाज निर्णायक भूमिका घेणार ः जगधने
मंजूर गावातून लाख रुपयेचा गांजा जप्त
शिर्डी येथील पाळणा अपघातातील साळवे कुटुंबास 50 हजारांची मदत

अहमदनगर/प्रतिनिधी : गेल्या 35 वर्षापासून लालफितीत अडकलेल्या साकळाई उपसा जलसिंचन योजनेसाठी नगर व श्रीगोंदा तालुक्यातील 35 गावांमधील शेतकरी व ग्रामस्थ आता आक्रमक झाले आहेत. साकळाई योजना कृती समितीच्यावतीने सोमवारी (1 नोव्हेंबर) नगर-दौंड महामार्गावरील हिवरे झरे येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. ही योजना तातडीने मंजूर होण्यासाठी पुढील महिन्यात पुन्हा आक्रमक आंदोलन करण्यात येणार असून, त्यावेळी प्रसंगी मंत्रालयासमोर उपोषण करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. नगर व श्रीगोंदा तालुक्यातील 35 गावांमधील शेतकरी 35 वर्षांपासून साकळाई योजनेसाठी लढा देत आहेत. या योजनेचा राजकारणामुळे बळी गेला आहे. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साकळाई योजनेचे काम तीन महिन्यांत मार्गी लावण्याचे आश्‍वासन लोकसभा निवडणुकीच्या वेळी दिले होते. परंतु, तीन वर्ष उलटून गेले तरी योजना मार्गी लागलेली नाही.
तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही पश्‍चिम वाहिनी खोर्‍यातून पाणी वळवून लगतच्या कुकडी खोर्‍यात देण्याचे आश्‍वासन देऊन साकळाई व इतर पाणी योजनांना मंजुरी देण्याबाबत आश्‍वासन दिले होते. पण, यावरही पुढे काहीही झालेले नाही. या पार्श्‍वभूमीवर, साकळाई योजनेबाबत आत्तापर्यंत फक्त घोषणा झाल्या असून आता हा विषय विधीमंडळाच्या अधिवेषणात पटलावर घेऊन पाणी उपलब्धता व प्रकल्प अहवाल तयार करुन तातडीने प्रशासकीय मान्यता मिळावी व लाभधारक शेतकर्‍यांना न्याय मिळावा, अशी मागणी रस्ता रोकोच्यावेळी आंदोलनकर्त्यांनी केली. यात साकळाई कृती समितीचे अध्यक्ष बाबा महाराज झेंडे, समाजसेवक राजाराम भापकर गुरुजी, संतोष लगड, झुंबरराव बोरुडे, नारायण रोडे, ज्ञानदेव भोसले, रोहिदास उदमले, रामदास झेंडे, प्रतापराव नलगे, जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले, बाळासाहेब हराळ, बाजार समितीचे सभापती अभिलाष घिगे, उपसभापती संतोष म्हस्के, पंचायत समिती सदस्य रवींद्र कडूस, रेवणनाथ चोभे, पंचायत समितीचे माजी सभापती अशोक झरेकर, भाऊसाहेब काळे, सुरेश काटे, राजेंद्र झेंडे, भाऊसाहेब काळे, राजेंद्र म्हस्के, संजय गिरवले, संजय धामणे, दादा दरेकर, ज्ञानदेव कवडे, अ‍ॅड. अनुजा काटे, रामदास झेंडे, अण्णा चोभे, सुनील खेंगट, आजिनाथ झेंडे, हभप अन्नाड महाराज, सोमनाथ धाडगे, डॉ.खाकाळ आदींसह नगर व श्रीगोंदा तालुक्यातील 35 गावातील साकळाई लाभक्षेत्रातील शेतकरी, विविध राजकीय पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान, नुसत्या घोषणा करणार्या पुढार्‍यांचा आंदोलनकर्त्यांनी यावेळी समाचार घेत त्यांच्यावर टीका केली. कुकडी विभागाचे अधिकारी काळे यांनी निवेदन स्वीकारले. नगर तालुका सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेंद्र सानप यांनी बंदोबस्त ठेवला होता. यावेळी प्रशासनातर्फे प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन, नायब तहसीलदार अभिजीत बारवकर उपस्थित होते.

आम्ही आमदार निलेश लंके आणि आमदार रोहित पवार यांना वेळोवेळी भेटलो. त्यांनी सांगितले, आंदोलन थांबवा आम्ही पाणी मिळवून देतो. पण आता साकळाईला डावलून पाणी पारनेर आणि कर्जत-जामखेडला नेण्याचा डाव सुरू आहे. असे झाले तर मंत्री, अधिकारी, यांना घेराव घालू.
बाबा महाराज झेंडे, अध्यक्ष, साकळाई योजना कृती समिती

COMMENTS